डेक्कन क्वीन खंडाळ्याच्या घाटातून एका पोठोपाठ एक बोगदे मागे टाकीत वेगाने पुढे चालली होती. कधी अंधार तर कधी प्रकाश असा खेळ करीत आमचा प्रवास चालला होता. पुढच्या जीवनाचे हे प्रतीक तर नव्हते?
'कृष्णाकाठ'चा समारोप करताना लिहिण्याच्या ओघात 'पुढच्या जीवनाचे हे प्रतीक तर नव्हे? असे त्यांच्या लेखणीने लिहिलेले असले तरी पुढील आयुष्यातील घटना तपासताना त्यांच्या लेखणीने भवितव्यातच नमूद करून ठेवल्याचं प्रत्ययास येतं!
'कृष्णाकाठ' नंतर 'सागरतळी' आणि 'यमुनातीरी' हे दोन खंड लिहून पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प होता. १९४६ ते १९६२ येथपर्यंतचा म्हणजे मुंबईत मंत्री, मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाल ''सागरतळी'' खंडात समाविष्ट करणे आणि १९६२ नंतरचा दिल्लीतील कार्याचा समावेश 'यमुनातीरी'त होणार होता. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वाला गेला असता तर मराठी सारस्वताचं आत्मचरित्राचं दालन समृद्ध बनलं असतं, वैभवपूर्ण ठरलं असतं. परंतु नियतीला ते मंजूर नसावं!
१९८३च्या डिसेंबरमध्ये दिल्लीला जाणं मला आवश्यक वाटलं त्यास यशवंतरावांनी स्वत:च्या हस्ताक्षरात मला पाठविलेलं पत्र कारणीभूत होतं. त्यावेळी १ रेसकोर्स रोड येथे ते एकाकी अवस्थेत होते. पत्नी सौ. वेणूताई या १ जून १९८३ला परलोकी निघून गेल्यावर दिल्लीतील त्यांच्या या निवासस्थानाला अवकळा प्राप्त झाली. वेणूताईंनी राहत्या घराचं देवघरात रूपांतर केलेलं होतं. त्या देवघरातील गृहलक्ष्मीच निघून गेली होती. यशवंतराव त्यावेळी कुठल्याही उच्चस्थानावर नव्हते. बंगल्यातील राबता ओसरला होता. दहा-वीस वर्षापासूनचे नोकर चाकर त्या आवारात वस्ती करून होते. बंगल्यात फक्त यशवंतराव! उध्वस्त मनानं बसलेले! प्रकृती क्षीण. कोणी भेटण्यास येतील तेव्हा डोळ्यात अश्रू! मला लिहिलेल्या पत्रात प्रकृती आता साथ देत नाही असं यशवंतरावांनी नमूद केलं होतं. माझं मन गलबललं. त्यांना थोडीफार सोबत करावी यासाठी मी दिल्लीकडे धाव घेतली.
११ डिसेंबर १९८३ला दिल्ली येथून स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र मला १३ डिसेंबरला पुण्यात मिळालं. निमित्त होतं माझं एकसष्ठीनिमित्त अभीष्टचिंतन करण्याचं. पत्र वाचून मी अवाक बनलो. मनानं दु:ख असताना माझं अभीष्टचिंतन करण्याचं भान त्यांनी राखावं याचं अप्रूप वाटलं.
------------------------------------------------------------