संरक्षण-मंत्रालय आणि एकूण लष्करी यंत्रणा यांचा संपूर्ण मुखवटा बदलण्याचं आणि त्यामध्ये अधिक इष्ट असे फेरबदल साध्य करण्याचं काम करण्यांत यशवंतरावांनी विशिष्ट असा पल्ला गाठला होता, तरी पण त्यांच्या अंगच्या गुणांचं आणि कारभारकुशलतेचं दर्शन ख-या अर्थानं भारत-पाकिस्तान युद्धाच्या प्रसंगीं १९६५ सालांत सबंध देशाला आणि जगांतल्या विविध राष्ट्रांना प्रथमच घडलं.
संरक्षणखात्याचीं सूत्रं स्वीकारल्यानंतर १९६२ सालापासून त्यांनी जागरूक राहून अहोरात्र काम केलं होतं. भारताच्या लष्करी दलांत आणि त्याच्या सामर्थ्यांत इष्ट ते बदल घडत राहिले असल्याचं चित्र देशासमोर होतं. लष्करी सामर्थ्याबद्दल आता आत्मविश्वास निर्माण झालेला होता. त्यामुळे पाकिस्ताननं १९६५ मध्ये आक्रमण करतांच भारत तें आक्रमण सर्व सामर्थ्यानिशी परतवून लावील असा लोकांच्या मनांत विश्वास होता. लष्करामधील अधिका-यांना प्रोत्साहन देण्याचं आणि जवानांशीं संवाद करून त्यांच्याशीं संपर्क ठेवण्याचं कसब या संरक्षणमंत्र्यांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभापासूनच दाखवलं होतं. त्यामुळे यशवंतराव हे सा-या लष्कराचा, अभिमानाचा विषय ठरले होते. आपली सर्व शक्ति त्यांच्या पाठीशीं उभी करण्याची जिद्द अधिका-यांत आणि जवानांमध्ये निर्माण झालेली होती. १९६५ च्या लढाईच्या वेळीं याचा प्रत्यय देशाला आला.
संरक्षणविषयक कोणत्याहि प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरसेनापति जनरल चौधरी यांना संरक्षणमंत्र्यांचे दरवाजे खुले होते. राजकीय आणि सरकारच्या धोरणाच्या मर्यादेंत राहून कोणताहि निर्णय करण्यास सरसेनापतींना संरक्षणमंत्र्यांची मुभा होती. संरक्षणविषयक मूलभूत समस्या समजून घेण्यासाठी यशवंतराव नेहमीच उत्सुक असत आणि त्यांच्यापर्यंत ज्या समस्या पोंचल्या त्यांचं गांभीर्य त्यांनी कधीच कमी लेखलं नाही. संरक्षण-मंत्रालय आणि लष्कराचं प्रमुख कार्यालय यांमध्ये सातत्यानं दुवा राहील अशाच पद्धतीनं त्यांनी कारभाराची आखणी केली होती. लष्कराच्या प्रमुख अधिका-यांबरोबर होणा-या चर्चेच्या वेळीं तातडीनं एखादा निर्णय करण्याचा प्रसंग निर्माण होत असे. संरक्षणमंत्री तसा तोंडीं निर्णय करतहि असत; परंतु असा एखादा तोंडीं किंवा अनौपचारिकरीत्या निर्णय दिल्यानंतर तो निर्णय त्यांनी पुन्हा कधी बदलला नाही. दिलेल्या निर्णयाशींच ते ठाम रहात असत. हा आपला, हा परका अशी वागणूक लष्करी अधिका-यांना त्यांच्याकडून कधी दिली गेली नाही. भारत-पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळींहि जनरल चौधरी यांना यशवंतरावांकडून सातत्यानं प्रोत्साहनच मिळत राहिलं होतं. १९६२ मध्ये लष्करामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भांत हा बदल वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
भारत-पाकिस्तानच्या दरम्यान १९४७ पासूनच कुरापती सुरू झालेल्या होत्या. काश्मीरच्या प्रश्नावरून १९४७-४८ मध्येच या दोन राष्ट्रांत मोठं युद्ध होण्याचा प्रसंग पाकिस्ताननं निर्माण केला होता. परंतु त्या वेळीं पाश्चात्त्य राष्ट्रांनी, विशेषतः ब्रिटन आणि अमेरिका यांनी दबाव आणून दोन्ही राष्ट्रांना युद्धाच्या पवित्र्यापासून बाजूला केलं होतं. भारताच्या फाळणीच्या वेळीं, पाकिस्तानच्या तुलनेनं भारताकडे लष्करी बळ अधिक जमा झालेलं असल्यानं पाकीस्तानची ती एक डोकंदुखी होती. भारताकडून पाकिस्तानवर कोणत्याहि क्षणीं आक्रमण होण्याची धास्ती पाकिस्तानला त्यामुळे वाटत राहिली होती. परंतु जॉन फास्टर डल्लस यांच्या आग्रहानुसार अमेरिकेनं १९५४ पासून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणांत शस्त्रास्त्रांची मदत देण्यास सुरुवात केली. परिणामीं पाकिस्तानची मुजोरी वाढत राहिली.