• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ५७

दुपारी दीड वाजता कोईमतूर येथे पोहोचलो. हे गाव मद्रासच्या दक्षिणेला पश्चिम किनाऱ्याच्या दिशेला सुमारे तीनशे मैलावर आहे. आमची मुख्य गाडी हुकल्यामुळे रेल्वेने उटकमंडला पोचणे शक्य नव्हते म्हणून कोइमतूरहून स्पेशल टॅक्सी (४० रुपये भाडे) करून हा पन्नास मैलांचा प्रवास साडेतीन तासात केला. कोइमतूर-उटी रस्ता फार चांगला आहे. भोवतालची उत्तम बागाइती शेती, संध्याकाळचा गारवा यामुळे या प्रवासाने दिवसभराचा शीण गेला म्हटल तरी चालेल. विशेषत: निलगिरी पर्वताच्या रांगांनी मनाला खूपच प्रसन्नता वाटली. मुट्यापलम हे उटीची चढण येण्यापूर्वीचे मोठे गाव आहे. या गावापासून चार मैलावर निलगिरी रांग लागते. उंचीवरच्या वळणा-वळणाचा आल्हाददायक प्रवास सुरू होतो. पुट्यापळमला आमच्या गाडीला चाकाच्या नादुरुस्तीसाठी थोडे थांबावे लागले. मी तेथे थांबण्यापेक्षा चालणे पसंत केले. दोन-तीन मैल चालत पुढे गेलो तेव्हा एकदम सुपारीच्या बागांची रांगच रांग लागली. मावळतीच्या सूर्याची किरणे पडणार नाहीत अशी ठिकाणे सुपारीच्या बागांना लागतात. निलगिरीच्या पायथ्याशी मैलोगणती पसरलेल्या या बागा पाहिल्या म्हणजे एक नवीन अनुभूती आल्याचा आनंद होतो.

उंच व धिप्पाड लढाऊ सैनिकांच्या शिस्तीत उभ्या असलेल्या सहस्त्रावधी रांगांच्या समोरून जाताना एखाद्या सेनापतीला जसा अनुभव यावा तसे या बागांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यातून प्रवास करताना वाटते. प्रत्येक दहा मैलावर २२०० फूट उंची वाढत होती. दिवसभराच्या रखरखीत प्रवासाने थकलेल्या शरीराला वाढत्या उंचीच्या वर येणाऱ्या थंड वाऱ्याची झुळूक नवजीवन देत होती. जवळ जवळ पंधरा मैल गेल्यानंतर छोट्या छोट्या वसाहती लागू लागतात. कुन्नूर आणि वेलिंग्टन ही दोन मोठी गावे विसाव्या मैलावर लागतात. कुन्नूर किंवा वेलिंग्टन म्हणजे महाबळेश्वरजवळ जशी पाचगणी आहे तशीच म्हटले तरी चालेल. उटी चार मैलावर असताना विजेच्या दिव्यांचा विस्कटलेला विस्तार दिसू लागतो. वळणे घेत आपण प्रत्यक्ष गावात केव्हां शिरतो ते ध्यानातच येत नाही.

उटीच्या प्रथम दर्शनाबद्दल लिहिले एवढे बस्स. प्रत्यक्ष पाहिल्यानंतर सवड झाल्यास लिहावे असा विचार आहे. परिषदेचे काम दोन दिवसानंतर संपेल. त्यानंतर तीन वाजता कोइमतूर-मद्रास रेल्वेने निघावे लागेल.

दांडेलीला असताना रात्री अंदाजे दोन वाजेपर्यंत जंगलात जनावरांच्या दर्शनासाठी भटकलो. सांबराखेरीज फारसे काही दिसले नाही. एक दोन दिवस मुक्कामाला गेल्याखेरीज समाधानकारक असे काही पहाता येईल असे वाटत नाही.