• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

इतिहासाचे एक पान. २१७

या थोर परंपरेचा वारसा घेऊन महाराष्ट्रास पुढे जायचं आहे. आपला हा जो वारसा आहे त्याची जाणीव ठेवायची आहे. हा वारसा जतन करणं मोठं कठीण आहे. पैशाचा खजिना खर्च करून मोकळा करता येतो. पण हा वारसा खर्च करता येत नाही. तो बरोबर घेऊन सदैव पुढे जावं लागतं; पुढच्या जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते. महाराष्ट्रांतल्या तीन कोटि जनतेच्या मनांत आज शिवनेरी आहे. तिची आठवण झाली नाही असं जागतं मन आज महाराष्ट्रात सापडणार नाही. त्या सर्वांना या नव्या महाराष्ट्र राज्याचा गाडा चालवायचा आहे. नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीकरिता आपण आता प्रतिज्ञाबध्द आहोत. या आनंदोत्सवाची स्मृति म्हणून या राज्याची जी मुद्रा निश्र्चित केली आहे, तिच्यावर—

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्र्ववंदिता
महाराष्ट्रस्य राज्यस्थ मुद्रा भद्राय राजते

ही शिवाजीमहाराजांनी निवडलेली वाक्यंच घेतली आहेत. याचा अर्थच हा की, ही राजसत्ता लोककल्याणाकरिता राबणार आहे.

“नवमहाराष्ट्राच्या जन्मवेळची कुंडली महाराष्ट्रापुढे सतत रहाणार आहे. महाराष्ट्रांत आज असलेल्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहांचा परिणाम महाराष्ट्राच्या भवितव्यावर होणार आहे. आज महाराष्ट्रांत अनेक पक्षोपपक्ष आहेत. ते पक्ष राहिले पाहिजेत. ते राहूं नयेत असं मी म्हणणार नाही. लोकशाहीचं राजकारण चालवण्यासाठी अनेक पक्ष असावे लागतात. पण फार पक्ष असणं हे हितावह नाही. मी तर असं म्हणेन की, पुढची अनेक वर्षं, निदान तिसरी पंचवार्षिक योजना पूर्ण होईपर्यंत तरी, पक्षोपक्षांच्या राजकारणाचा गोंधळ इथे माजूं नये. प्रत्येक पक्षास स्वतःचं असं खास राजकारण असतं. परंतु महाराष्ट्रापुढे फक्त एकच राजकारण आहे आणि ते म्हणजे सर्वांगीण विकास साधण्याचं राजकारण. महाराष्ट्रापुढे असलेल्या मूलभूत सामाजिक व आर्थिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं खटपट करणं ते महाराष्ट्राचं राजकारण होय.

“महाराष्ट्राला बुध्दिमत्तेची व निसर्गाची देणगी आहे, असं आपण म्हणतो. आजपर्यंत परसत्तेमुळे व भाषिक राज्य नसल्यामुळे या देणगीचा वापर करतां येत नव्हता अशी तक्रार होत होती. आता कोणती तक्रार आपण करणारॽ महाराष्ट्राच्या कल्याणाचा सिंहगड तुम्हांला स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकायचा आहे. संकटं असतील, पण त्यांना सामोरं जाऊन झेलल्याशिवाय ती संपत नाहीत. त्यांना पाठ दाखवली की ती अधिकच पाठीशी लागतात. या संकटांवर मात केली पाहिजे. विकास-कार्याच्या मोहिमेवर निघालेले आपण, सिंहगड चढून आलो आहोत. या गडावरून पळून जाण्याचा प्रयत्न कुणी करणार असतील, तर त्यांना सांगावसं वाटतं की, ‘पळून कुठे जातांॽ दोर केव्हाच तोडून टाकले आहेत.’

“महाराष्ट्राचं राज्य म्हणजे सामान्य माणसाचे प्रश्र्न सोडवण्याचं राज्य होय, या दृष्टिकोनांतून या राज्याकडे पहा. महाराष्ट्रापुढे अनेक समस्या आहेत. महाराष्ट्रांतल्या माणसाला प्रश्र्नाची तीव्रता समजून दिली, तर तो उत्साहानं उठतो; पण कर्तव्याची जाणीव दिली नाही, तर पुन्हा झोपतो. म्हणून त्याला सांगितलं पाहिजे की, ‘तूं राजा आहेस. अविकसित, दुष्काळी अशा कडकपारींनी बनलेल्या सह्याद्रीचा तूं राजा आहेस.’ दुःखांत असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणं हे राजाचं कार्य आता प्रत्येक मराठी माणसानं केलं पाहिजे. एकेक माणूस, एकेक मूल, हे सावली देणारं झाड आहे असं मानून त्यास खतपाणी घातलं पाहिजे.