• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ६८

महाराष्ट्रांत होमगार्ड-संघटना बांधण्याचं सर्व श्रेय चव्हाण यांनाच आहे. १९४८-४९ सालांत हिंदु – मुसलमानांचे दंगे सुरू झाले होते. त्या वेळीं नागरी संरक्षणाच्या कामांत नागरिकांना सामील करून घेण्यीच आवश्यकता निर्माण झाली होती. यशवंतरावांनी त्या कामाकडे लक्ष द्यायचं ठरवून होमगार्ड-संघटनेची योजना तयार केली. न्या. गजेंद्रगडकर यांचे बंधु आणि माणेकशा यांचं त्यांनी या कामीं साहाय्य घेतलं आणि संपूर्ण मुंबई राज्याच्या पातळीवर होमगार्ड-संघटना तयार केली. या संघटनेचा पुढच्या काळांत मोठा विस्तार होऊन पोलिसांच्या बरोबरीनं या संघटनेनं नागरी संरक्षणांतील आपला वांटा, राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक संकटाच्या वेळीं उचलला, संरक्षणसिद्ध अशी नागरिकांची एक पलटणच त्यांतून तयार झाली. या यशाचं श्रेय चव्हाणांकडे जातं.

यशवंतरावांनी त्या काळांत महाराष्ट्रांतील तमाशा या लोक-कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं आणि ही कला संवर्धित करण्याचं असंच एक मोठं ऐतिहासिक कार्य केलं. तमाशा-कलेकडे सोवळेपणानं पहाण्याची शहरी वृत्ति असे. तमासगीर या शब्दाचा उपयोग शिवी म्हणूनच करण्यांत भूषण मानलं जात असे. पण तमाशा या लोक-कलेबद्दल चव्हाण यांनी एक सविस्तर अशी ‘नोट’ तयार केली आणि तमाशाला लोक-कला म्हणून सरकारनं मान्यता देणं कसं योग्य ठरेल यासंबंधी त्या टिपणामध्ये विश्लेषण केलं. हस्तलिखित तयार झाल्यावर तें टाइप करून घेण्यासाठी मोरारजींकडे एका टायपिस्टची मागी केली. मोरारजींनी तेव्हा श्रीपाद डोंगरे यांची त्या कामासाठी तरतूद केली. यशवंतरावांचे आणि सर्वच चव्हाण-कुटुंबाचे विश्वासू खाजगी सचिव म्हणून, पुढे मुंबईपासून दिल्लीपर्यंत काम करत राहिलेले डोंगरे यांची आणि चव्हाणांची पहिली भेट अशा एका प्रसंगानं, योगायोगानं झाली. ‘नोटच’ टाइप झाल्यावर यशवंतरावांनी ती मोरारजींकडे व त्यांच्यामार्फत मुख्य मंत्री बाळासाहेब खेर यांच्याकडे रवाना केली.

तमाशा या कलेला लोक-कला म्हणून सरकारनं मान्यता द्यावी हें सुचवणारी ती ‘नोट’ होती. परंतु बाळासाहेब खेर यांनी ती वाचली आणि त्यावर ‘एक्स्लंट’ असा मोठ्या अक्षरांत शेरा मारून परत पाठवली. शिक्षकानं एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर तपासावा आणि त्यावर ‘सुरेख’ असा शेरा मारावा, असा तो प्रकार होता. तमाशाला लोक-कला म्हणून मान्यता देणं शक्य आहे की नाही याचा कांहीच खुलासा नाही, अशा स्थितींत ती ‘नोट’ परत आलेली आढळतांच यशवतंरावांनी तें प्रकरण मग मोरारजींकडे तपशिलासाठी दिलं. त्यांच्याशीं चर्चा केली आणि मोरारजींनी अखेर त्यावर निर्णय दिला. महाराष्ट्रांत ‘तमाशा – बोर्ड’ स्थापन झालं तें त्यामुळेच होय. पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मोरारजींनी चव्हाणांकडे मोठ्या जबाबदा-या कधी सोपवल्या नाहीत. तरी पण त्या जागेचा उपयोग करून यशवंतरावांनी सार्वजनिक स्वरूपाचीं अनेक महत्वाचीं कामं केलीं आणि पुढच्या काळांत तीं महत्त्वाचीं ठरलीं.

पार्लमेंटरी सेक्रेटरीपद स्वीकारल्यानंतर यशवंतरावांच्या टेबलावर पहिलं काम आलं तें सरकारनं बंदी घातलेल्या पुस्तकांच्या संबंधांत! त्याबाबत आपलं मत देण्याचं – निर्णय करण्याचं ! त्या वेळीं बंदी घालण्यांत आलेल्या सर्व पुस्ताकांचं त्यांनी वाचन केलं आणि आपला निर्णयहि दिला. पार्लमेंटरी सेक्रेटरीपदाच्या कामाचा प्रारंभ पुस्तकं वाचण्याच्या कामापासूनच झाला.

पार्लमेंटरी सेक्रेटरीपदावर राहून यशवंतराव मुंबईत काम करत होते, पण शरीर मुंबईत आणि मन घरांत कराडला, अशीच कौटुंबिक स्थिति होती. निवडणुकीपूर्वींच बंधु गणपतराव यांना क्षयाची बाधा झाली होती आणि रोग बळावत चालला होता. मिरजेच्या दवाखान्यांत औषधोपचार झाले, परंतु रोग हटला नव्हता. त्यामुळे यशवंतरावांनी त्यांच्यावर पुण्याचे डॉ. भरूचा यांच्यामार्फत औषधोपचाराची व्यवस्था केली. कांही काळ मुंबईतहि उपचार केले, परंतु प्रकृति सुधारण्याचं चिन्ह दिसेना. गणपतरावांची सर्व शुश्रूषा घरीं त्यांच्या पत्नी स्वत:च पहात असत. एखाद्या सॅनिटोरियममध्ये ठेवणं आर्थिकदृष्ट्या झेपणारं नव्हतं. क्षयविरोधी स्ट्रेप्टोमायसीनसारखीं औषधंहि त्या काळांत मुबलक प्रमाणआंत उपलब्ध नव्हतीं. जीं औषधं होतीं तीं अतिशय महाग असल्यानं माफक प्रमाणांतच त्यांचा वापर करणं क्रमप्राप्त होतं. आर्थिक स्थिति ओढगस्तीची होती. गणपतरावांच्या पत्नी त्यांची सेवा-शुश्रूषा करीत होत्या. परिणामीं त्यांनाहि क्षयानं पछाडलं. १९४७ चं संपूर्ण वर्ष गणपतराव यातना सहन करत होते. अखेर त्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यांत त्यांना मृत्यूंनं गाठलं. गणपतराव गेले आणि चव्हाण-कुटुंबाचा आधारच गेला. विठाबाईवर तर दु:खाचा आणखी एक डोंगर कोसळला. ज्ञानोबा गेलेच होते. आता गणपतरावहि गेले.