• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ३६

जतिनदासांच्या उपोषणानं देशांतील सा-या तरुणाचं लक्ष त्या वेळीं खेचून घेतलं होतं. तरुण मनाला खेचून घेणारी अशीच ती घटना होती. टिळक हायस्कूलमध्ये यशवंतराव शिकत होते त्या काळांत सर्व देशांत आणि जिल्हा-तालुका-खेड्यापर्यंत स्वातंत्र्यलढ्याचं वारं एकसारखं संचारत राहिलं होत. तरुण मनं बेभान बनवणारा असाच तो काळ होता. सातारा जिल्ह्यांतील लक्ष्मणशास्त्र्यांसारखे कांही कार्यकर्ते १९२१ च्या चळवळीपासूनच तुरुंगाच्या वा-या करुं लागले होते. गावोगाव त्यांतून चर्चा घडत होत्या. कराड गाव आणि तिथले तरुण या वातावरणापासून दूर राहिलेले नव्हते. जतिनदासांच्या तुरुंगांतील प्राणाहुतीनं तर सारा तरुणवर्गच बेचैन झाला.

सातारा जिल्ह्यांत त्या वेळीं सत्यशोधक सत्याचा शोध करत होते, पण स्वातंत्र्याचा शोध हाच सत्याचा शोध असू शकतो या निर्णयाप्रत, त्या घटनेनं यशवंत-रावांना खेचलं क्रांतिकारकांच्या उठावणीचा तो काळ. सा-या हिंदुस्थानचं लक्ष लाहोर-कटाच्या खटल्याकडे लागलं होतं. क्रांतिकारकांना तुरुंगांत डांबून इंग्रज अधिकारी त्यांचा अनन्वित छळ करत होते. बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक श्री. जतिनदास हे एक त्यामध्ये अडकले होते. लाहोरच्या कटाशीं त्यांचा कांही संबंध आहे हें सिद्ध झालेलं नव्हतं, परंतु तरीहि इंग्रजांच्या अत्याचाराचे ते बळी ठरले. १९२० सालीं असहकाराची चळवळ सुरु झाली आणि तेव्हापासून जतिनदास हे इंग्रज सरकारच्या डोळ्यांत सलत होते. नंतरच्या पांच वर्षांत त्यांना चार वेळा तुरुंगाची हवा खावी लागली. चौथ्या वेळीं ते मैमनसिंगच्या तुरुंगांत असतांना त्यांचा भयानक छळ करण्यांत आला. इतका की, एक दिवस त्यांना त्याबद्दल जेल-सुपरिंटेंडेंटशी मारामारी करावी लागली; परंतु तो आणखी एक भयंकर गुन्हा धरला जाऊन त्यांना अंधारकोठीची शिक्षा देण्यांत आली. अंधार-कोठडींत डांबतांच जतिनदासांनी तिथे उपोषण सुरू केलं आणि तेवीस दिवस त्यांना अन्न-पाण्यावांचून ठेवल्यानंतर त्यांच्या तक्रारीची दाद घेण्यांत आली. लाहोर-कटांत त्यांना गुंतविल्यानंतरहि असाच प्रसंग उद्भवला. राजकीय कैद्यांना तिथे सराईत, निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाणे वागवलं जात असे. त्यामुळे संतापानं जतिनदासांनी तुरुंगांत उपोषण सुरु केलं. सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी राजकीय कैद्यांना कांही विशिष्ट सवलती मिळाव्यात म्हणून अगोदरच उपोषण सुरु केलं होतं. त्याला एक महिना उलटला तरी नोकरशहांना घाम फुटला नाही. तेव्हा अन्य कैद्यांनी अन्नसत्याग्रह पुकारला. जतिनदासहि त्यांत सामील झाले तिथून पुढचा प्रत्येक दिवस भीषण ठरत चालला. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची तर उपासमारीनं सर्व शक्ति क्षीण झाली आणि जतिनदासांना प्रेतकळा प्राप्त झाली. वर्तमानपत्रांतून या सर्व भीषण स्थितीचीं वर्णनं येत असत. कराडला त्या वेली केसरी, ज्ञानप्रकाश, नवाकाळ एवढींच वर्तमानपत्रं विवक्षित ठिकाणीं येत असत. विद्यार्थी यशवंतराव हीं वर्तमानपत्रं मिळवून रोज वाचत होते. पंधरा-सोळा वर्षांचं तेव्हा त्यांचं वय ! कराडला त्या वेळींहि फ्लेगनं थैमान घातलं होतं आणि कराड गाव सभोवतालच्या शेतांतून पसरलं होतं. जतिनदास शेवटच्या घटका मोजण्याच्या अवस्थेंत पोंचले तेव्हा सरकार त्यांना जामिनावर सोडण्यास तयार झालं. जामिनाची अट मात्र अपमानास्पद होती. ही अट स्वत: जतिनदासांनी व त्यांच्या भावानं नाकारली आणि अखेर ६२ व्या दिवशीं जतिनदासांनी स्वदेशासाठी प्राणाची आहुति दिली.

जतिनदासांनी देशासाठी प्राण दिला या घटनेनं सारा देश बेचैन झाला. तरुण यशवंतराव तर ते वाचून भांबावून गेले - बेचैन झाले. जतिनदासांच्या देहांतील राष्ट्रीय स्वातंत्र्याचं प्रखर वलय तरुण यशवंताचं अंत:करण छेदून गेलं आणि या एका घटनेनं त्याच्या चित्तवृत्तींत कायमचा बदल झाला. कराडचे त्या वेळचे नेते श्री. बाबूराव गोखले, अळतेकर पिता-पुत्र आणि टिळक हायस्कूलमधील राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षकांच्या शिकवणुकीचा यशवंताच्या समोर आदर्श होताच. त्या संस्काराचे परिणाम मनाला चिकटून होते. ही घटना मनावर झालेले संस्कार आणि सभोवतालचं वातावरण यांतून मग या तरुणाची राजकीय आंदोलनांत स्वत:ला झोकून देण्याची कठीण राजकीय तपश्चर्या सुरु झाली. संवेदनाक्षम बनलेल्या मनानं झेंप घेतली. सविनय कायदेभंगाची मोहीम देशांत सुरु झालीच होती आणि गावोगाव पोंचली होती. यशवंत चव्हाण या विद्यार्थ्यानं टिळक हायस्कूलमध्ये झेंडावंदन करुन या आंदोलनांत उडी घेतली होती १९३० मध्ये ! त्या वेळीं ते सहाव्या इयत्तेंत होते. परंतु त्यापूर्वी दोन वर्षांपासून म्हणजे १९२७-२८ पासूनच त्यांनी सार्वजनिक कामाला वाहून घेतलं होतं. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव यांत प्रमुखपणानं भाग घेणं, अशी कामं सुरु करुन सार्वजनिक कामाचे अनेक व्याप वाढवत ठेवले होते. चळवळी कराव्यात, सार्वजनिक कामं करावींत ही हौस त्यांनी आपल्याला त्या वेळींच लावून घेतली. तरुण विद्यार्थ्यांना गोळा करावं, कांही काम करावं यांतच ते रममाण होत.