हा संकल्प पूर्ण करण्याच्या कामीं अनेक सुहृदांचं सहकार्य लाभलं. श्री. जयंतराव टिळक यांनी प्रेरणा दिली, संधि निर्माण करून दिली; साहित्यिक मित्रवर्य श्री. भा. द. खेर आणि जुन्या पिढींतील प्रथितयश साहित्यिक श्री. द. र. ऊर्फ काकासाहेब कंवठेकर यांनी मूळ हस्तलिखित वाचलं, उपयुक्त सूचना केल्या. श्री. खेर यांनी तर मुद्रितं तपासून ग्रंथ पुरा होईपर्यंत संगत राखली. केसरी-मराठ संस्थेनं हा ग्रंथ प्रकाशित केला. केसरीचे व्यवस्थापक श्री. ब. ल. वष्ट आणि चिटणीस श्री. शशिकांत राशिनकर यांनी प्रोत्साहन देऊन कामाला गति प्राप्त करून दिली. त्याचप्रमाणे श्री. भास्करराव कुलकर्णी यांचं साहाय्य आणि मुद्रणालयांतली या संबंधांतील मंडळींचंहि सहकार्य लाभलं. त्यामुळेच हा ग्रंथ अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण करतां आला. चित्रकार श्री. अनंत सालकर यांनी मुखपृष्ठ व आंतील चित्रांची मांडणी केली. या ग्रंथासाठी दर्जेदार कागद उपलब्ध होण्याची आवश्यकता होती. सेंट्रल पल्प आणि पेपर मिलचे श्री. बाबूराव पारके यांनी तो कागद उपलब्ध करून दिला.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि कविराज श्री. ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दलची कृतज्ञता कोणत्या शब्दांत आणि कशी व्यक्त करावी! तर्कतीर्थांनी, गेल्या पन्नास वर्षातलं राजकारण आणि ते करणा-या व्यक्ति जवळून पाहिल्या आहेत, अभ्यासल्या आहेत. यशवंतराव, तर्कतीर्थ आणि माडगूळकर हे सर्व सातारा जिल्ह्यांतले. यशवंतरावांची जडण-घडण झाली त्या सर्व काळांतले ते जागरूक साक्षीदार आहेत. यशवंतरावांच्या चरित्राचं हस्तलिखित तर्कतीर्थींनी वाचावं आणि मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा बाळगून मी त्यांच्या वाई येथील निवासस्थानी पोंचलो. तेव्हा चरित्र-ग्रंथ प्रसिद्ध करण्यास त्यांनी अनुमति तर प्रथमदर्शनींच दिली आणि हस्तलिखितांतील कांही भाग ऐकून उपयुक्त मार्गदर्शनहि केलं. त्यामुळे सुरुवातीच्या काळांत यशवंतराव जसे होते, जसे घडले आणि जसे वाढले, त्या क्रमानं चरित्र-ग्रंथाची सिद्धता करण्यास मला मोलाची मदत झाली; ‘यशवंत’ पासून ‘यशवंतरावां’ पर्यंतची क्रमानं मांडणी करतां आली. चरित्र-ग्रंथ सिद्ध झाल्यावर त्यांनी त्यासाठी पुरस्कार लिहून दिला आणि ग. दि. मा. नी शकुनाचा श्रीकार’ देऊन कळस चढविला. या दोघा ज्येष्ठांनी मला निरंतरचं उपकृत, केलं आहे.
माझे कुटुंबीय आणि यशवंतरावांचे स्वीय सचिव श्री. श्रीपाद डोंगरे यांच्याबद्दल मला कृतज्ञतेचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. संकल्प-सिद्धींत यांचा फार मोलाचा वांटा आहे. वाचकांचा लोभ हा मी गृहीत धरलाच आहे. सत्यसंकल्पाचा दाता अखेरीस जनतारूपी परमेश्वर आहे, अशी माझी श्रद्धा आहे.
रामभाऊ जोशी
(रा. आ. जोशी)
पुणें
दि. ४ जून १९७६
कै. ती. अण्णा
कै. ती. सौ. ताई
तुमच्यासाठी
तुम्हालाच
-राम