खेमकरण भागांत तर भारताच्या सैन्यानं अतुलनीय असा पराक्रम केला. पाकिस्ताननं २२५ पॅटन रणगाड्याच्या सामर्थ्यानिशी भारताच्या रोखानं हल्ला चढवला होता. ३० चौरस मैलांचं क्षेत्र पॅटन रणगाड्यांनी व्यापलं होतं. रणगाड्यांच्या चढाईचं खास प्रशिक्षण घेतलेलं पाकिस्तानचं हें पहिल्या प्रतीचं सैन्यदल होतं. रणगाड्यांचं भारताचं सामर्थ्य मात्र तोकडं होतं. पाकिस्ताननं रणांगणांत आणलेल्या रणगाड्यांच्या तुलनेनं हें प्रमाण ४:१ असं होतं. पॅटन रणगाड्यांनी भारताच्या हद्दींत १५ मैलांपर्यंत भूमीचा कबजाहि केला होता. परंतु भारताच्या सैन्यानं गनिमी काव्याचा वापर करून या अजस्त्र पॅटन रणगाडयांचा धुव्वा उडवला. इतकंच नव्हे तर, ९७ पॅटन रणगाडयांचा ताबा घेतला. ‘पॅटन रणगाड्यांची स्मशानभूमि’ असंच मग खेमकरणला संबोधण्यांत येऊं लागलं. शेवटी लाहोरचा बचाव करण्यासाठी, पाकिस्तानच्या सैन्याला इचोगिल कॅनॉलवरील पूल उडवून देऊनच आपल्या जिवाचा आणि लाहोरचा बचाव करावा लागला. सियालकोटमध्येहि रणगाड्यांच्या लढाईची अशीच धुम:श्चक्री झाली.
पंजाबमध्ये ही धुम:श्चक्री सुरू असतांना पाकिस्ताननं विमानांतून बाँबफेक करून भारताच्या हद्दींतील कांही नागरी भाग उद्ध्वस्त करण्याचाहि प्रयत्न केला. भारताच्या हद्दींत घुसून विमानं पाडण्याचा उपक्रमहि त्यांनी केला. गुजरातचे मुख्य मंत्री बलवंतराय मेहता हे विमानांतून चालले असतांना एक दिवस पाकच्या हल्ल्याला बळी पडले; परंतु पाकिस्तानच्या रोख प्रामुख्यानं भारताच्या लष्करी तळावर होता. युद्धसमाप्ति होण्याच्या आदल्या दिवशीं मात्र अमृतसर नजीकच्या चिराटा या नागरी भागावर बाँब टाकून तो भाग उद्ध्वस्त करण्याचा पाकच्या बाँबफेक्या विमानांनी प्रयत्न केला.
सप्टेंबरच्या १ तारखेला ख-या अर्थानं लढाईला तोंड लागलं आणि या युद्धाचा शेवट २३ सप्टेंबरला पाकिस्तानच्या पराभवानं झाला. त्याच दिवशीं युद्धसमाप्तीची घोषणा दोन्ही बाजूंनी झाली. अमेरिका, ब्रिटन आणि रशिया यांच्या दबावामुळेच अखेर हें युद्ध थांबलं. युद्धसमाप्तीनंतर मात्र बरंच कांही बोललं जाऊं लागलं. युद्धसमाप्ति स्वीकारण्याबाबत शास्त्रीजी आणि चव्हाण यांच्यात मतभेद होते असंहि दर्शवण्याचा प्रयत्न झाला.
वस्तुत: असं कांही घडलेलं नव्हतं असा खुलासा नंतर स्वत: यशवंतरावांनीच केला. राष्ट्रसंघानं युद्धबंदीसंबंधी ठराव ६ सप्टेंबरला केला होता. शास्त्रीजींना तों मान्य होता आणि शास्त्रीजींना त्या संदर्भांत यशवंतरावांचा पाठिंबाच होता. यंशवंतरावांची या संदर्भांतील भूमिका एवढीच होती की, युद्ध कांही आपण पुकारलेलं नाही; परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर त्याचा निर्णय करण्याची हुकमाचीं पानं आपल्या हातांत आल्या नंतर, पाकिस्ताननं, शांततेचं निश्चित आश्वासन दिल्याखेरीज त्याला कैचींतून मुक्त करण्यांत हशील नाही. युद्धसमाप्ति कधी होते यासाठी भारत मोठा आतुर आहे अशी या देशाची प्रतिमा निर्माण होणंहि योग्य नव्हे. युद्धसमाप्ति केव्हा स्वीकारायची या वेळेला तर महत्व आहेच, शिवाय ती कोणत्या परिस्थितींत स्वीकारायची यासंबंधीच्या तात्विक विचारावर कदाचित् मतभेद असूं शकतील. मंत्रिमंडळांत युद्धसमाप्ति स्वीकारण्याबाबत कांही तीव्र मतभेद आहेत किंवा त्या संदर्भांत कांही बाजू निर्माण झाल्या आहेत असं मुळीच नाही. भारत कांही अशांतता निर्माण करत आहे असा दोष कोणाला चिकटवतां येऊं नये एवढाच प्रयत्न आहे.
युद्धसमाप्तिनंतर पुढच्याच आठवड्यांत मग यशवंतरावांनी पंजाब आघाडीचा दौरा करून, लष्करी अधिकारी, विशेषत: जवान आणि ‘नॅट’चे वैमानिक यांना धन्यवाद दिले. त्यांच्यासमावेत लेफ्टनंट जनरल कॅंडेथ हे होते. युद्धाच्या या संपूर्ण काळांत कांही किरकोळ मतभेद वगळतां सैन्यदलाच्या सर्व अधिका-यांनी एकजुटीनं आणि एकजीव बनूनच आपापली जबाबदारी पार पाडली. सरसेनापति चौधरी आणि एअर-मार्शल अर्जनसिंग यांनी, पाकिस्तानचे हल्ले परतवण्यांत आणि आक्रमक पवित्रा स्वीकारण्यांत कमालीचं शौर्य प्रगट केलं. या दोन्ही अधिका-यांनी, विशेषत: अर्जनसिंग यांनी, जवानांचं मनोधैर्य शाबूत राखण्याचं फार मोठं काम केलं.