• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-९१

प्रीतिसंगमावरील सूर्यास्त

ही गोष्ट केवळ दैवयोगाने झाली नाही. बंगालमध्ये डॉ. बिपीनचंद्र रॉय निधन पावले. त्यांच्या जागी पी. सी. सेन मुख्यमंत्री झाले. केरळचे मुख्यमंत्री पट्टण थाणू पिल्ले यांना पंजाबचे राज्यपालपद लाभल्यामुळे आर. शंकर केरळचे मुख्यमंत्री झाले. असा कोणताही दैवयोग यशवंतरावांच्या बाबतीत घडून आला नाही. म्हैसूरच्या एस. आर. कंठी यांनी आपली खुर्ची स्वार्थत्यागपूर्वक सोडून एस. निजलिंगप्पा यांना मुख्यमंत्री होऊ दिले. आंध्रचे मुख्यमंत्री डी. संजीवय्या यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून आंध्रचे मुख्यमंत्रीपद संजीव रेड्डी यांना बहाल केले. यशवंतरावांवर तशी कोणी मेहेरबानी करून त्यांना मोठेपणा मिळवून दिला नाही. यशवंतरावांचा शोध घेत त्यांचा मोठेपणा त्यांची पावले चुंबीत त्यांच्या मागून, इमानी कुत्र्याप्रमाणे धावत आला आहे.

यशवंतरावांचा मोठेपणा हा वस्तुत: त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सावली आहे. सावली ही जशी माणूस फिरेल तशी त्याच्या पावलाशी घोटाळत असते. तसा यशवंतरावांचा मोठेपणा पाठलाग करत यशवंतराव धावत असलेले जनतेने कधी पाहिले नाहीत. यशवंतराव राष्ट्राचे निष्ठावंत सैनिक होते. जनतेचे श्रद्धापूर्वक पाईक होते. अंगावर सोपवलेली कामगिरी जिद्दीने, जिव्हाळ्याने करायची, त्यात अंगचोरपणा दिसायचा नाही, तसाच मनाचा कमकुवतपणा आढळायचा नाही. स्वीकारलेल्या कामगिरीबाबत शंकाकुशंका निर्माण करून अवसानघात करायचा नाही. त्याबरोबरच वरिष्ठांसमोर पत्करलेल्या कामाचे फलित सादर करताना आलेल्या अडचणींचा, येणार्‍या संकटांचा स्पष्ट पाढा वाचण्यास चुकायचे नाहीत. यशवंतरावांच्या याच वृत्तीमुळे ते जनतेच्या विश्वासाला आणि वरिष्ठांच्या लोभाला सारखेच पात्र झालेले होते.

यशवंतरावांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी खरी आहे, ती हीच की, अडचणीच्या वेळीच त्यांचे व्यक्तिमत्त्व कसाला लागते. आपत्तीच्या काळातच त्यांच्या कर्तृत्वाला धार येते. मनाचा मानी मराठा मनगटाच्या मिजाशीत आला की तेजाने तळपू लागतो. समराने त्यांच्या स्वभावातील सौजन्य मावळत नसले तरी त्यांच्या शौर्याला शिखर जवळ दिसू लागते! प्रतिपक्षाशी यशवंतराव वैरभावनेने वागल्याचे उदाहरण सापडणार नाही. प्रतिपक्षाला त्यांनी आपल्यावर कधी डाव करू दिल्याचेही उदाहरण मिळणार नाही. असा हा चतुरस्त्र कर्तबगारीचा राजकारणी नेता विरळाच होता.

यशवंतरावांच्या ठिकाणची तारतम्यशक्ती तल्लख होती हे त्यांच्या सर्वांगीण यशाचे रहस्य आहे. सत्य व असत्य यांचा उलगडा ते चटकन करू शकत होते. भल्याबुर्‍यांचा त्यांचा विवेक अचूक होता. चांगला कोण, वाईट कोण याचा उलगडा जसा ते स्वत:च्या मनाशी सत्वर करू शकत होते, तसेच कोणत्या बाबतीत काय करायला पाहिजे, काय करता कामा नये याचाही सारासार विवेक त्यांना होता. राजकारणामध्ये शेकडो नव्हे हजारो लोकांना सांभाळून घ्यावे लागते. अनंतांचे अनंत अपराध पोटात घालावे लागतात. पुन्हा त्यांच्या अंगच्या चांगल्या गुणांचा समाजाला, जनतेला, देशाला चांगला उपयोग होईल असा मार्ग त्यातून शोधावा लागतो. परस्पर विरुद्ध हितसंबंधांची कुशलतेने मिळवणी करून दाखवावी लागते. वेगवेगळ्या विचारांच्या, मतांच्या बाजारातून एकजिनसी कार्याचा हिमालय उभा करावा लागतो. हे काम अतिशय कठीण असते. सोनाराची नाजूक हातोडी, लोहाराचा भक्कम हातोडा या दोहोंचा समन्वय सारख्याच कसबीपणाने वापर जो करू शकेल, त्यालाच अशा कामात यश येऊ शकते.

यशवंतरावांच्या ठिकाणी सुवर्णकाराचे नाजूक हस्तकौशल्य होते तसेच लोहाराचे जबर सामर्थ्यही होते. जी गोष्ट केलीच पाहिजे असे त्यांच्या मनाला पटेल ती करण्यात ते कधीही टाळाटाळ करत नव्हते. कोणाच्या स्तुती, निंदेचा मनाला विचारही शिवू देत नव्हते. समाजजीवन हे सागराला मिळणार्‍या गंगौघाप्रमाणे शतमुखी असते याची त्यांना चांगली कल्पना होती. समाजाची ही सर्व तोंडे समर्थ झाली तरच तो समाज उन्नत होऊ शकतो. म्हणून समाजाच्या शेकडो गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत असे त्यांचे धोरण होते. त्यांचा आणखी एक मोठा गुण म्हणजे त्यांच्याइतका आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवणारा राजकारणी पुरुष खरोखरच लाखात एखादाच सापडायचा. वाणी हे पुढार्‍यांजवळचे अत्यंत प्रभावी अस्त्र आहे. या अस्त्राने नको असलेल्या रोगट अवयवावर शस्त्रक्रिया करता येते. हव्या असलेल्या सुदृढ अवयवांवर सुरीहल्ला करून जखमाही करता येतात. भारतात वाणीच्या दुरुपयोगाने जखमा करणारे पुढारी फार आहेत. भारतीय राजकीय वातावरणातील शेकडो ८० टक्के तरी वाद, वितुष्टे, वैर, विव्हळणी ही वाणीच्या दुरुपयोगातून जन्म पावलेली आहेत असेच विचारांती दिसून येईल.