अनेक अडचणींतून मार्ग काढत असतां महाराष्ट्र राज्याची स्थापना होत आहे. बंधुभावानं आपण एकत्र आलो आहोत. हा बंधुभाव आपल्याला वाढीस लावायचा आहे. ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाल’ या कवि विनायकांच्या वचनाप्रमाणे महाराष्ट्राचं भवितव्य उज्जवल आहे अशी आपणां सर्वांची श्रध्दा आहे. नव्या भारतांत आपल्याला नव्या महाराष्ट्राची उभारणी करायची आहे. बुध्दिमान, प्रामाणिक व कष्टाळू महाराष्ट्र या कामांत मागे पडणार नाही, याबद्दल माझ्या मनांत शंका नाही.
१९५६ सालापासून यशवंतरावांनी सा-या महाराष्ट्राचा कोनाकोपरा धुंडाळला होता. हजारो लोकांना भेटून चर्चा, वाटाघाटी केलेल्या होत्या. महाराष्ट्राची जमीन, निसर्ग, इतिहास, संस्कृति, परंपरा, येथील माणसं आणि माती या सर्वांसंबंधी त्यांच्या अंतःकरणांत जिव्हाळा, आपुलकी, प्रेम होतं. भावनेनं भरलेलं मनानंच ते शिवनेरीवर पोचले आणि आकाशवाणीवरूनहि बोलले.
शिवजयंतीचा तो दिवस. शिवाजीमहाराजांचं कर्तृत्व, नीति, राजकारण, कारभार, महाराष्ट्राबद्दलची महाराजांच्या मनांतली चिंता, त्यांचं शौर्य, धैर्य, चारित्र्य आणि लोककल्याणाची विधायक दृष्टि यांच्या आठवणींनी महाराष्ट्राचं विचारी मन भरून गेलं होतं. नव्या महाराष्ट्राच्या स्वराज्याची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्रांतल्या जनतेला महाराजांच्या शासनकार्यांतील विधायक दृष्टीचा, कर्तव्यपरयणतेला मासला सांगतांना, शिवाजीमहाराजांचे अमात्य रामचंद्र नीलकंठ यांच्या ‘आज्ञापत्रां’तल्या एका बहारदार वर्णनाचा उतारा यशवंतरावांनी लोकांना ऐकवला. “तस्करादि अन्यायी यांचे नांव राज्यांत नाहीसे केले. देशदुर्गादि, सैन्यादि बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.”
यशवंतरावांनी यासारखे, महाराजांच्या कार्यक्षमतेचे आणि विधायक लोककल्याणाची दृष्टि देणारे शब्द उद्धृत केले. त्यामागचा अर्थ, संबंधितांनी, विशेषतः त्यांच्या सरकारांतल्या सहका-यांनी समजून घ्यावा आणि काळजीकाट्यानं चारित्र्याचं जतन त्यांनी करावं असं सांगण्याचाच त्यांचा हेतु असला पाहिजे. महाराष्ट्रसहित साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी दक्ष आणि जागरूक असलं पाहिजे, छत्रपतींचा तो वारसा सांभाळला पाहिजे याची आवर्तनं त्यांनी या भाषणांतून केली. शिवनेरीवरून परतलेला जनसागर भावनांच्या या लाटा बरोबर घेऊनच गावोगाव पोचला.
यशवंतरावांचं चित्त आता मुंबईनं वेधून घेतलं, नव-राज्याचा उत्सव शिवनेरीवर त्यांनी सुरू केला. आता मुंबईत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू नवं राज्य अस्तित्वांत आल्याचं महाराष्ट्राला जाहीर करणार होते. नव्या राज्याच्या उद्घाटनासाठी ते मुद्दाम दिल्लीहून येणार होते. महाराष्ट्राच्या जीवनांतल्या अत्युच्च भाग्याचा, आनंदाचा क्षण आता कांही तासांवर येऊन ठेपला होता. मुंबईतले लक्षावधि लोक त्या आनंदसागरांत डुंबण्यासाठी आतुर झालेले होते. नव-राज्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त १ मे १९६० हा होता.
३० एप्रिलच्या रात्री १२ वाजून १ मिनिट होताचं मे महिन्याची पहिली तारीख झळकणार असल्यानं उद्घाटनाचा मुहूर्तहि मध्यान्हीचाच निश्र्चित झालेला होता. हा समारंभ होणार होता मुंबईच्या राजभवनाच्या पटांगणांत. पण तो होता सरकारी समारंभ. जनता-समारंभासाठी स्थान निवडलेलं होतं शिवाजीपार्कचं भव्य मैदान. याच समारंभांत पं. नेहरूंना महाराष्ट्राचं खरंखुरं दर्शन घडणार होतं, नव-राज्यनिर्मितीच्या भावना पाह्यला मिळणार होत्या.