• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विरंगुळा - २५

मंत्रिपद स्वीकारले त्या वर्षापासून शासकीय कामासाठी, परिषदा, काँग्रेसची अधिवेशने, दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा यासाठी त्यांचे दौरे सुरू झाले. मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान, उत्तरप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, काश्मीर, आंध्र, कर्नाटक असे देशातील विविध प्रांत, तेथील शहरे यांचा त्यांनी प्रवास केला. या सर्व प्रवासाचा विशेष असा की ज्या साधनांनी म्हणजे मोटार, रेल्वे, विमान यांनी प्रवास केला त्याची नोंद तर त्यांनी केलीच शिवाय त्या त्या प्रदेशाचे ऐतिहासिक महत्त्व, तेथील निसर्ग, लोकरिवाज, कौटुंबिक उल्लेख, भेटलेल्या व्यक्ती, परिषदा, सभा यातील कामकाज अशी सर्वसमावेशक माहिती लिहिली, काही लेखन पत्ररूपाने केलेले आहे. या सर्वच लेखनातून त्यांची रसिकता, निसर्गप्रेम, कलाप्रेम आणि सूक्ष्म निरीक्षण याची प्रचिती मिळते. यशवंतरावांनी जी सत्तास्थाने भूषविली त्या सत्तास्थानांवरील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचे लिखाण करून ठेवलेले आढळत नाही. उच्च ध्येयवाद, सौंदर्यदृष्टी, तात्त्विक चिंतन आणि साहित्य कुशलता असेल तर असे लेखन होऊ शकते. त्यांच्या ठिकाणी हे पुरेपूर होते याचा प्रत्यय येतो. हा पत्रव्यवहार, नोंदी आणि यातील तपशील इतिहासाचे संदर्भ साधन आहे, हे त्याचे एक वैशिष्ट्य.

घटनांची स्मृती रहावी म्हणून पत्र लिहिण्याचे व्रत सांभाळत आहे असे त्यांनी एका पत्रात नमूद केलेले असले तरी व्रत स्वीकारावे लागले आणि सांभाळावे लागले याचे कारण त्यांचे सर्व प्रवास एकाकी झाले. पत्नी वेणूबाईंचे शरीर रोगाने पोखरलेले होते. अशक्त बनल्या होत्या. प्रवासासाठी शरीराची साथ नव्हती. एकट्याने घरात थांबण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. यशवंतरावांना याची खंत होती. प्रवास करणे तर क्रमप्राप्त होते. या स्थितीत घरी सुन्न मन:स्थितीत एकाकी असणाऱ्या पत्नीच्या मनाला थोडाफार विरंगुळा लाभावा यासाठी हा पत्रप्रपंच, स्मरणवही लिहिण्याचा परिपाठ राखल्याचे त्यांनी एकदा सांगितले. देशभरात त्यांचे प्रवास झाले तसे संरक्षण, अर्थ, विदेश व्यवहार खात्यांचे काम सांभाळताना पृथ्वीपर्यटन घडले. पत्र लिहिण्याचा आणि नोंदी करण्याचा नेम मात्र नित्याचा राहिला.

मनातील ही खंत त्यांनी एका पत्रात नमूद केली आहे. त्यांनी लिहिले
------------------------------------------------------------
प्रिय वेणूबाईस

तू मनाची हुषारी ठेवीत नाहीस त्यामुळे अतिशय चिंता वाटते. तू मनाचा धीर ठेवून प्रकृती सुधारली पाहिजेस. मी असा भटकत रहातो यात मला समाधान का आहे? परंतु हे सर्व न केले तर कसे चालेल? यामुळे नाईलाजास्तव हिंडत आहे. तुझ्या आजारपणातसुध्दा तुझ्यापासून दूर जावे लागत आहे. मी याबाबत चूक करतो आहे असे मला वारंवार वाटते पण दुसरा मार्गच मला दिसत नाही. असहाय्यपणे हे सर्व करावे लागते.

तू आजारातून बरे व्हावेस याच्याइतकी प्रिय गोष्ट माझ्या आयुष्यात उरलेली नाही. तुझ्याकरता नव्हे पण निदान माझ्यासाठी तुला बरे होणे जरूर आहे. किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष कर. मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. आनंदी मन हे निम्मे औषध आहे.
तुझाच
- यशवंतराव
------------------------------------------------------------