अहमदाबादच्या दौ-यांत पुढे दोन दिवसांनी एका प्रसंगी यशवंतरावांच्या मोटारीवर विरोधकांनी तुफान दगडफेक केली. मोटारीवरील राष्ट्रध्वज काढून फेकून दिला, पायाखाली तुडवला. विरोधकांनी सारासार विवेकबुद्धीलाच तिलांजलि देऊन अत्यंत निषेधार्ह गोष्टी केल्या. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याची दुर्बुद्धि ज्या निदर्शकांना होते ते निदर्शक ज्या कोणा विरोधी पक्षाचे असतील त्या पक्षांना हें मुळीच शोभादायंक नव्हतं; परंतु सभेंत दगडफेक करून आणि राष्ट्रध्वज पायाखाली घालून महागुजरात निर्माण करूं, या भ्रमांत असणा-यांनी परिषदेलाच बदनाम करून टाकलं.
परिषदेनं हरताळाचा आदेश दिला असतांना त्याला प्रतिसाद मिळाला नाही त्यावरूनच परिषदेनं आत्मनिरीक्षण करण्याची वस्तुतः गरज होती. द्वैभाषिक मोडून महागुजरात ज्यांना मिळवायचा होता त्यांच्यासमोर निवडणुकीची संधि आलेली होती. निवडणुकींत सरकार बदलून घेऊन, लोकसभेंत बहुमत मिळवून किंवा मुंबई राज्यांत काँग्रेसला अल्पमतांत ढकलून त्यांना आपला हेतु लोकशाहीमार्गानं साध्य करण्याचा मार्ग उपलब्ध होता; परंतु गुंडगिरी करूनच आपलं वजन वाढवण्याचा अहंकार परिषदेला झाला आणि त्या भ्रमिष्टापणांत, लाजेनं मान खाली घालावी अशीं अनेक कृत्यं निदर्शकांनी केलीं. अहमदाबाद शहर काँग्रेसच्या अध्यक्षांचं धोतर खेचण्यापर्यंत हा चाहटळपणा पोंचला.
सर्वत्र अराजक माजलं असतांनाहि विवेक ढळूं न देतां यशवंतरावांनी नव्या मुंबई राज्याचा प्रचार घट्टपणें सुरूच ठेवला. देशाच्या हितार्थ ऐक्य असा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोंचवला. स्वराज्यप्राप्तीनंतर निर्माण झालेल्या मानसिक वितंडवादाच्या बंडाला उत्तर म्हणून द्वैभाषिक राज्य निर्माण करण्यांत आलेलं असून भारताच्या इतिहासांतली ती एक अपूर्व घटना होती. समिति व परिषद हें राज्य तोडण्याच्या मागे होती. निवडणुकींत या प्रश्नाचा निर्णय करायचा आहे असंच यशवंतरावांनी लोकांना आवाहन केलं. राष्ट्रीय भावनेला प्राधान्य देण्यासाठी आणि राष्ट्रीय ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी मुंबई राज्य निर्माण झालं आहे हें त्यांचं विश्लेषण लोकांपर्यंत ठीकपणें पोंचत होतं.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत मजल दरमजल करत यशवंतराव पुण्यांत पोंचले. पुण्याची महात्मा फुले-मंडई म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या छावणीचा मोठाच तळ. फुले-मंडईतच पुणेकर नागरिकांच्या वतीनं यशवंतरावांना मानपत्र देण्याचा बेत मुक्रर झाला. सरदार बाबूराव सणस हे त्या वेळी शहरांत महापौर होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही सभा आणि मुख्य मंत्र्याचा सत्कार झाला.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीचं पुणें हें तर प्रमुख केंद्र होतं. यशवंतरावांचा पुण्यांत सत्कार होण्याचं ठरतांच समितीच्या गोटांतहि निदर्शनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार सत्कार-सभा सुरू होतांच काळे झेंडे घेतलेले समितीचे निदर्शक सभास्थानीं आले आणि घोषणा, आरडा-ओरड सुरू झाली. मंडईतले कार्यकर्ते तयारच होते. सभेला हजारो नागरिक आलेले. ही सभा उधळली गेली असती, तर मंडईचं नाक कापलं जाणार होतं. मंडईकरांना तें आव्हानच होतं. निदर्शन आणि घोषणा सुरू होत्या तोंवर हे कार्यकर्ते गप्प राहिले. पण निदर्शक सभास्थानीं घुसून सभा उधळण्याचा प्रयत्न करूं लागतांच मंडईतले कार्यकर्तेच नव्हे, तर सभेंतले कांही लोकहि पुढे सरसावले आणि निदर्शकांना त्यांनी पळवून लावलं. सभा शांतपणें पार पडली.
द्वैभाषिकानंतरच्या दौ-यांत यशवंतरावांना सत्काराचे विविध प्रकार परियचाचे झाले होते. महाराष्ट्रांत आणि गुजरातमध्येहि जाहीर सभा घेऊन ते परतले होते. पुण्यांतले लोक बुद्धिमान् म्हणून महशूर. बहुतेक अखिल भारतीय पुढारी पुण्याच्या मातींत वाढलेले. इथे तरी निदान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे माथेफिरूपणा घडणार नाही, अशी कल्पना बाळगून जे आले होते त्यांनाहि मंडईतल्या निदर्शन-प्रकारानं धक्का बसला. वस्तुतः या बुद्धिमान मंडळींनी यशवंतरावांचे विचार ऐकण्यास घाबरण्याचं कांही कारण नव्हतं; परंतु यशवंतरावांचे विचार ऐकल्यानं आपली बुद्धीहि कदाचित् ढळेल अशी भीति त्यांना वाटली असली पाहिजे. आरडाओरड आणि निषेध असल्या प्रकारांनी यशवंतराव घाबरून पळून जाणारे नाहीत हें खरं म्हणजे पुणेकर मंडळींच्या परिचयाचं झालं होतं. तरी पण निदर्शनाच्या मार्गाचा अवलंब करून सभा उधळण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिलाच. विचारांची मक्तेदारी फक्त आमचीच आहे असं कदाचित पुणेकरांना या निमित्तानं सिद्ध करायचं असावं!
लोकशाहीचे पवाडे म्हणायचे, भाषण-स्वातंत्र्याची, विचार-स्वातंत्र्याची पल्लेदार महती सांगायची आणि आपल्या सुरांत सूर मिसळून जो कुणी बोलणार नाही त्याला बोलूंच द्यायचं नाही आणि तेंहि लोकशाहीची जपमाळ हातांत धरून, हा अनुभव यशवंतरावांच्या संग्रही या चळवळीमध्ये साठलेलाच होता. त्यामुळे मोठ्या जिद्दीनं लोकशाही-मार्गानंच त्या दिवशीं त्यांनी आपले विचार लोकांना ऐकवले.