• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - ३१

मुंबई
१ जानेवारी १९५३

नव्या वर्षाची सुरुवात शेवटी प्रवासानेच झाली. अहमदनगरच्या कार्यकर्त्यांच्या तारा, टेलिफोन यांनी तेथे उडालेल्या घबराटीची कल्पना आली. प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्यांना धीर येणार नाही म्हणून तातडीने सुटीचा दिवस कामात घालविण्याचे ठरविले. पुण्यापर्यंत विमानाने - पुढे स्टाफ कार! या मोटारीने मात्र वाटेत खूपच खोळंबा केला. कलेक्टरच्या घरी कार्यकर्ते वाट पहात होते. श्री. भाऊसाहेब फिरोदियाही हजर होते. फार थोर मनाचा वृद्ध गृहस्थ! श्री. बापूसाहेब भापकर हजर होते. शांत व अबोल वाटले. दुपारी कर्जत भागात दुष्काळी कामे पाहिली. घोगरगावी दुष्काळी परिस्थितीतही 'आमच्या गावी दूध-कॉफी घेऊन जा' असा आग्रह पाहून मन गहिवरले. ग्रामीण जीवनातील परंपरागत संस्कृती म्हणतात ती ही! कलेक्टर श्री. राणा आणि स्वामी सहजानंद यांच्यात समझोता घडवून आणण्यात मी पुष्कळच यश मिळविले. मोटारीत प्रवासातील सर्व वेळ या एका विषयानेच घेतला. रात्रीची जाहीर सभा बरीच मोठी होती. १९३२ सालचा बारा बराकीतील 'जेलकरी' दोस्त श्री. क्षीरसागर नगर शहराचा अध्यक्ष म्हणून भेटला.
दुसरे दिवशी पहाटे पाचलाच उठून तयारीला लागलो. नगरचे 'हरिभक्त परायण' श्री. कानवडे (खासदार) यांचेकडे सकाळचा चहा घेऊन परतलो. नगर ते पुणे प्रवास मात्र बिनतक्रार झाला. परंतु ठरल्यापेक्षा एक तास उशिरा येऊन पोहोचलो. पुण्याचे अधिकारी आणि वैमानिक बिचारे वाट पाहून कंटाळून गेलेले दिसले. प्रवासातील उशिराने इतरांना जो वाट पहाण्याचा त्रास होतो त्यामुळे माझे मन बेचैन होते.

निरभ्र आकाश होते त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशात विमानाच्या खिडकीतून सह्याद्रीचा नितळ माथा स्वच्छ दिसत होता. डोंगर, नद्या यांचा विचार करतो ना करतो तोच खारी खाडी आली. रुळाचा रस्ता कोठे दिसतो की काय असा प्रयत्न करतो न करतो तोच 'वुइ आर गोईंग डाऊन' अशी वैमानिकाची सूचना कानी आली. पुन्हा घरी.

श्री. भाऊसाहेब हिरे यांना नगरची कल्पना दिली. त्यांनी दिल्लीला श्री. किडवाईंशी झालेले बोलणे सारांशाने सांगितले. ऑफिसच्या कामानंतर ठाण्यास निघालो. वाटेत 'व्हेंगार्ड स्टुडिओ' मध्ये फोटोची सिटिंग्ज दिली. असे फोटो काढून घेऊन काय करतात हे लोक तेच समजत नाही.

श्री. माधवराव हेगडे यांचे घरी कार्यकर्त्यांशी चर्चा झाली. श्री. हेगडे मोठे खोल आणि धूर्त गृहस्थ दिसले. धूर्त हा शब्द मी अगदी चांगल्या अर्थाने वापरतो आहे. चर्चा चांगली दीड तास झाली. हसत खेळत सर्व काम चालले होते. शेवटी एका गृहस्थाने मला विचारले की 'तुम्ही रागावत कसे नाही?' आणि सर्व लोक हसले. मला त्याचा अर्थ समजेना. मी चौकशी केली तेव्हा समजले की थोड्याच दिवसांपूर्वी दुसरे असेच पाहुणे येथे आले होते व तेव्हा खूपच वातावरण गरम झाले होते.

ग्राहक सहकारी परिषदेचे येथे उद्घाटन केले. परिषद यथातथाच होती. परंतु श्री. बर्वे यांचे भाषण ठीक वाटले. प्रांतिक सहकारी बँकेच्या प्रचाराचा भाग तेवढा अस्थानी वाटला. नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील दुष्काळी कमीटीशी खूपच लांबलचक चर्चा झाली. रात्री घरी परत. शांताराम फार दिवसांनी भेटला. कराडच्या नेहमीच्या गप्पा झाल्या.
------------------------------------------------------------