• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. २९०

लोकसभेचीं काहीं अधिवेशनं तर ‘चव्हाण अधिवेशनं’ म्हणूनच गाजलीं. वृत्तपत्रांनीच तो अभिप्राय व्यक्त केला. १९६२ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव संसदेंत दाखल झाले त्या वेळीं क्वचित् प्रसंगानुरूपच ते बोलत असत. ते कांहीशा लाजरेपणानंच वावरत आहेत, त्यांच्या ठिकाणीं आत्मविश्वास दृढ झालेला नाही, अशीच त्यांच्या संबंधीची प्रतिमा खासदारांच्या मनांत निर्माण झाली होती. परंतु गृहमंत्री म्हणून जेव्हा ते संसदेंत उभे ठाकले तेव्हा सत्ताधारी पक्षाचे समर्थ वक्ते, समर्थ प्रवक्ते म्हणून त्यांनी नांवलौकिक संपादन केला.

गृहखात्याचं मंत्रिपद स्वीकारलं त्या वेळीं आपल्याला केंद्राच्या ठिकाणचं आणि देशांतल्या निरनिराळ्या राज्यांच्या संबंधांत कांही पट्टीचं राजकारण करावं लागणार आहे याची त्यांना कल्पनाहि नव्हती.

परंतु १९६७ ते १९६९ या काळांत देशांत जाती दंगलींची भयंकर लाट उसळल्यानं, गृमंत्रालयासमोर कायदा आणि सुव्यवस्थेची एक मोठीच समस्या निर्माण झाली. बिहारमध्ये रांची इथे दंगल सुरू होऊन प्रथम ठिणगी पडली आणि देशाच्या निरनिराळ्या भागांत हें लोण पसरत राहिलं.

१९६७ च्या ऑगस्टमध्ये रांचीमध्ये एक आठवडाभर सुरू राहिलेल्या जातीय दंगलींत १५५ लोक प्राणास मुकले. मुस्लिमांच्या विरोधी, उर्दूविरोधी कांही पत्रकं वांटलीं गेलीं आणि हें दंगलीचं एक कारण ठरलं. दंगल पसरत जातांच स्वतः यशवंतराव तिकडे धांवले आणि बिहारच्या मंत्र्यांशी चर्चा करून, शांतता प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत त्यांना देऊं केली. केंद्रीय राखीव पोलिस हे तर सज्ज ठेवण्यांत आलेच; शिवाय प्रसंग निर्माण झाल्यास लष्कराची मदतहि उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यांत आली. यशवंतरावांचा दंगलग्रस्त भागांतील दौरा आणि कडक कारवाईची व्यवस्था होतांच रांचीमधील दंगलीस उतार पडला.

परंतु मागोमाग श्रीनगर इथे वातावरण तंग झालं. श्रीनगरमधील परमेश्वरीदेवी ही एक हिंदु मुलगी आणि प्रवीण अख्खतर हा मुस्लिम तरुण यांच्या विवाहांतून हें जातीय प्रकरण महिनाभर तापत राहिलं. अखेर यशवंतरावांना त्यासाठी काश्मीरला धांव घ्यावी लागली. काश्मीरच्या दौ-यात, तेथील मंत्री आणि निरनिराळ्या धर्माचे नेते, यांच्याशीं चर्चा, विचारविनिमय केल्यानंतरच त्या ठिकाणीं शांतता प्रस्थापित झाली.

रांची आणि श्रीनगर इथला जातीय तणाव कमी होतो न होतो तोंच सप्टेंबरमध्ये उत्तर-प्रदेशांत जैनपूर आणि सुचेतपूर इथे, तसंच त्याच महिन्यांत महाराष्ट्रांत अहमदनगर, सोलापूर आणि मालेगाव इथे जातीय दंगली उसळल्या. लोकसभेंत मग या प्रश्नाला तोंड फुटलं. या सर्व ठिकाणच्या जातीय दंगलीमागे, राजकीय पुढा-यांचा हात होता आणि कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवण्याची  ज्या अधिका-यांवर जबाबदारी असते, त्यांतील कांही अधिकारीहि, जातीय भावनेच्या आहारी गेलेले असल्याची सरकारची माहिती होती. एक गोष्ट मात्र खरी की, १९६७ मध्ये आंध्र, बिहार आणि उत्तर-प्रदेश या राज्यांत जातीय दंगलींनी उच्चांक गाठला.

पुढच्या वर्षांतहि हें लोण पसरत राहिलं आणि १९६८ मध्ये मिरत, करीमगाव, अलाहाबाद, केरळ, आणि म्हैसूर असे कांही भाग जे जातीय दंगलीपासून अलिप्त होते तिथेहि हा तणाव पसरला. त्या वर्षी उत्तर-प्रदेश, आसाम, बिहार आणि पूर्व-बंगाल या राज्यांत जातीय दंगलींनी कहर माजवला. जातीय दंगली काबूंत आणण्याच्या कामीं राज्य-सरकारं आणि राज्यांतील नेते हे अपयशी ठरले. जातीय दंगली माजवण्यामागे गुंडांचा हात आहे असेच निष्कर्ष पुढा-यांना आणि बुद्धिवाद्यांनी काढले. दंगलीमध्ये गुंडांचा हात होता ही जरी वस्तुस्थिति होती, तरी पण केवळ त्यांच्यामुळे दंगलींचा वणवा भडकला नव्हता. राजकारणी मंडळींचा त्यामध्ये प्रामुख्यानं हात होता. किंबहुना देशांत सर्वत्र अशांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या हेतूनं जाणूनबुजून जातीय दंगलींची योजना तयार करण्यांत आलेली होती.