प्रत्येक जिल्ह्यात मतभेदाचा पूर आहे. विशेषत: सातारा जिल्ह्यातील वादाने अतीव दु:ख झाले. जाहीर सभातून एकमेकांचा तेजोभंग, अधिक्षेप केला गेला. शरद पवार यांचे घरी सर्वांना बोलावून एकत्र बसवून प्रयत्न केला आहे. सर्वांनी मान्य तर केले आहे परंतु कसे प्रत्यक्षात वागतात ते महत्त्वाचे.
चालच वेडीवाकडी!
इंदिराजींच्या मनात मुख्यमंत्र्यांना बदलण्याचे दिसते. परंतु मी तसे म्हटले पाहिजे असा डाव आहे. मी का म्हणावे? त्या जागी कोणी यावे याचा निर्णय त्यांनी आपल्या मनाशी घ्यावा म्हणजे चेंज (बदल) सोपा होईल. व टिकूनही राहीला. असे मी त्यांना पूर्वीच सांगितले होते. पुन्हा सांगितले. Mr. Naik must be treated with grace हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे. आता तूर्त काही नको, पुन्हा पाहू let us wait असे म्हणून सोडून दिले जाते. देशातही वातावरण अस्वस्थ आहे त्यात याची कशाला भर!
आता रजनीही (बॅ. रजनी पटेल) हे झाले पाहिजे, नाईक बदलले पाहिजेत या बॅन्डवॅगनवर आहे. बाई बोलल्या असल्या पाहिजेत. एकदा बाबूजीही मला सांगत होते की बदलाच्या आड तू कशासाठी? बाई त्यांना तसे म्हणाल्या. दिल्लीची चालच वेडी वाकडी त्याला काय करणार?
एकदा करून टाका!
दिल्ली
२१ सप्टेंबर १९७४
आज रात्री मुंबईहून पहाटेला प्रयाण करावयाचे आहे. (नाणे निधी आणि अन्य आंतरराष्ट्रीय अर्थविषयक बैठकांसाठी). जवळ जवळ दोन आठवडे बाहेर जाणार आहे. म्हणून दुपारी कॅबिनेट मीटिंगनंतर पंतप्रधानांना भेटलो.
महाराष्ट्राच्या नेतृत्वासंबंधीचा प्रश्न काढला. मोघमच बोलत होत्या. मी म्हटले, करावयाचे तर एकदा करून का टाकत नाही. वेळ तर आताच हिवाळी अधिवेशनापूर्वी आहे. 'खरं आहे' असं म्हणाल्या. परंतु सगळेजण, तुम्ही दिल्लीत कुणीही सापडत नाही असं थट्टेने म्हणाल्या. मी लगेच सांगितले की सर्वांना आदेश काढा की ठराविक काळात दिल्ली कुणीही सोडावयाची नाही. म्हणजे जमून जाईल. 'हसल्या'. म्हणाल्या मंत्रिमंडळात फेरबदल (काही मंत्र्यांची) करण्याचे मनात आहे.
मी म्हटले 'हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. त्यास कोणी अडथळा निर्माण करू शकत नाही, तसा करूही नये.' हा प्रश्न मी तिथेच सोडून दिला.
परदेशाहून परतल्यानंतर बदल होणार यात आता मुळीच संशय नाही. स्वत:संबंधी आताच कशाला विचार करीत बसायचे. विचार करीत बसण्यात अर्थ नाही असे ठरविले. उगीच काहीतरी खाते दिले तर नको म्हणण्याचा आपला प्रिव्हिलेज आहेच.
------------------------------------------------------------