पंतप्रधानांच्या गोटांतून देण्यांत आलेल्या या अगदी अनपेक्षित तडाख्यानं सिंडिकेटवाले चक्रावून गेले. 'संघटनेंत मी कुठे उभा आहे आणि माझी काय अवस्था आहे, हें माझं मलाच कळेनासं झालं आहे' अशी प्रतिक्रिया निजलिंगप्पा यांनी या संदर्भात बंगलोर इथे २१ ऑक्टोबरला व्यक्त केली. कामराज, संजीव रेड्डी, निजलिंगप्पा यांनी बंगलोरमध्ये या नव्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीचा खल केला ; परंतु काँग्रेसच्या बहुसंख्य प्रतिनिधींनी दिलेल्या आव्हानाला कसं तोंड द्यावं यासाठी डाव-प्रतिडावाची आखणी करणं त्यांना जमलं नाही.
पक्षांतर्गत सुरू झालेल्या सत्तेच्या राजकारणांतील पडसाद आता दिल्लीबाहेर निरनिराळ्या राज्यांच्या राजधानींतून आणि जिल्हा-पातळीपर्यंत उमटूं लागले. संघटना आणि सरकार या दोन्ही ठिकाणीं सारा विस्कळितपणा निर्माण झाला होता. निजलिंगप्पा याना बडतर्फ करून पक्षाचीं सूत्रं ताब्यांत घेण्यावरच पंतप्रधानांच्या गोटानं सारं लक्ष केंद्रित केलं होतं. काँग्रेसचे मुख्य मंत्रिहि, दुफळीच्या वातावरणानं धास्तावले होते. त्यांच्यातील वीरेंद्र पाटील आणि हितेंद्र देसाई यांनी दोन्ही गटांत मध्यस्थी करून समझोता करण्याचा प्रयत्न केला. परंतु कामकाज वगळतां सिंडिकेटच्या टोळींतील अन्य कुणालाहि लोकप्रियतेचा आधार नाही हें आता सर्वांना उमजलं होतं. निजलिंगप्पा हे काळाच्या उलट पावलं टाकणारे, प्रतिगामी गृहस्थ असून सत्तेच्या ईर्षेनं झपाटलेल्या सिंडिकेटमधील दुष्ट बुद्धीच्या वृद्धांच्या घोळक्यांत बंदिवान होऊन पडलेले आहेत असंच पंतप्रधानांच्या गोटांत मानलं जात होतं.
अशा वातावरणांतच १ नोव्हेंबर १९६९ ला निजलिंगप्पांनी कार्यकारिणीची बैठक बोलावली. बैठकींत कोणती भूमिका स्वीकारावी यासंबंधांत सिंडिकेटच्या नेत्यांत गोंधळ होता कार्यकारिणींत दोघांची ताकत समान असल्यानं त्याचा फायदा घेऊन सुब्रह्मण्यम यांना कार्यकारिणींतून दूर करण्याच्या प्रश्नाचा निकाल लावावा असं कामराज यांनी सूचवलं होतं. त्याचबरोबर इंदिरा गांधी चव्हाण जगजीवनराम आणि फक्रद्दीन अलि अहंमद यांना पक्षातून काढून टाकण्यांत आल्याचंहि त्यांना जाहीर करून घ्यायचं होतं. कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी मग सिंडिकेट-गोटांत त्या दृष्टीनं जोरानं हालचाली सुरु झाल्या. आणि २८ ऑक्टोबरला निजलिंगप्पा यांनी इंदिराजींना एक सहापानी पत्र लिहून पक्षविरोधी कारवाया करुन पक्षांत दुफळी माजवण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांना दोष दिला. त्याचबरोबर कार्यकारिणीच्या बैठकीच्या आदल्या दिवशींच अध्यक्षांनी एक फतवा काढून सुब्रह्मण्यम् फक्रुद्दीन अलि अहंमद आणि शंकरदयाळ शर्मा या तिघांचं कार्यकारिणीचं सदस्यत्व रद्द करून टाकलं. या सगळ्या कटामागे कामराज यांचा हात आहे याबद्दल बहुसंख्य काँग्रेस-खासदारांची खात्रीच होती. कारण सुब्रह्मण्यम् यांना कार्यकारिणीच्य त्या बैठकीसाठी सदस्य म्हणून निमंत्रण देण्यांत आलं होतं आणि बैठकीपूर्वी १२ तास अगोदर आता त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यांत आलं होतं.
अंतर्गत मतभेदाचा आता अगदी कडेलोट झाला. त्यामुळे इंदिरा गांधी चव्हाण आणि त्यांच्या अन्य सहकार-यांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केला आणि त्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर १९६९ ला पंतप्रधानांच्या निवासस्थानीं - १ सफदरजंग रोड - इथेच एक वेगली बैठक आयोजित केली. अ. भा. काँग्रेसची बैठक स्वतंत्रपणें बोलवावी आणि नवीन अध्यक्षांची निवडहि करावी असा निर्णय या बैठकींत करण्यांत आला. त्याच वेळीं निजलिंगप्पा आणि त्यांचे सहकारी यांची बैठक ७ जंतरमंतर रोडवरील पक्षाच्या कार्यालयांत झाली आणि अशा प्रकारे काँग्रेस-पक्षाच्या कार्यकारिणीची उघड उघड छकलं पडून दोन बाजूला दोन कार्यकारिणी अस्तित्वांत आल्या. पक्षाच्या नेत्यांचीहि आता उघड दोन छकलं झालीं. पंतप्रधानांच्या बाजूला त्या वेळीं चव्हाण जगजीवनराम फक्रुद्दीन अलि अहंमद ब्रह्मानंद रेड्डी मोहनलाल सुखाडिया वसंतराव नाईक सुब्रह्मण्यम् उमाशंकर दीक्षित आणि डॉ. शंकरदयाळ शर्मा हे ठामपणानं उभे राहिले.