• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. ३४

१९२१ च्या अखेरीपर्यंत गांधीजींखेरीज सर्व मोठे पुढारी तुरुंगांत गेले होते. काँग्रेसनं या वेळीं कांही अटीवर सविनय कायदेभंगाची मोहीम चालवण्यास अनुमति दिलेली होती; परंतु मोपल्यांचं बंड आणि मुंबईतील दंगे पाहून गांधींनी चळवळीचा वेग कमी करण्याचं ठरविलं.  शहरांतील चळवळीला हिंसेचं गालबोट लागत राहिल्यानं त्यांनी ही चळवळ खेडयांत नेण्याचं ठरवलं. अहमदाबादच्या काँग्रेस-अधिवेशनानंहि व्यक्तिश: किंवा सामूहिक सविनय कायदेभंगाला संमति दिली आणि गांधीनी १ फेब्रुवारी १९२२ ला व्हाइसरॉयला निर्वाणीचा संदेश पाठवून "भाषण-स्वातंत्र्य, संघटन-स्वातंत्र्य व वृत्तपत्र-स्वातंत्र्य यांसारख्या प्राथमिक हक्कांसकट इतर सर्वच मागण्या अमलांत आणण्यासाठी अहिंसक मार्गानं चळवळ करण्याखेरीज देशाला गत्यंतर उरलेलं नाही. " असं कळवलं आणि स्वत: गुजरातच्या बार्डोली तालुक्यांत प्रयोग करण्याचं ठरवलं. परंतु याच वेळी चौरीचौरी येथील हिंसक प्रकार घडल्यामुळे गांधीनी सविनय कायदेभंगाची मोहीम सोडून विधायक कार्यक्रम हातीं घेण्याच निर्णय केला. गांधींचा बार्डोलीचा हा निर्णय ऐकून मात्र अनेक राष्ट्रीय पुढ-यांना धक्का बसला. सुभाषबाबूंनी त्याचं वर्णन 'राष्ट्रीय आपत्ति ' असं केलं. मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनतेला आणि नेतृत्वाला दुबळं ठरवणारा गांधींचा हा निर्णय असल्याचं सांगितलं. गांधी हे जनतेचा उत्साह मारुन टाकत आहेत असा इतरांनी आरोप केला आणि जवाहरलाल नेहरु हेहि आश्चर्यचकित व दिङ्मूढ बनले. जवाहरालालांनी आपल्या आत्मचरित्रांतच पुढे तसं नमूद करुन ठेवलं आहे. हिंसा-अहिंसेचा वाद मग सुरु झाला आणि चळवळीची लाट ओसरली.

ब्रिटिश सरकार मात्र चळवळीची लाट ओसरण्याची वाटच पहात होतं. गांधींना अटक करण्यासाठी सरकार थांबलं होतं आणि त्याचसाठी चळवळीची लाट ओसरण्याची ते वाट पहात असलं पाहिजे. कारण १० मार्च १९२२ ला सरकारनं गांधींवर सरकारविरुध्द असंतोष पसरविण्याचा आरोप ठेवून त्यांन अटक केली. गांधींवर याबाबत सरकारनं जो खटला भरला त्यांत त्यांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यांत आली. १९०८ सालीं लो. टिळकांना हीच शिक्षा देण्यांत आली होती. हिंसा-अहिंसेचा वाद आणि बहुतेक पुढारी तुरुंगात गेलेले, त्यामुळे संघटनेंत मात्र विस्कळितपणा निर्माण झाला. १९२३ साल असंतसंच गेलं. पुढे ५ फेब्रुवारी १९२४ ला, गांधींची प्रकृति बरी नसल्यामुळे त्यांची तुरुंगांतून सुटका झाली. तुरुंगांतून सुटका होतांच जातीयवादाचं विष फैलावूं नये म्हणून आणि जातीय दंग्यांत जे अत्याचार झाले होते त्यांबद्दल प्रायश्चित्त घेण्यासाठी १९२४ च्या सप्टेंबरांत त्यांनी २१ दिवसांचं उपोषण केलं. गांधींच्या या उपोषणाचा परिणाम मात्र फारसा झाला नाही. उपोषणामुळे हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी परिषद घेतली गेली, पण य दोन जमातींत सलोखा निर्माण झाला नाही; आणि त्यापुढच्या दोन वर्षांत तर जातीयतेचं विष आणखीच फैलावलं. १९२२ ते १९२७ या काळांत जे ११२ जातीय दंगे झाले, त्यांत ४५० लोक ठार आणि ५ हजार जखमी झाले असल्याची नोंद आहे. जातीय राजकारणापासून अलिप्त रहाण्याचा उपदेश मोतीलाल नेहरु आणि मैलाना आझाद यांनी पुष्कळ केला, परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. १९२७ साल नैराश्यांतच गेलं.

१९२८ पर्यंत राष्ट्रीय स्वातंत्र्य-लढ्याला एक वेगळीच नवी अवस्था प्राप्त झाली होती सोविएट रशियानं १९२७ मध्ये आपला दहावा वाढदिवस साजरा केला आणि त्यांचे साम्यवादाचे विचार तरुणांमध्ये आणि शहरांतील कामगारांमध्ये पसरवण्याचं काम या वेळीं सुरु झालं होतं. महाराष्ट्रांतील कामगारांपर्यंत या विचाराची लाट पोंचली होती. मध्यमवर्गाकडे अधिक वळलेल्या काँग्रेसनं अधिक मूलगामी स्वरुपाचा राजकीय कार्यक्रम हातीं घ्यावा अशी कामगारांची इच्छा होती.