मुंबई
२६-७-१९४९
प्रिय सौ. वेणूबाईस,
येथील बाकी सर्व ठीक आहे. मी सध्या सकाळ - संध्याकाळ नाना कुंटे यांच्याकडे जेवण करतो. त्यांनी फारच आग्रह केला म्हणून जातो आहे. मनातून मात्र अस्वस्थ आहे. नात्यातली इथली मंडळी भेटून जेवायला बोलावतात. बहुधा तू त्यांना लिहिले असावेस. परंतु या लोकांना मी साफ नकार दिला. या आठवड्यात तुमची पैशाची ओढाताण झाली असेल. गौरीहरकडे कोणाला तरी पाठवून शंभरभर रुपये आणावे. काय करीत आहात ते कळवा.
- यशवंतराव
-----------------------------------------------------------
वेणूबाई मिरज येथे औषधोपचार घेत होत्या. दिवसेंदिवस प्रकृती खालावत जात होती. तरीपण आर्थिक टंचाई आणि सेक्रेटरीपदी असल्यानं कामाची वाढलेली जबाबदारी यामुळे पती-पत्नींची पत्ररूपानंच भेट व्हायची. हे सर्व उभयपक्षी मानसिक ताण निर्माण करणारं होतं. जीवघेण्या आजारात पतीचं सान्निध्य असावं अशी वेणूबाईंची स्वाभाविक इच्छा असली तरी अशी सोबत ठेवणं यशवंतरावांना शक्य होत नव्हतं. परिणामी वेणूबाईंची चिडचिड सुरू झाली. हट्टीपणा वाढला. अशा असहाय्य आणि असह्य स्थितीत मन मोकळं करायला अन्य कोणी यशवंतरावांच्या आसपास नव्हतं. यशवंतरावांनी ही मानसिक स्थिती एका पत्रात नमूद केली आहे. १९४९ च्या पत्रात ते लिहितात-
-----------------------------------------------------------
मुंबई
२७-७-१९४९
दररोज पत्र लिहिण्याचा विचार करतो पण पत्र सुरू करण्याचे धैर्यच होत नाही. पत्रात काय लिहावे हेच मुळी सुचत नाही. तू खूपच रागावली असशील पण माझा स्वभाव हा आता निदान तुला तरी नवीन नाही. तुझी प्रकृती बरी आहे असे पत्रात कुणाकुणाच्या वाचून तेवढाच आनंद होतो.
तू माझ्यासाठी एक गोष्ट शिकावीस की ज्यावेळी तुझ्यापासून परगावी जायला निघतो त्या दिवशी अकारण हट्टीपणा किंवा नाराज होईन असं काही करू नकोस. मला त्यामुळे मानसिक फार त्रास होतो. माझा माझ्यावरचा ताबा सुटतो. या चिडखोरीची माझी मलाच हल्ली भीती वाटू लागली आहे. या चिडखोर स्वभावामुळे मीच माझ्या जीवाचे काही बरे वाईट करीन की काय इतकी हल्ली मला धास्ती वाटू लागली आहे. माझ्याइतकाच तूही हट्टीपणा करतेस त्यामुळे ज्याच्याबद्दल नंतर पश्चात्ताप होतो अशा गोष्टी घडतात.
हे सर्व लिहिले तेव्हा मला आता थोडे बरे वाटले. मी तारीख ४ किंवा ५ ला मिरजेस येत आहे. संध्याकाळी तिथे राहाणार आहे.
या महिन्यात तुमचेकडील खर्चाचे पैसे संपले असतील याची मला कल्पना आहे. त्या संबंधात काही तरी व्यवस्था करण्याचे नादात आहेच. पैशाचे काम फार सावकाश होते. गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे होत नाहीत त्यामुळे थोडा त्रास होतो. पण हे चालायचेच.
-यशवंतराव
-----------------------------------------------------------
शरीराने मुंबईला परंतु मनानं कराडात आणि मिरजेत अशी यशवंतरावांची स्थिती होती. मिरजेतील प्रदीर्घ उपचारानंतर विश्रांतीसाठी दवाखान्यातून निघून घरी जाण्याचा सल्ला वेणूबाईंना मिळाला तेव्हा यशवंतरावांना मिरजेस जावं लागलं. मिरज येथून सामानासह कराडला न जाता सरळ पुण्यास येण्याचा निर्णय त्यांनी केला आणि तसं मिरजेस पत्रानं कळविलं. १९४९ च्या ऑगस्टमधील ही घटना. त्यांनी पत्नीला पत्रात लिहिलं.