• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ७४

समाज मन अनुकूल आहे असं आढळतांच, या गटानं वेगळ्या हालचाली सुरु केल्या. शेतकरी आणि कामकरी यांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी ‘शेतकरी-कामकरीपक्ष’ या नांवाचा एक वेगळा पक्षच स्थापन करण्याला या गटांतील मोरे-जेधे आदि मंडळीनी चालना दिली. त्या दृष्टींनं मग चर्चा सुरु झाल्या. १९४८ च्या जानेवारींत म. गांधी यांची हत्या होतांच महाराष्ट्रांतील ग्रामीण आणि शहरी भागांत एक वेगळी लाट उसळली होता. ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादाचे थंडे झालेले ताबूत पुन्हा एकदा या निमित्तानं रस्त्यावर आले आणि सारं समाजजीवनच ढवळून निघालं. खेर मोरारजींच्या शहरी सत्तेच्या राजकारणाचा राग मनांत होताच. त्यांत गांधी हत्येमुळे आणखी एका भक्कम कारणाची भर पडल्यानं त्यांतून मग दहशत, जाळपोळ, लुटालूट आदि मार्गानी राग, चीड व्यक्त करण्यास अवसर मिळाला. राष्ट्रपित्याची हत्या हा समाज-मनाला मोठा धक्का होता. त्या धक्क्यानं बेफाम बनलेल्या मनांनी सुक्याबरोबर ओल्याचाहि निकाल लावला. समाजधुरीण आणि राजकारणी-धुरंधर यांच्यासमोर मोठंच प्रश्नचिन्ह उभं राहिसं.

याच काळांत मुंबईत भाऊसाहेब राऊत यांच्या निवासस्थानीं, काँग्रेस अंतर्गत खेर मोरारजी विरोधी गटाची बैठक झाली. ही बैठक शेतकरी-कामकरीपक्षाला जन्म देण्यासाठी म्हणून आयोजित केली होती. या बैठकीला इतर सर्व कार्यकर्त्यांबरोबर यशवंतराव चव्हाण, पी. के. सावंत हेहि हजर राहिले. र.के. खाडिलकर, आचार्य अत्रे हेहि तिथे होते. नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय या बैठकींत करायचा असल्यांन त्या अनुषंगानंच बैठकींत चर्चा सुरु झाली. यशवंतरावांनी नव्या पक्ष स्थापनेस मान्यता देण्याचा प्रश्नहि निर्माण झाला. पक्षाच्या पूर्वतयारीची ही बैठक असल्यानं यशवंतरावांनी त्या संबंधांत मत व्यक्त करणं महत्वाचं होतं, परंतु त्या संदर्भात त्यांनी आपले विचार ऐकवले मात्र, बैठकींतलं सारं वातावरणच बदललं. बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. कारण यशवंतरावांनी व्यक्त केलेल्या विचारांशीं बरेचजण अनुकूल होते.

शेतकरी-कामकरी पक्ष या नांवानं वेगळा पक्ष स्थापन करायचा आणि काँग्रेस पासून फुटून बाजूला व्हायचं, याला चव्हाणांनी बैठकींत सक्त विरोध दर्शवला. त्यांचं म्हणणं असं की, काँग्रेस अंतर्गत एक गट म्हणून, ग्रामीण रचनेच्या संदर्भांत अनुकूल काम करण्यासाठी आपण एकत्र आलों आहोंत. अशा परिस्थितींत त्या कामासाठी आपण मंडळी आम्हांस काँग्रेसपासून बाजूला काढतां आहांत हें बरोबर नाही. नवा पक्ष काढण्याच्या या विचारानं आमच्यासमोर पक्ष निष्ठेचा मूलभूत प्रश्नच निर्माण झाला आहे. नव्या पक्षाचं स्वरुपहि महाराष्ट्रापुरतं, म्हणजे बारा जिल्ह्यांपुरतंच मर्यादित आहे. काँग्रेस पक्ष हा अखिल भारतीय पक्ष आहे. देशांतला राजकारणाचा तो मुख्य प्रवाह आहे. नवीन पक्ष सुरु करणं म्हणजे या मुख्य प्रवाहापासून बाजूला होणं आहे. पं. नेहरुसारखे, काँग्रेस समाजवादाचा द्दष्टिकोन स्वीकारलेले नेते काँग्रेसच्या शिरोभागीं असतांना, सामाजिक विषमता नाहीशी करण्यासाठी, आपण काँग्रेसमध्ये राहूनच त्यांचे साथीदार बनलं पाहिजे. या नव्या पक्षाला जातीयतेचा वास येत आहे असं लोक बोलत आहेत, त्याचाहि विचार करण्याची गरज आहे.

नव्यानं स्थापन होणा-या शेतकरी कामकरी पक्षाला जातीयतेचा वास येत आहे. असं यशवंतरावांनी सांगतांच आचार्य अत्रे यांनी तें खोडून काढण्याचा प्रयत्न केला. “ मी या पक्षांत आहे ना, मग जातीयतेचा वास कसा येईल, ” असा अत्रे यांचा दावा ! या नव्या पक्षाच्या बांधणींत अत्रे यांचं स्थान नेमकं कोणतं रहाणार होतं हें अजून गुलदस्तांत होतं, परंतु आपली पक्षांतली उपस्थिती हीच केवळ तो पक्ष जातीयवादी नाही गें सिद्ध करण्यास पुरेशी ठरते असं त्यांचं मत होतं. मोरे, जेधे, जाधव, राऊत आदि मंडळी अर्थातच अत्रे यांच्या मतावर खूष होतीं. परंतु “ तुम्ही आहांत, पण तुम्ही या पक्षात नेमके कुठे आहांत, हें कांही मला माहिती नाही, ” असं अत्रे यांना उद्देशून यशवंतरावांनी स्पष्ट केलं. काँग्रेसमधून फुटून निघून नवीन पक्ष स्थापन करण्यास यशवंतरावांनी उघडपणें विरोध करतांच हा विचार मान्य असलेले आणखी कांहीजण त्यांच्या मदतीस आले. सावंत वगैरेंनीहि आपलं मत व्यक्त करुन यशवंतरावांच्य मताला दुजोरा दिला. बैठकींत मग उलटसुलट चर्चा होत राहिली आणि राऊत यांच्या घरीं झालेली ही बैठक अंतिम निर्णय न होतांच संपली.