बळवंतराव कराडच्या कोर्टात बेलिफ होते तेव्हा ते ज्यांच्या हाताखाली काम करीत होते त्याच न्यायाधिशांना भेटावं आणि ज्ञानोबाला मार्गी लावावं, असा हा विचार होता. या विचारसरशी विठाईनं आपली कुटुंब-कहाणी त्या न्यायाधिशांपर्यंत पोंचविली. बळवंतरावांच्या मोठ्या मुलाला बेलिफाच्या नोकरींत रूजूं करुन घेण्यासाठी मग खटपट सुरु झाली. न्यायाधीशहि भला माणूस. चव्हाण-कुटुंबाची कहाणी ऐकून त्याचं मन द्रवलं. पण तेवढ्यानं भागणारं नव्हतं. नोकरींत रुजूं करुन घेणं हे प्रत्यक्ष त्याच्या स्वाधीन नव्हतं. त्यासाठी जिल्हा न्यायाधिशांची अनुमति आणवावी लागणार होती. त्या न्यायाधिशांनी मग ही अडचण पुढे केली आणि विठाईला सातार येथे जिल्हा-न्यायाधिशांपर्यंत पोंचण्यचा सल्लाहि दिला.
विठाईला आता त्यासाठी साता-याला जावं लागणार होतं. माऊलीनं मग तोहि हिय्या केला. मुलांना धीर दिला आणि एक दिवस साता-याला जाण्यासाठी प्रस्थान ठेवलं. त्या काळांत कराडहून साता-याला पोंचायचं तर रेल्वेनं कोरेगावपर्यंत आणि तिथून अकरा मैलांवर बैलगाडीनं साता-याला यावं लागत असे. एक दिवस हें कुटुंब कराडहून निघालं आणि छकड्यानं साता-यांत दाखल झालं. ज्ञानोबा आणि तीन लहानगींहि विठाईनं बरोबर आणलीं होतीं. योगायोग असा की, क-हाडचे न्यायाधीशहि त्या दिवशीं जिल्हा-न्यायालयांत आलेले होते. त्यांनीच मग जिल्हा न्यायाधिशांना चव्हाण-कुटुंबाची कहाणी सांगितली आणि विठाईसह तें सारं कुटुंबच त्यांच्यासमोर उभं केलं. एवढं घडतांच त्याचा इष्ट तो परिणाम झाला. जिल्हा- न्यायाधिशांनी दिलासा दिला आणि पुढील आठच दिवसांत ज्ञानोबा कराडच्या कोर्टांत बेलिफ म्हणून रुजूं झाला. निराधार कुटुंबाचे पाय पुन्हा जमिनीला लागले, आधार मिळाला. हा आधार अर्थातच तुटपुंजा होता. बळवंतरावांच्या शेतींतला धान्याचा किंचितसा आधार पूर्वीच संपला होता.त्यामुळे ज्ञानोबांचा पगार आणि विठाईच्या कष्टची मजुरी यावरच कुटुंबाचा निर्वाह करावा लागणार होता. कराडसारख्या गावांत हें सारं अपुरं होतं, सर्वांनाच अर्धपोटी ठेवणारं होतं. विठाईला या वेळी माहेरची याद आली. एका मुलाचा सांभाळ दाजीबा करतील तर विठाईला तो दिवसा मिळणार होता. विठाईनं भावाकडे तसा सांगावा पाठविला आणि भावानं-दाजीबांनीहि त्याला कबुली दिली. एका मुलाला देवराष्ट्राला, आजोळी पाठवण्याचं ठरलं आणि त्यासाठी निवड झाली ती यशवंताची - पाच वर्षाच्या मुलाची !
यशवंताचा जन्म देवराष्ट्रांतच झाला होता आणि आता पांच वर्षांनी जगण्यासाठी यावं लागलं तेंहि आजोळींच. जन्म आणि बालपण, सागरोबाच्या, सोनहिराच्या संगतीत घडावं असाच जणूं संकेत असावा. यशवंत देवराष्ट्राला पोचला आणि दाजीबांनी मग त्याला तिथल्या प्राथमिक शाळेंत दाखल केलं. मराठी चौथीपर्यंतचं यशवंताचं शिक्षण आजोळींच, देवराष्ट्रास झालं. देवराष्ट्रांतील प्राथमिक शाळेंत यशवंता दाखल झालेला असला तरी ज्ञानोबाची इच्छा मात्र यशवंतानं कराडांत शिक्षण घ्यावं, इंग्रजी शिकावं अशी होती. यशवता सातवीपर्यंत शिकला तर त्याला कुठे तरी नोकरी मिळेल अशी विठाईला आशा होती. त्या काळांत सातवी शिकलेल्याला, व्ह. फा. झालेल्याला शिक्षकाची नोकरी हमखास मिळत असे. यशवंता चौथी इयत्ता उत्तीर्ण होतांच ज्ञानोबानं त्यास कराडला आणलं. कराडांतच यशवता व्ह. फा. झाला. पण गुरुजी बनण्याचं मात्र राहून गेलं. त्यानं इंग्रजी शिकावं असा ज्ञानोबाचा आणि दुसरा भाऊ गणपत यांचा सल्ला होता. त्यामुळे यशवंतानं मास्तर व्हावं आणि संसाराला हातभार लावावा ही इच्छा विठाईला पूर्ण करतां आली नाही. कराडलाच यशवंताला टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यांत आलं. - १९२७ सालीं !