नवी दिल्ली
२१ नोव्हेंबर १९६२
प्रिय सौ. वेणुबाईस,
काल संध्याकाळी विमान निघाल्यानंतर मुंबई सोडणे म्हणजे काय, याचा खरा अर्थ काय तो ध्यानात आला. अनेकवेळा यापूर्वी मी मुंबई सोडून दिल्लीला आलो-गेलो होतो. पण आता मी मुंबई सोडून जात आहे या भावनेने अगदी खिन्न झालो. मी विमानात चढण्यापूर्वी तू जेव्हा नमस्कार केलास तेव्हा तर खसखसून रडू कोसळले असते.
आज सकाळी शपथविधी झाला. पंडितजी फार प्रेमाने वागले. पार्लमेंटमध्ये स्वत: घेऊन जाऊन माझ्या जागेवर बसविले. पार्लमेंटनेही मोठ्या उत्साहाने माझे स्वागत केले.
लोकांच्या अपेक्षा फार पण कठीण काम आणि कठीण वेळ या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनावर १९५५-५६ चे ओझे आहे. ईश्वर जसा मार्ग दाखवील तसे गेले पाहिजे.
सह्याद्रीमधे परत न जाण्याचा तुझा निकाल मला फार आवडला. तिथली सर्व व्यवस्था झाल्यानंतर ८-१० दिवसात तू आलीस तर फार फार बरे होईल. हे मी व्यवहार म्हणून लिहीत नाही. या कठीण दिवसात तुझी सोबत म्हणजे माझी शक्ती आहे. घर पाहिले आहे. छोटेखानी पण सुरेख आहे.
मोरारजीभाई घरच्यासारखे वागतात. आज शपथविधीला जाण्यापूर्वी गजराबाईंच्याकडून ओवाळण्याची व्यवस्था केली. मला बरे वाटले. हळू हळू कामात प्रवेश करतो आहे. दोन-तीन महिन्यांत कामावर पकड बसेल. मग काहीसा निर्धास्त होईन. पण तोपर्यंत इकडे तिकडे प्रवास करू नये असे वाटते. बाकी सर्व तू आल्यावर ठरवू. ती. आईला नमस्कार.
-यशवंतराव
------------------------------------------------------------
त्यावर्षी ३० ऑक्टोबराला कृष्ण मेनन यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केल्यानंतर प्राप्त परिस्थितीत काही मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्याच्या उद्देशानं पंडितजींनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीला पाचारण केलं. या बैठकीसाठी के. कामराज, प्रतापसिंह कैराँ, बिजू पटनाईक आणि यशवंतराव चव्हाण उपस्थित राहिले. ही बैठक रात्री दीर्घकाळपर्यंत झाली. त्यावेळी मेनन यांना मंत्रिमंडळातून दूर करावं असं ठामपणे कोणी सुचवलं नाही परंतु पक्षातल्या लोकांकडून आणि देशातल्या जनतेकडून जे मत व्यक्त केलं जात आहे त्याकडे पंतप्रधानांना दुर्लक्ष करता येणार नाही असा इशारा मात्र दिला. यावर लोक म्हणत आहेत ते आपण मानलं तर ते उद्या माझ्या राजीनाम्याचीही मागणी करतील. तेव्हा आपण क़ुठवर पोहोचणार आहोत हे ठरवावं लागेल असं पंडितजींनी मत व्यक्त केलं. बैठकीत अंतिम निर्णय काही झाला नाही परंतु पंतप्रधानांनी कोणताही निर्णय केला तरी मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर राहतील एवढाच बैठकीचा निष्कर्ष ठरला. ५ नोव्हेंबरला यशवंतराव दिल्ली येथून मुंबईला परतले.