तरी पण दुस-या दिवशी यशवंतराव पंडितजींच्या निवासस्थानी - ‘तीनमूर्ति’ इथे गेले. लालबहादूर शास्त्रीहि तिथेच होते. नेहरू त्या वेळी मनाच्या वेगळ्याच अवस्थेत होते. मनावरील ताण वाढलेला असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
“अरे, तुम्ही अजून मुंबईला गेला नाहीतॽ” यशवंतरावांना पहातांच नेहरू गरजले.
“विचार कसला करतांॽ तुम्हाला इथे ताबडतोब परत यायचं आहे”-नेहरू
बोलण्यासारखं आता यशवंतरावांजवळ कांही उरलंच नव्हतं. निर्णय झाला होता. अधांतरी असं आता कांही राहिलं नव्हतं. चव्हाण मुंबईला परतले ते मनाचा हिय्या करूनच! अन् मागोमाग १४ नोव्हेंबरला यशवंतराव संरक्षणमंत्री बनल्याचं पं. नेहरूंनी दिल्लीत जाहीरहि केलं.
संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केल्याची घोषणा झाली. त्यानंतर तीनच दिवसांनी १७ नोव्हेंबरला चीननं, सहा ब्रिगेडच्या प्रचंड लष्करी बळानिशी नेफा भागांत पुन्हा एकदा जोराची मुसंडी मारली. सेला पास, बोमदि-ला सर करून चीनचं सैन्य आसामच्या टेकड्यांच्या पायथ्यापर्यंत पोचलं आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील तेजपूर गिळंकृत करण्याच्या पवित्र्यांत उभं ठाकलं. ब्रह्मदेशाच्या बाजूनं चीननं आणखी एक नवी आघाडी उघडली आणि वालाँगच्या रोखानं कूच करायला सुरुवात केली. भारतीय सैन्यानं या वेळी प्राणपणानं झुंज दिली, परंतु शत्रुसैन्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. भारताच्या हद्दीत ४० मैल आंत चीननं मुसंडी मारली होती.
वालाँग पडल्याची खबर तर १८ नोव्हेंबरला दिल्लीला पोचली. त्यासरशी दिल्ली गडबडली. गंभीर आणि तितक्याच दुःखद घटना एकामागोमाग एक घडच राहिल्या होत्या. पं. नेहरू सचिंत बनले. देशाचं स्वातंत्र्य टिकवण्याची मूलभूत समस्याच त्यांच्यासमोर निर्माण झाली होती. पं. नेहरूंनी मग अमेरिकेचे तरुण अध्यक्ष केनेडी यांच्याकडे धांव घेतली आणि भारताला हवाई साहाय्याची आवश्यकता असल्याचा संदेश पाठवला. भारतांतली मोठी शहरं आणि औद्योगिक वसाहती, विशेषतः गंगेच्या खो-यांतल्या शहरांचं आणि औद्योगिक वसाहतींचं रक्षण होण्याच्या दृष्टीनं पं. नेहरूंनी प्रे. केनेडी यांचं सहकार्य मागितलं होतं.
त्या काळांत दिल्लीत आणि देशांत सर्वत्र घबराट निर्माण होऊन अफवांचा सुकाळ झाला होता. चीनचं सैन्य तेजपूरचा ताबा घेऊन, दिल्लीवर ५०० छत्रीधारी सैनिक उतरवणार आहे, ले. ज. कौल यांना चीननं युध्दकैदी म्हणून ताब्यांत घेतलं आहे, या आणि अशा प्रकारच्या अनेक अफवांचे ढग जमा झाले होते.
१९ नोव्हेंबरला सरसेनापति थापर हे तेजपूर इथून दिल्लीला परतले आणि दिल्लीला पोचताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान पं. नेहरू यांच्याकडे दिला. थापर हे हंगामी म्हणूनच काम पहात होते. त्यांनी राजीनामा सादर करतांच, पं. नेहरूंनी त्या संदर्भात राष्ट्रपति डाँ राधाकृष्णन् यांच्याशी चर्चा केली. लष्करासाठी आता नवा सरसेनापति निश्र्चित करावा लागणार होता. डाँ राधाकृष्णन् यांनी या चर्चेच्या वेळी जनरल जे. एन्. चौधरी यांची नियुक्ति त्या जागेवर करण्याविषयी पंडितजींना सुचवलं. इतकं घडतांच पंतप्रधानांनी मग दुस-या दिवशी लोकसभेत जाहीर केलं की, सरसेनापति थापर यांना प्रकृतीच्या कारणासाठी रजेवर पाठवण्यांत येत असून सरसेनापति म्हणून त्या जागेची सूत्रं जनरल चौधरी हे स्वीकारत आहेत. ले. ज. कौल हेहि मग राजीनामा सादर करून मोकळे झाले.