• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ४७

सेसिल हॉटेल - सिमला
२८-०६-१९५४

प्रिय वेणूबाईस,

दुपारी पाऊण वाजता दिल्लीत पोहोचलो. मुंबई ते दिल्ली प्रवास फारच सुखकर झाला परंतु येथून पुढे कालकाकडे (पंजाब) जाणारी गाडी रात्री १०-३० वाजता सुटते. तोपर्यंतचा दिल्लीतील रेल्वे स्टेशनवरील दहा रुपये भाड्याच्या 'रिटायरिंग' रूममध्ये राहणे म्हणजे भयंकर शिक्षा झाली. महागाई हा तर मुद्दा आहेच परंतु उन्हाळा फार! घाम तर येत नाही. गरम वाऱ्याच्या झळा यांमुळे मुंबई ते दिल्लीच्या थंड डब्यातील प्रवासाचे सर्व सुख सव्याज परत दिल्यासारखे वाटले.

रात्री दिल्लीतून निघून सकाळी कालका येथे पोहोचलो. हा सर्व मुलुख पूर्व पंजाबातील आहे. शीख व पंजाबी या लोकांचा हा प्रदेश मी प्रथमच पहात आहे. सिमला, पंजाबातील हिमालयाच्या ज्या प्रथम रांगा आहेत त्यातील एक ७००० फूट उंचीचे ठिकाण आहे. महाबळेश्वरपेक्षा २००० फूट जास्त उंच आहे. आता दुपारचे दोन वाजले आहेत. हवा महाबळेश्वरसारखीच वाटते आहे. संध्याकाळी काय होते ते अजून समजावयाचे आहे.

कालका येथे 'ब्रॉड गेज' (रुंद गाडी) संपते. तेथून खरी डोंगराची चढण सुरू होते. माथेरानला जाते तशी गाडी येथून पुढे आहे. परंतु ज्यांना जास्त खर्च झेपणे शक्य आहे त्यांच्यासाठी रेल्वेच्या एका डब्याच्या आकाराची, मोटारीसारखी दिसणारी परंतु रुळावरूनच चालणारी, साधारणत: वीस माणसे नेणारी स्वतंत्र अशी छोटेखानी गाडी असते. तिला 'रेलकोच' म्हणतात. याच गाडीने ७॥ वाजता बसून १२॥ वाजता सिमल्यास कालकापासून पोहोचलो. बाकीचे सर्व वऱ्हाड व सामान पाठीमागून गाडीने अजून यायचे आहे. सुंदर स्नान करून लिहावयास बसलो. येथील परिषद एक दिवस अधिक चालणार असे दिसते. मी निघताना तू नाराज होतीस. असे झाले म्हणजे माझा प्रवास अस्वस्थ होतो - तसाच याही खेपेस अनुभव आला.

आमची परिषद एकदाची सुरू झाली. आल्यापासून निश्चित असे काही काम नाही अशा मन:स्थितीत आवतीभोवती हिंडून फिरून स्मृतीत जेवढे साठविता येईल तितके साठविण्याचा झपाटा सुरू ठेवला होता. आता परिषदेचे काम वेगाने सुरू आहे. काल संध्याकाळी तीन-चार तास झाली आणि आज पुन्हा सबंध दिवसभर कमिटीज् काम करतील. या रीतीने काम सुरू राहिले तर उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत काम संपेल. या भरवंशावर मी उद्याच्या पाचच्या गाडीने येथून निघावयाचे नक्की तरतूद करून रिझर्व्हेशन केले आहे. मंगळवारी सकाळी फ्राँटिएरने मुंबईस पोहोचण्याचा विचार आहे.

काल सकाळी सिमल्यातील उंच ठिकाण आम्ही पाहिले. सिमला साधारण सात हजार फूट उंचावर आहे व हे ठिकाण त्याहून अधिक सुमारे २००० फूट उंच आहे. 'जॅकोहिल' असे या टेकडीचे नाव आहे. टेकडीवर एक छोटेखानी मंदिर असून त्यात हनुमान, राम, राधाकृष्ण अशा मूर्ती आहेत. ही टेकडी चढून जाताना नेहमीप्रमाणे मी चढून गेलो. बसत बसत दीड तासांनी पोहोचलो. रस्ता चांगला आहे परंतु वाहने जात नाहीत. खरे म्हणजे सर्व सिमल्यातच वाहने कोठे हिंडत नाहीत. राजप्रमुख किंवा काही स्थानिक मंत्र्याची एखादी मोटार हिंडताना दिसते. पश्चिम लष्करी विभागाचे हे केंद्रस्थान आहे. त्यामुळे क्वचित एखादी लष्करी अधिकाऱ्याची गाडी दिसते. याच्यापेक्षा वाहने नाहीत. माणसांनी ओढावयाची रिक्षा हे येथील धनिकांचे खरे वाहन आहे. पुढे दोन आणि मागे दोन अशा चार माणसांची ही ढकलगाडी. खुळखुळ्यासारखा आवाज करणाऱ्या घंटानादात जेव्हा रस्त्यावरून जाते आणि खुशाल बसणाऱ्या मिजासखोरांचे दर्शन होते तेव्हा मनाला अस्वस्थता वाटते यात काही शंका नाही.