• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-७७

यशवंतरावांच्या निरीक्षणातील 'माणूसपण'

माणूस म्हणजे परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती. संस्कृतीच्या इतिहासातील वाटा-वळणावरून चालत आलेल्या आजच्या मानवाकडे पाहिले, की त्याच्या आजवरच्या प्रवासातील कित्येक बर्‍यावाईट खुणा त्याच्या चेहर्‍यावर भेटतात. काही माणसं स्वत: मोठी होतात, काही जवळच्यांना मोठी करतात. काही तर स्वत:ला मोठं  म्हणता यावं म्हणून इतरांना खुजे ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न करून मोठेपणाची सूज दिमाखानं मिरवतात., परंतु संपूर्ण समाजच मोठा करणारे व त्यातही उत्तुंग राहणारे जे झालेत त्यातील एक मला स्व. यशवंतराव वाटतात. स्वत: प्रसिद्धीच्या व कर्तृत्वाच्या उच्चतम पातळीवर गेल्यानंतरही कधीही स्वत:ची नाळ न विसरलेले हे व्यक्तिमत्त्व नेहमीच मनाला भुरळ घालते. माणूस घडविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले. ज्या लोकांना लौकिक अर्थाने अभिव्यक्ती व संस्कृतीच्या मर्यादांनी रोखले होते, त्यांना बोलते करणारा व स्वत:चं संयोजन, नियंत्रण स्वत:लाच करण्यास उत्सुक करणारे असे हे नेतृत्व होते. त्यांचे पंचायती राज्य, ग्रामीण औद्योगीकरणावरील योजनांचा भर हे ग्रामीण जीवनामध्ये असंख्य कर्तृत्ववान लोकांच्या सुप्त नेतृत्वगुणांना उजाळा देणारे ठरले व त्यातूनच एकटादुकटा नव्हे, तर संपूर्ण पिढीच्या पिढी घडली. सामाजिक सुधारणा कृतीत येण्यासाठी प्रथम दारिद्रय-दु:खाने गांजलेली ग्रामीण जनता स्वयंपूर्ण झाली पाहिजे, ह्या विचारांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

माणसा-माणसांनी मिळून समाज घडतो, त्यात सर्वांचे मंगल असते. कित्येक वेळा मात्र माणसांमधील मूळ प्राणी विशेष सक्रिय होतो. त्याचे प्रकृत राग, विराग, हर्षविषाद, मद-मत्सर-लोभादी समाजविघातक रूप धारण करतात. अशा वेळी त्याची भावनिक व मानसिक जपणूक विशेष महत्त्वाची. जाणत्या राष्ट्रपुरुषांचे तर ते युगदत्त कार्य - कर्तव्यच असते.

यशवंतरावांच्या निरीक्षणाचा खरा ध्यासच मुळी ग्रामीण माणूस होता. माणसाला पुढे ठेवून ते विचार करीत आणि मांडीत. त्यांना माणसाचा लळा होता. माणसाची अपार माया त्यांनी जोडली होती. जीवनातील विविध क्षेत्रे, देश-विदेश, भिन्न भाषा - प्रांत सगळीकडे त्यांना ओळखणारी, मानणारी माणसे होती. स्वत: यशवंतराव बहुजनाला घडविण्यासाठी हयातभर तीळ तीळ तुटत राहिले. चंदनाप्रमाणे झिजत राहिले. आपली वाणी - लेखणी कारणी लावली ती माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी. त्यांचा अश्वासक - प्रेरक हात पाठीवरून फिरला, की मराठी मनाला जिव्हाळ्याचे बळ मिळत असे...पुढे कित्येक दिवस ही शिदोरी पुरायची.

यशवंतराव म्हणतात, ''तरुण माणसाची व्याख्या वयावर आधारलेली नाही, तर एखादे आव्हान स्वीकारून त्यावर मात करण्याच्या त्याच्या शक्तीवर आधारलेली आहे.” खरे तर त्यावरूनच माणूस तरुण की वृद्ध हे ठरते. प्रिव्ही कौन्सिलमध्ये टिळक हरले तेव्हा त्यांचे धैर्य संपले काय, असे त्यांना विचारण्यात आले. टिळक उत्तरले होते, ''मी गलितधैर्य होऊ शकत नाही. आकाश जरी कोसळले तरी त्या कोसळलेल्या आकाशावर पाय रोवून लढत राहणार्‍या पिढीचा मी घटक आहे. तरुण माणसांनी हे ब्रीद मिरवले पाहिजे.'' पुढे म्हणतात ''तरुण माणसाने नेहमी आव्हानाच्या शोधात असावे, धैर्य शाबूत ठेवावे आणि समोर काही ध्येय ठेवावे. ध्येयविहीन तरुण हा तरुण नव्हेच. केवळ स्वप्नरंजनातच त्याने रमून जाता कामा नये, तर ही स्वप्ने वास्तवात उतरवण्याची धमकही त्याच्यात हवी.''

कर्तृत्ववान माणसासंबंधी यशवंतराव सांगतात ''कुठल्यातरी समाजामधील कर्तृत्ववान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही. नवनीत म्हणजे आपण ज्याला लोणी म्हणतो ते दुधातून येते. दूध नसेल तर लोणी नाही. समाजजीवन जेव्हा खवळलेले असते त्यामध्ये काहीतरी साचत असते. नवनीत निर्मिणार्‍या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते. नवनीताला स्वतंत्र अस्तित्व असते ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान दिसणार्‍या माणसाच्या जीवनासंबंधीही खरी आहे, असे माझे तत्त्व आहे'' आणि पुढे म्हणतात ''जी कर्तबगार माणसे असतात त्यांच्या जीवनात कुठल्या तरी महत्त्वाच्या प्रेरणा त्यांना पुढे रेटीत असतात, कुठल्यातरी विचारांचा, कुठल्यातरी ध्येयांचा त्यांना एक प्रकारचा नाद लागलेला असतो, छंद लागलेला असतो. लौकिक अर्थाने आपण ज्याला नाद किंवा छंद म्हणतो तो सोडून द्या., परंतु वैचारिक किंवा ध्येयविषयक नाद असल्याशिवाय कर्तृत्ववान माणसाचे जीवन घडूच शकत नाही.''