या एका वर्षाच्या कालावधीचा आढावा घेतला, तर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला केवढा जबरदस्त वेग प्राप्त झालेला होता याचं दर्शन घडूं शकतं. नव्या जीवनाचा नाद मला ऐकूं येत आहे असा कवि कुसुमाग्रजांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी काव्यमय आशावाद व्यक्त केला होता. एका वर्षाच्या काळांतच राज्याच्या ग्रामीण जीवनांतून नव्या जीवनाचे प्रतिनाद ऐकूं येऊ लागले होते. राज्य आणि जनता समृध्दीसाठी एकजीव होत असल्याची सुचिन्हं उमटूं लागली होती.
प्रादेशिक व आर्थिक विषमता दूर करून राज्याची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी करण्याचं कार्य प्रचंड वेगानं सुरू होतं. खनिज संपत्ति, मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधनसामग्री यांची समृध्द देणगी मिळालेल्या कोकण भागाच्या विकासाचे आराखडे नव्यानं तयार झाले होते. शिक्षण, दळणवळण, पाणीपुरवठा इत्यादि बाबतींत मराठवाड्याच्या खास गरजांची दखल घेतली गेली होती.
विदर्भांतील विणकर-समाजाची आजवर उपेक्षा झाली होती. या समाजाची स्थिति सुधारण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून विणकरांची एक सूतकताईची सहकारी गिरणी नागपूर इथे सुरू करण्याच्या ५० लाख रुपये खर्चाच्या योजनेला चालना देण्यांत आली होती. लोकांची भाषा ही राज्यकारभाराची भाषा व्हावी यासाठी आवश्यक ती पार्श्र्वभूमि निर्माण करण्यासाठी भाषा-विभाग नव्यानं जन्माला आला होता. औद्योगीकरण, जमीन-सुधारणा, जलसंपत्तीचा उपयोग, शिक्षणप्रसार आणि सुधारणा, जमीनधारणा, दलितांचे प्रश्र्न, लोकशाही विकेंद्रीकरण इत्यादि क्षेत्रांत भराभर क्रांतिकारक पावलं टाकण्यांत आली होती.
राज्याच्या पहिल्या वर्षाबरोबरच देशाचं नियोजनाचं पहिलं दशक संपणार होतं. देश नियोजनाच्या दुस-या दशकांत आणि महाराष्ट्र राज्य दुस-या वर्षांत आता प्रवेश करणार होतं. गेल्या वर्षभराचा प्रशासकीय कारभार यशवंतरावांनी मोठ्या जिद्दीनं केला. कारभार स्वच्छ आणि वक्तशीर रहाण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते त्याबाबत यशवंतरावांची भूमिका तडजोडीची कधीच राहिली नाही. प्रशासकीय कारभाराच्या बाबतींत ते मोरारजींचे अनुयायी समजले जात; परंतु यशवंतरावांनी प्रशासकीय कारभारांत आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला होता. प्रशासनांत त्यांनी उत्साहाचं, विश्र्वासाचं वातावरण तर निर्माण केलंच, शिवाय त्याला व्यवहारी आणि मानवतेचा एक नवा दृष्टिकोन प्राप्त करून दिला. लोकशाही राज्यकारभाराच्या संदर्भात, महाराष्ट्रांतील या पूर्वीच्या राज्यकारभाराच्या पार्श्र्वभूमीवर यशवंतरावांचं हे कार्य विशेष उठून दिसू लागलं.
राज्याच्या पहिल्या वर्षाच्या वाटचालींतच यशवंतरावांच्या कर्तृत्वाची प्रतिमा देखणं रूप धारण करून जनतेसमोर उभी राहिली. यशवंतराव हे चिंतनशील आहेत, अनुभवशील आहेत. त्यांच्या भाषणात साहित्यिक गुण आणि विचारधन ही दोन्ही आढळतात आणि ते संयमानं व विवेकानं बोलतात असं प्रशस्तिपत्र म. म. दत्तो वामन पोतदार यांनी पुण्याच्या एका सभेत दिलं. महाराष्ट्रांतल्या लहानमोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून ते विचारधन उधळत होते; परंतु अजून संकटं संपलेली नव्हती. शेती, उद्योग, सहकार, शिक्षण, कृषि-उद्योग आदि कार्यक्रमांत ते व्यग्र असतांनाच संपूर्ण राज्याला हादरा देणारी एक दुर्दैवी घटना पुण्यांत घडली.
१२ जुलै १९६१ हा तो दिवस. पानशेत धरण आणि मागोमाग खडकवासला धरण कोसळलं आणि त्या प्रचंड पुराचा तडाखा पुणे शहराला बसून शहर धुवून निघालं. या पुरानं शेकडो घरं, घरांतली मालमत्ता धुऊन नेली आणि हजारो लोक अक्षरशः गृहहीन, निर्वासित बनले. अनेकजण प्राणास मुकले. पुणे शहरावर अस्मानी सुलतानी कोसळली आणि संपूर्ण राज्यासमोर या संकटानं एक मोठं प्रश्र्नचिन्ह उभं केलं.