या छोट्या मुक्कामात एक तरुण काश्मिरी अधिकारी भेटला. मोठ्या गोड स्वभावाचा उमदा पोरगा दिसला. तो पंजाबातील भाषिक वादातून चाललेल्या चळवळीच्या अनेक हकीगती सांगत होता. पुढे बोलता बोलता माझे नाव त्याने काढून घेतले. मी माझे नाव सांगताच तो चकितच झाला. त्याच्या मताने मी कोणीतरी बराच वयस्क पुढारी असलो पाहिजे असे होते. त्याने माझ्या भाषणांचे वृत्तांत त्यांच्याकडील वृत्तपत्रातून वाचले होते. त्या माझ्या मताबद्दल मी महाराष्ट्रात अनंत शिवीगाळ खातो आहे त्याच मताबद्दल मनात आदर असलेला एक अधिकारी तरुण काश्मिरी भेटला याचा मला खूपच आनंद वाटला. पठाणकोटहून आमचे विमान सुटेपर्यंत त्याने माझी पाठ सोडली नाही. पुन्हा परत येताना तो मला पठाणकोटला भेटणार आहे.
दुपारी ११-४५ ला विमान पठाणकोटहून सुटले आणि बरोबर साठ मिनिटात, १२-४५ ला ते श्रीनगरला उतरले. जो प्रवास विमानाने साठ मिनिटात पूर्ण होतो तोच प्रवास रस्त्याने मोटारीने करावयाचा तर ३२-३६ तास लागतात. महाबळ मोटारीने ११ वाजता निघाला आहे. उद्या तो व राणे संध्याकाळपर्यंत येथे येऊन पोहोचतील. श्रीनगरला विमानतळावर उष्मा बराच वाटला. काश्मीरमधे आल्यासारखे फारसे भासले नाही. किंचितसा गारवा वाटला.
ज्या गेस्ट हाऊसमधे उतरण्याची सोय केली आहे त्याच्या आवारात पुष्कळ झाडे आहेत. त्यामुळे आवारात पुष्कळच गारवा आहे. सोय तर खूपच शानदार आहे. सपत्निक येण्याचे मी कळविले होते त्यामुळे दोघांची सोय केली आहे. काश्मीरचे वातावरण पाहिल्यानंतर मात्र मी एकटाच आलो ही मोठी चूक आहे असे पुन्हा पुन्हा वाटत आहे. वारंवार हे प्रवास होत नाहीत. चुटपुट लागून राहिली.
श्रीनगर शहराच्या आसमंतात दुपारी फेरफटका मारला. निसर्गसौंदर्याने बहरलेले हे आसमंत आहे. शालमार, निशान, चष्मेशाही ही जुनी मोगलकालीन उद्याने पाहिली. बादशाही विलासाची, वैभवाची उरलीसुरली चिन्हे पाहून मन उत्कंठतेने भरून आले. दाललेकच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने जाताना श्रीनगरच्या काश्मिरी मरीन ड्राइव्हवरून गेल्यासारखे वाटले. श्रीनगरचा एवढाच काय तो भाग पहाण्यासारखा आहे. बाकीचे दोन-अडीच लाख वस्तीचे गाव म्हणजे गचाळपणा व दारिद्र्य यांची जिवंत साक्ष वाटते. श्रीनगर म्हणजे हेच असेल तर येथे पळभरही राहू नये असे क्षणभर मनांत येऊन गेले.
पण काश्मीरचे वैभव श्रीनगरमधे नाही. येथून दूर आणि अधिक उंचीवर असलेली ठिकाणे पाहिल्यानंतर खरे काश्मीर समजेल असे येथे लोक सांगत आहेत. श्रीनगर समुद्र सपाटीपासून ५२०७ फूट उंचीवर आहे, म्हणजे महाबळेश्वराच्या उंचीवर आज आम्ही आहोत. गुलमर्ग, पहेलगाम ही अधिक उंचीवर आहेत. ती पहाणार आहे.
परिषदेचे कागदपत्र अजून वाचावयाचे आहेत. परंतु उद्याचा दिवस मोकळा आहे. चिंता नाही. जमले तर उद्याच पहेलगामला जाईन म्हणतो.