यशवंतरावांच्या अंतःकरणांतून स्वयंस्फूर्तीनं, नैसर्गिकरीत्या हे शब्द त्या दिवशी बाहेर पडले खरे, परंतु यशवंतराव हे द्रष्टे पुरुष आहेत असं त्या वाणीनंच पुढे सिध्द केलं. महाराष्ट्र अस्तित्वांत आल्यानंतर पुढच्या दोनच वर्षांत त्यांना स्वतःलाच हिमालयाच्या संरक्षणाकरिता दिल्लीला धांव घ्यावी लागली. पं. नेहरूंना त्यांच्या हयातींतच यशवंतरावांच्या द्रष्टेपणाचा हा अनुभव आला.
ज्ञानेश्र्वरांच्या पसायदानानं यशवंतरावांना अंतर्मुख केलं होतं. एका वेगळ्याच क्षितिजाकडे त्यांच्या मनानं झेप घेतली होती. मनाच्या त्याच अवस्थेत उत्स्फूर्तपणे ते बोलत राहिले. पंडितजींनी आपल्या भाषणांत परिश्रमाच्या घामानं महाराष्ट्र आणि राष्ट्र रक्षण्याचा संदेश दिला होता. पंडितजींनी ज्या क्षणाला हा संदेश दिला त्याच्या पूर्वी तीस वर्षांपासून यशवंतराव, महाराष्ट्रांत परिश्रमाच्या युगधर्माचं यथाशक्ति पालन करत राहिलेले असल्यानं पंडितजींचा तो शब्दरूप संदेश त्यांच्या अंतःकरणाशी त्या वेळी भिडला आणि त्यांतूनच महाराष्ट्राच्या वतीनं राष्ट्र-रक्षणासाठी हाक येतांच धांव घेण्याचं आश्र्वासन त्यांच्या मुखांतून बाहेप पडलं. नवोदित महाराष्ट्र वाढत राहो, त्याचं तेज वाढत राहो, आणि हे तेज भारताच्या आणि मानवाच्या कल्याणासाठी खर्ची पडो अशी प्रार्थना त्याच मनाच्या अवस्थेत त्यांनी केली. अदृश्य परमेश्र्वरी शक्तीनं परिसर भारून टाकावा असा अनुभव त्या दिवशी राजभवनाच्या परिसरांत आला. सर्वत्र उत्साह, आनंद, समाधान निर्माण झालेलं असतांनाच पं. नेहरूंनी नव्या राज्याला आशीर्वाद दिला.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांचा सिंहाचा वांटा होता. राजभवनामधील समारंभाला त्याहि स्वतः उपस्थित होत्या. त्या वेळी श्रीप्रकाश हे राज्यपाल होते. राष्ट्रपतींचा शुभेच्छा-संदेश त्यांनीच वाचून दाखवला. इंदिरा गांधींनी महाराष्ट्र राज्य हे सर्व दृष्टींनी महान् ठरेल अशा सदिच्छा व्यक्त केल्या. राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी नवं राज्य झटेल आणि राष्ट्र-संरक्षणाच्या कार्यांतला आपला वांटा उचलील अशी अपेक्षा व्यक्त करून पं. नेहरूंनी आशीर्वाद दिला.
या समारंभाचे यजमान यशवंतराव चव्हाण हे होते. पंतप्रधानांचे आभार त्यांनीच मानायचे होते. आभार मानण्याचा ढंग ठरलेला असतो, शब्दहि ठरलेले असतात; परंतु यशवंतरावांची त्या दिवशींची, त्या क्षणाची मनःस्थिति कांही वेगळीच होती. आभाराचे शब्द त्यांच्या मुखांतून बाहेर पडत होते हे खरं, पण सह्याद्रीच्या शक्तीनं हे शब्द उच्चारण्यासाठी त्या दिवशी यशवंतरावांच्या माध्यमाचा उपयोग केलेला असावा. कारण त्यांच्या मुखांतून त्या क्षणाला बाहेर पडणा-या प्रत्येक शब्दांतून सामर्थ्य प्रतीत होत राहिलं, भविष्यवाणी प्रगट झाली. पुढच्या काळांत ही वाणी संपूर्ण सत्य ठरली, असं इतिहास सांगतो.
आभारप्रदर्शन करतांना पाहुण्यांवर स्तुतिसुमनं उधळण्याची प्रथा प्रसंगानुरूप ठरलेली असते. यशवंतरावांनी पंडितजींच्या भल्या मनाची आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाची स्तुति तर केलीच, शिवाय भविष्यवाणीहि ते बोलून गेले. त्या नेमक्या वेळी ते विचार, ते शब्द कसे स्फुरले, ते शब्द कुठून आले, ते नंतरच्या काळांतहि त्यांना कधीच सांगता आलेलं नाही. घडलं ते उत्स्फूर्त, बोलले तेहि उत्स्फूर्त!
सोनियाचा दिवस महाराष्ट्राच्या जीवनांत आज उगवला होता. मध्यरात्री पंतप्रधानांच्या हस्ते नवराज्याचं उद्घाटन झालं, एकभाषी महाराष्ट्र व त्याचं सरकार अस्तित्वांत आलं.