• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ४७

ब्रिटिशांविरुध्द उठावणी न करण्याच्या विचारांशी यशवंतराव अनुकूल नव्हते. भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वालाहि रॉय यांचा हा विचार मान्य नव्हता. ब्रिटिशांशीं असहकार पुकारण्यांत काँग्रेसचा, हिटलरला आणि त्याच्या हुकूमशाहीला- फॅसिझमला -पाठिंबा होता असं मुळीच नव्हतं. काँग्रेसला ही हुकूमशाही अमान्यच होती. हिटलरची हुकूमशाही ही लोकशाही विचार आणि मानवता यांवर एक भयकर संकट तर खरंच, परंतु दुस-या बाजूला ब्रिटिशांचा वसाहतवाद आणि हिटलरची हुकूमशाही यांत फरक करणंहि कठीण होतं. अशा स्थितींत ब्रिटिशांना त्या युद्धांत साहाय्य करावं असं म्हणत रहाणं ही एक बौद्धिक कसरत होती. यशवंतरावांनी या निष्कर्षाबद्दल अनेकांशी चर्चा केली, विचारविनिमय केला. इतरांनीहि रॉय यांचीच भूमिका कशी योग्य आहे हें पटवण्याचा प्रयत्न केला. समाजवादी पक्षाच्या विचारानंतर यशवंतराव आता दुस-यांदा वैचारिक द्वंद्वांत सापडले होते. परंतु अखेरीस काँग्रेस-संघटनेचे विचार आणि काँग्रेसवरील विश्वास याचाच विजय झाला आणि राजकीय विचारप्रणालीचं रॉय यांचं धरलेलं बोट सुटलं.

यशवंतराव यांनी मुळांतच रॉय यांच्या विचारांची सोबत कां धरली हा एक संशोधनाचा विषय होऊं शकेल. पण त्याचं उत्तर यशवंतराव हे समाजांतल्या ज्या थरांत जन्माला आले, वाढले आणि त्यांनी जें अनुभवलं त्याच्या विश्लेषणांतून मिळूं शकतं. नागरी विभागांतील सरंजामदार आणि ग्रामीण भागांतील सरंजामदार याच्या मनोवृत्तींत त्यांना कांही फरक आढळून येत नव्हता. बहुजनवर्गाकडे पहाण्याची आणि त्याच्याशीं वागण्याची दोघांची वृत्ति एकच होती. समाजांतल्या या परस्पर-हितसंबंधी वर्गाविरुद्द सामान्य जनतेनं संघटित होऊन मुकाबला करावा या विचाराशीं ते सहमत होते. पण काँग्रेसचे त्या काळांतले जे नेते किंवा प्रारंभींच्या काळांत होऊन गेले होते ते नेते, या सर्व व्यक्ति समाजाच्या विशिष्ट थरांतील, वरच्या वर्गांतील, सुखासीन वर्गांतीलच होत्या; उलट रॉय हे रशियन क्रांतीचा वसा घेऊन आलेले होते. त्यागमय असं त्यांचं जीवन होतं.

१९३० नंतर रॉय यांचं मूळचं रशियन क्रांतीचं तत्त्वज्ञान मात्र उरलं नव्हतं. प्रारंभींच्याच कार्याशीं तें सुसंगत राहिलं असतं, तर त्या वेळच्या हिंदुस्थानांतील तरुण वर्गाची साथ त्यांना अधिक प्रमाणांत मिळण्याची शक्यता होती. कारण बहुजन-समाजांतला हा तरुण वर्ग परिस्थितीनं पिचलेला होता आणि बांध फोडून बाहेर पडण्याची आवश्यकता त्याला पटली होती. परिस्थितीचं आव्हान स्वीकारण्याच्या मन:स्थितीपर्यंत तो पोंचला होता. टिळकांच्या नंतर गांधींनीं या वर्गाला आवाहन करुन, ध्येयाकडे जाण्याचा जो मार्ग दाखवला, तो मार्ग बहुजन-समाजाला, आपल्या ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे असंच वाटलं असलं पाहिजे. गांधी हे धार्मिक प्रवृत्तीचंच पुनरुज्जीवन करीत आहेत अशी रॉय यांची टीका असे. पण त्याचबरोबर गांधी हे समाजांतल्या प्रस्थापितांविरुद्ध वातावरण निर्माण करतील आणि ही चळवळ, हा दृष्टिकोन, समाजांत वाढत राहील आणि त्यांतून असा एक क्षण निर्माण होईल की, समाजाच्या उद्धाराला अडथळा करणा-या सर्वांचा त्यांत चक्का चूर होऊन जाईल, अशी तरुणांची भावना होती. अर्थातच ही मार्क्सप्रणीत विचारसरणी आहे. समाजांत स्वत:च्या वर्गाबद्दल जागृत असलेला गट, हा नेहमीच धोरणानं वागणारा असतो. सामाजिक क्रांतीच्या ज्वाला भडकण्यास सुरुवात झाली आणि त्यामध्ये आपल्या हितसंबंधाला आता फार मोठा धक्का पोंचणार आहे अशी जाणीव ज्या क्षणाला या वर्गाला होते त्या क्षणाला लगेच तो मिळतं-जुळतं घेण्यासाठी तयार होत असतो. यशवंतरावांच्या संग्रही असे कांही अनुभव जमा झालेले होतेच. लहानपणापासून त्यांची वाटचाल, असे अनुभव घेत घेत सुरु राहिली होती. त्यामुळे रॉय यांचं तत्त्वज्ञान आणि कृति यांबद्दल त्यांच्या मनांत आकर्षण निर्माण होणं शक्य होतं.