विविधांगी व्यक्तिमत्व- ४१

कारावासात असतांनाच निरनिराळ्या राजकीय प्रवाहांशी त्यांचा चांगला परिचय झाला होता. आधी पदवी शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्य करीत असतानाही त्या वैचारिक संघर्षाने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता, गांधीवाद, समाजवाद आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराबद्दलचे आकर्षक अशा एका वैचारिक त्रिकोणात ते उभे होते. ते मोकळेपणाने आपल्या मनातील संघर्षाबाबत कार्यकर्त्यांशी, मित्रांशी चर्चा करीत असत. अशा परिस्थितीत स्वत:वर कोणतेही लेबल चिकटवून घेण्याची घाई न करता लोकामध्ये संघटनेने काम करीत रहाणेच त्यांनी श्रेयस्कर मानले.

पं. जवाहरलाल नेहरूंचे आत्मचरित्र वाचल्यावर त्यांच्या मार्गाने कॉंग्रेस गेली तर समाजवादाचा विचार यशस्वी होईल असे त्यांना वाटले. याच काळात मुंबईतले कॉंग्रेसचे अधिवेशन त्यांना पाहायला मिळाले. आणि जनमानसातील त्यांना आपले स्थानही कळाले. ज्येष्ठ कॉंग्रेस पुढारी व कार्यकर्ते यांना पाहण्याचा योग ही त्यांना आला. १९३६ मध्ये राजकारणाला मोठा वेग आला. निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले. तेव्हा आपल्या जिल्ह्यात कॉंग्रेस विजयी झाली पाहिजे यासाठी प्रयत्‍न यशवंतरावांनी आपल्या सहकार्‍यांच्या व इतरांच्या मदतीने प्रयत्‍नांची शिकस्त करून आत्माराम बापू पाटील यांच्यात कार्यकर्त्यांचे, पुढार्‍याचे सगळे गुण होते. म्हणून आम्ही त्यांना उभे केले व ते सर्वांत जास्त मताने निवडूनही आले. सरदार वल्लभभाई पटेल यांची यशवंतरावांनी भेट घेऊन सर्वजबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. या निवडणुकीच्या निमित्ताने यशवंतराव समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचले व जिल्ह्याच्या सार्वजनिक जीवनांत त्यांनी आपले स्वत:चे असे स्थान निर्माण केले. यशवंतराव म्हणतात, “या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या असे लक्षात आले की, मी सुद्धा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा घटक बनलो आहे, ही भावना मनाला प्रसन्न करणारी होती. आणि त्याचबरोबर त्याक्षेत्रात अधिक उमेदीने कामकरण्याकरता प्रोत्साहन देणारी अशी शक्ती होती.”

यावेळेपर्यंतही यशवंतरावांच्या मनातील राजकीय विचारांची खळबळ थांबल नव्हती. १९३४ मध्ये कॉंग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळी यशवंतराव सुरवातीला तिकडे आकर्षित झाले. या पक्षात अच्युतराव पटवर्धन, एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे अशी कर्ती माणसं होती. त्यांच्या बद्दल यशवंतरावांच्या मनात आदर होता परंतु ते इथे फार काळ रमले नाहीत.

समाजवादाच्या चळवळीबद्दल यशवंतरावांनी आपल्या मनात विचारांची कांही जुळणी केल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याची चळवळ ही इंग्रजांचं राज्य घालविण्यापुरती मर्यादित नाही. समाजातील विषमता दूर केली पाहिजे, नवीन समाजरचना आणली पाहिजे हा चळवळई संबंधीचा मनात पक्का विचार त्यांनी केलेला होता. पं. नेहरू यांनी फैजपूर कॉंग्रेस मध्ये आणि आत्मचरित्रातही समाजवादाचा विचार स्पष्टपणे मांडला असल्याने पंडितजींच्या नेतृत्त्वाचा ठसा यशवंतरावांच्या मनावर टिकून राहिला होता. कॉंग्रेसच्या चळवळींचं आकर्षण त्यांच्या मनाला निरंतर राहिलं ते यामुळेच.

अशा परिस्थितीत, निश्चित ध्येय्य गाठण्यासाठी रॉय यांच्या मार्गाने झेप घ्यायची की गांधी-नेहरूंच्या मार्गाने झेप घ्यायची अशा प्रकारच्या मनाच्या द्विधा अवस्थेच्या टोकावर ते उभे होते. कोणत्या मार्गाने सामाजिक हित अधिक साध्य होऊ शकेल याचा विचार मनाशी चालला होता. आपल्या मनातील विचार कार्यर्त्यांसमोर मांडून सर्वांच्या विचारांनी सर्वांबरोबर निर्णय घ्यायचा ही गोष्ट त्यांनी कधीही मनाआड केली नाही. शेवटी “जेथे गांधी-नेहरू तेथे मी” असा यशवंतरावांचा ठाम निर्णय झाला. आणि त्यांच्या मनातील राजकीय विचारांची वावटळ संपून स्वच्छ मनाने आणि उत्साहाने ते पुढील कार्यास सिद्ध झाले. संघटना कौशल्य, राजकीय धोरणीपणा आणि समयोचित वक्तृत्व याबाबत यशवंतरावांची या काळात कसोटीच लागून गेली. यशवंतरावांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वाची भविष्यवाणीच या काळात सातारा जिल्ह्याला ऐकविली.

१९३८ साली पुण्याच्या लॉ कॉलेजमध्ये यशवंतरावांनी प्रवेश घेतला. लॉ कॉलेजची समृद्ध लायब्ररी, वाङ्‌मयीन आणि राजकीय अभ्यास मंडळे, सभा संमेलने इत्यादि ठिकाणी यशवंतरावांची आवर्जुन उपस्थिती असे. महिन्या दोन महिन्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संबंध ठेवण्याचे कामही यशवंतरावा जाणीवपूर्वक करीतच होते.