• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-६३

पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक ना. यशवंतरावांसंबंधी विचार व्यक्त करतात. १९५७ साली यशवंतराव हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे सामर्थ्य ओळखून यशवंतरावांनी तणावाचे वातावरण कमी करून महाराष्ट्राच्या जीवनात राजकीय सौहार्दाचे वातावरण ज्या तर्‍हेने निर्माण केले त्यातून लोकशाहीचा संस्कार मराठी मनावर निश्चित झाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी यशवंतरावांनी माडखोलकरांना सडेतोड उत्तर देताना सांगली येथे केलेल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्र हे सर्व मराठी भाषिकांचे राज्य असेल. ते केवळ मराठयांचे राज्य असणार नाही, हे दिलेले आश्वासन फार महत्त्वाचे होते. आणि त्यातून यशवंतरावांचा व्यापक दृष्टिकोन व्यक्त झाला. बाळासाहेब खेर व बर्‍याच अंशाने मोरारजीभाई देसाई यांच्या मंत्रिमंडळात शहरी पांढरपेशा मंत्र्यांचे वर्चस्व होते., परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर त्यामध्ये ग्रामीण नेतृत्वाला निश्चित स्थान मिळाले व विधिमंडळाचे कामकाजही मुख्यत: मराठीतच होऊ लागले. केवळ मंत्रिमंडळात मूठभर व्यक्तींना स्थान देणं ही त्यांची दृष्टी नव्हती. राजकीय क्षेत्रात सत्तेचे विकेन्द्रीकरण झाले पाहिजे आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा विकासकार्यात सहभाग मिळावा हा यशवंतरावांचा दृष्टिकोन होता.

‘लोकमत’ साप्ताहिकाचे संपादक वामनराव सावंत यांना ना. यशवंतराव चव्हाण यांचे आगळे व्यक्तिमत्त्व मोहक वाटते. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करताना ते लिहितात, केंद्रीय अर्थमंत्री व महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते यशवंतराव चव्हाण हे एक अखिल भारतीय कीर्तीचे पुढारी आहेत. त्या क्षेत्रातील त्यांचे स्थानही बरेच वरच्या दर्जाचे आहे. राजकीय क्षेत्रातील बहुदा सर्वच वादळे त्यांना स्पर्श करून गेली आहेत. काही वादळामध्ये ते स्वत: सापडले आहेत., परंतु त्यामधून ते सहीसलामत बाहेर पडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे कटू प्रसंग टाळण्याची प्रवृत्ती. सहसा कटू प्रसंग निर्माण होऊ नयेत याची ते फार दक्षता घेत. आपला मुद्दा इतरांना पटवून देण्याची कला त्यांना चांगली अवगत आहे, म्हणूनच ते राजकारणात यशस्वी झाले असल्याचे दिसून येते. त्यांची जाहीर व खाजगी स्वरूपाची भाषणे ही त्यांच्या प्रवृत्तीची द्योतक आहेत. त्यांची जाहीर सभातील व्याख्याने मूलग्राही-उदबोधक व नवनव्या विचारांनी ओथंबलेली असतात. त्यामधून त्यांचे व्यक्तिवैशिष्ट्य व संशोधक वृत्ती दिसून येते. सुशिक्षित व अशिक्षित श्रोत्यांना ती सारखीच आकर्षित करून घेतात व आपण काहीतरी नवे विचारधन आपल्या संग्रही जमा केले असावे, असे श्रोत्यांना वाटल्याखेरीज राहात नाही.

साप्ताहिक 'गतिमान'चे संपादक श्री. नरूभाऊ लिमये लिहितात, राजकारणाच्या मैदानातील अष्टपैलू यशवंत खेळाडू माझ्या संघाला विजय मिळवून द्यावयाचा आहे, असे यशवंतरावांचे वर्णन करून यशवंतरावजींचे मोठेपण त्यांच्या साडेतीन हात देहात सामावलेले नाही, त्यांच्या वैयक्तिक मानसन्मानात सामावलेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्रातर्फे देशाकरता केलेल्या कामात, सोसलेल्या यातनात सामावलेले आहे. महाराष्ट्र निर्मितीच्या महाभारतात मराठी मनावर एवढे आघात झालेले होते की, केन्द्रातून न्याय मिळत नाही तर आपला आपण स्वतंत्र विचार करावा असे अस्पष्ट बोलले जात होते. त्या काळात काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मजबुती आणण्याच्या कामात यशवंतरावजींचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय आहे. त्यावेळची नेतेपणाची निवडणूक आठवली तर स्वत:ला 'सूर्याजी पिसाळ' हे संबोधन मिळत असताना सांगलीच्या जाहीर सभेत संयुक्त महाराष्ट्र की पंडित नेहरू असा प्रश्न निर्माण झाला तर मी नेहरू नेतृत्व पसंत करेन, असे सांगणार्‍या नेत्याचे विस्मरण भारतीयांना होता कामा नये. तामिळनाडू भलत्या विस्मरण मार्गावर गेला. तो राष्ट्रीय प्रवाहात परत आणताना के. कामराजसारखे नेते पुरे पडले नाहीत. तेथे आपल्या राजकीय जीवनाची बाजी लावून यशवंतरावजींनी महाराष्ट्राला भावनेच्या धारेतून थोपवून धरले.