विविधांगी व्यक्तिमत्व-९३

२५ नोव्हेंबर १९८४ रोजी मात्र रात्री ७.४५ वाजता दिल्ली येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळाला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवाच तुटला. राजकारण हे विचारांच्या आणि नैतिक मूल्यांच्या पायावर उभे असते आणि असले पाहिजे, असे मानणारे कार्यकर्ते आता फारसे दिसत नाहीत. यशवंतरावांनी जे राजकारण केले त्याच्यामागे काही विचार होते, काही निष्ठा होत्या. काही श्रद्धा काही स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी राजकारण केले होते. त्यांना राजकारण अभिप्रेत होते. ते सामाजिकदृष्ट्या आशयगर्भ होते. त्या युगाचे निर्माते होते. त्याला एक विशिष्ट दिशा होती. त्यांची उद्दिष्टे स्पष्ट होती. यशवंतराव एका महान युगाचे प्रतिनिधी होते. म. गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूं युगाच्या प्रेरणा त्यांच्या विचारात आणि कार्यात अभिव्यक्त झाल्या होत्या. म्हणून यशवंतरावांचे निधन म्हणजे महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील एका युगाचा अंत असे मानणे आवश्यक आहे.

दि. २७ नोव्हेंबर १९८४ रोजी दुपारी ३ चे दरम्यान मी कृष्णा-कोयनेच्या संगमावर जाण्यासाठी निघालो. नदीकाठावर माणसांची अलोट गर्दी झाली होती. लोकांचा लोंढा सारखा येतच होता. जेथे यशवंतरावांच्या चितेला अग्नी देण्यात येत होता तेथपर्यंत सहजासहजी जाणे अतिशय अवघड होते. मी माणसांच्या अलोट गर्दीतून पावला-पावलाने पुढे सरकत जात होतो. शेवटी ५ चे सुमारास कसातरी पेटलेल्या चितेसमोर जाऊन पोहचलो. महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर कशी असावी याचे चित्र यशवंतरावांनी रेखाटले होते. खरे म्हणजे ती सफर विघटनाच्या दरीत कोसळली होती. चिता जळत होती. पलीकडे बरीच नेतेमंडळी दिसली. यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार यांचा शोकमग्न, चिंतातुर चेहरा ठळकपणे दिसला. चिता प्रज्वलित करून बराच वेळ झाला होता. चितेवरील वरच्या बाजूची लाकडे जळत जळत बाजूला ढासळत होती. यशवंतरावांचा देह पंचतत्त्वात विलीन होत होता. नव्हे झालाच होता. मी पुढे पाहातच होतो. इतक्यात चितेवरील तीन-चार जळणारी लाकडे खाली पडली आणि मला दिसला तो यशवंतरावांचा हात. कोपरापासून पुढचा हात - तो जवळपास जळाला होता. तो उजवा हात होता याची मी खात्री करून घेतली. शेजारीच यशवंतरावांचे कर्‍हाडमधील सहकारी राजाराम जिरंगे होते. त्यांनी लगेचच त्या चितेवर आणखी लाकडे ठेवली. वस्तुत: यशवंतरावांचा तो हात मी अनेकदा पाहिला होता. यशवंतरावांची भाषणे ऐकताना त्या हाताच्या हालचाली, त्यांचे इशारे मी पाहिले होते. तोच हात मला येथे आणि अशा अवस्थेत दिसला व काळजात चर्र झाले. यशवंतरावांचा हा हात नियतीच्या हाकेला ओ तर देत नसेल? या प्रश्नाने माझ्या मनाचा ताबा घेतला. दोन्ही हात जोडून श्रध्दांजली वाहिली व मागे वळलो. मागे वळताना पैलतीरी विसावलेले हेलिकॉप्टर दिसले. यशवंतरावांचे कलेवर मुंबईहून कर्‍हाडला याच हेलिकॉप्टरने आणले होते. सूर्य अस्ताचलावर हळूहळू उतरत होता. त्याची किरणे कृष्णा-कोयनेच्या संगमातील पाण्यावर विषण्णतेने विखुरलेली होती. नदीच्या पात्रात अधिक पाणी नव्हते. लोक हातपाय धुऊन परतत होते.

मी खिन्न मनाने पाण्यात उभा राहिलो. आजूबाजूला माणसांची गर्दी होतीच. ओंजळीत पाणी घेऊन तोंड व हात धुतले. 'पापण्यात गोठविली मी नदी आसवांची' ही कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची कविता मला आठवली. माडगूळकर गेले तेव्हा यशवंतरावांनी आपला शोक याच शब्दात व्यक्त केला होता. त्याच शब्दांनी माझ्या मनातील दु:खभावनेला वाट करून दिली.

प्रीतिसंगमाच्या कुशीत विसावलेले एक इवलेसे रोप. गगनावरी गेलेला वेलू पाहण्याचे सोनियाचे क्षण त्याला लाभले. स्वत:च्याच सोनेरी किरणात न्हाऊन निघालेला कृष्णाकाठ पहिला अन् कृष्णाकाठीच ऐका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला! सह्याद्रीच दुभंगला, शब्दही मुके व्हावे असा हा वियोग.