राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करतांना, विकासाचं जें माध्यम-कारभार-यंत्रणा त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनांतून लक्ष द्यावं लागणार आहे; असा पहिल्या सहा महिन्यांतला यशवंतरावांचा अनुभव होता. लोकांशीं ज्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो किंवा नागरिकांशीं अप्रत्यक्ष संबंध येणारीं कामं ज्यांना करावीं लागतात, अशा कारभारांत गुंतलेल्या सर्व व्यक्तींना लोकांच्या गरजा ओळखतां आल्या पाहिजेत. गरजा नीटपणानं न ओळखल्या गेल्यानंच लोक आणि कारभार-यंत्रणा यांत अंतर अंतर पडत रहातं. या दृष्टीनं कारभार-यंत्रणेची व पद्धतीची पुनर्रचना करण्याची मूलभूत गरज त्या वेळीं राज्यांत होती. प्रशासन परिणामकारक आणि न्यायाचं ठरायचं, तर कारभाराच्या आणि कायद्याच्या बाबतींत निरनिराळ्या प्रदेशांत समानता ही असावीच लागते. अन्यथा राज्याच्या यंत्रणेचा जास्तींत जास्त लोकांना फायदा मिळूं शकत नाही. कार्यक्षम कारभाराबद्दल यशवंतरावांच्या कल्पना अगदी सुस्पष्ट अशा होत्या. त्यांनी त्याबद्दल आपल्या वक्तव्यांतून दिलेली जाणीव मोठी बोलकी आहे –
“कार्यक्षमता म्हणजे हातांतलं काम झटपट निकालांत काढणं नव्हे. कामाशीं ज्या माणसांचा संबंध असेल त्यांना आपलं म्हणणं ऐकून घेण्यांत आलं व आपल्याला न्याय मिळाला असं समाधान मिळवून देणं यांत खरी कार्यक्षमता आहे. कार्यक्षमतेविषयी ही कल्पना राज्याला सविस्तर कृतींत आणायची आहे. अधिकारीवर्ग आपलीं कर्तव्य न्यायबुद्धीनं, सेवाभावानं, निर्भीडपणें आणि निःपक्षपातीपणें, धर्म, जात अथवा राजकीय मतभेद यांचा विचार न करतां करील असं पाहिलं पाहिजे. राज्यांतल्या लोकांना जास्तींत जास्त विशुद्ध, कार्यक्षम व निःपक्षपाती असा कारभार देण्याच्या प्रयत्नांत कोणत्याहि प्रकारे कसूर करण्यांत येणार नाही.”
यशवंतरावांनी खुलेपणानं हें सांगून राज्याचं भवितव्य उज्ज्वल आहे अशी श्रद्धा राज्याच्या पहिल्याच दिवशीं त्यांनी विश्वासानं, खात्रीपूर्वक व्यक्त केली.
काँग्रेसशीं मतभेद असलेले लोक बहुसंख्येनं निवडून आले होते आणि विधानसभेंत दाखल झाले होते; परंतु मतभेद असणारांना सुद्धा सर्व जनतेचं कल्याण साध्य करणं हेंच अपेक्षित असल्यानं, राज्याची यशस्वी वाटचाल होण्यासाठी तेहि जास्तींत जास्त सहकार्यच देतील असं सांगून विरोधकांनाहि त्यांनी विधायक दृष्टि देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचा राग, शंका, अविश्वास, प्रेमानं व सेवेनं नाहीसा करण्याचा, कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. विधानसभेंत आणि बाहेरहि ते याच धोरणाचा पाठपुरावा करत राहिले.
१९५७ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांतील कांही पुढा-यांनी काँग्रेसविरुद्ध ‘छोडो महाराष्ट्र’ चा पुकारा करण्यास प्रारंभ केला होता. निवडणुकींत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा पाडाव झालेला असला तरी २० लाख मतदारांनी काँग्रेसला मतं दिलीं होतीं. राज्यकारभार करण्याइतकं बहुमतहि मिळालं होतं. काँग्रेसविरुद्ध ‘छोडो महाराष्ट्र’ पुकारा करण्यानं २० लाख मतदारांना आपण महाराष्ट्राबाहेर हुसकून लावूं शकत नाही याची जाणीव विरोधकांना नव्हती असं नव्हे; परंतु जनतेचा राग सतत धुमसत रहाण्यासाठी अशा घोषणांच्या भांडवलाचा त्यांना उपयोग होता.
जनतेनं अशा घोषणांचा वस्तुतः शांतपणें विचार करण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रांत यादवी निर्माण करण्याची, विद्वेष फैलावण्याची भावना या भाषेमागे आहे, असं यशवंतरावांना त्यामुळेच जनतेला सांगावं लागलं. आपण महाराष्ट्रप्रेमी आहोंत असा विरोधकांचा दावा असायचा, परंतु यशवंतराव महाराष्ट्रप्रेमी नाहीत असं सिद्ध करणं त्यांच्या आवाक्याबाहेर होतं. तसं सिद्ध करतां येणारहि नव्हतं.