• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-६१

विविधांगी व्यक्तिमत्व भाग - २

संपादकीय 'अग्रलेखा'तील यशवंतराव

महाराष्ट्रातील पत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून प्रसंगानुसार यशवंतरावांवरती अग्रलेख लिहिले, त्या अग्रलेखात वृत्तपत्रसृष्टीतील मान्यवर संपादकांनी जसे यशवंतरावांचे गुण हेरले तसेच यशवंतरावांवरती दोष दिग्दर्शनही केले. वृत्तपत्र हे जीवनाचा आरसा असतो आणि वृत्तपत्राच्या दर्पणात वेगवेगळ्या संपादकांनी यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांना जसे भावले तसे त्यांनी मांडले. ही मांडणी यशवंतरावांच्या समग्र चरित्रलेखनात अस्पर्शित असलेली बाब! पण त्यामुळे यशवंतरावांच्या एकसंघ व्यक्तिमत्त्वाचे निखळलेले दुवे समर्थपणे समजावून घेण्यास उपयुक्त ठरण्यासारखी महत्त्वाची जमेची बाजू आहे. म्हणून यशवंतरावांच्या अस्पृष्ट व्यक्तिमत्त्वाचा पत्रपंडितांनी घेतलेला हा वेध म्हणूनच मोलाचा वाटतो.

कोल्हापूरहून प्रसिद्ध होणार्‍या दै. ‘पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यशवंतरावांच्याबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात, केंद्रीय अर्थमंत्री असताना यशवंतराव म्हणाले होते, देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. काळ्या पैशाला जर आवर घातला नाही तर ही समांतर अर्थव्यवस्था धोकादायक ठरेल. त्यावेळचे त्यांचे विचार आज खरे ठरू पाहात आहेत. यावरून यशवंतरावांना राजकारणाची व आर्थिक उलाढालीची सखोल जाण होती याची कल्पना येईल. यशवंतरावांच्या या इशार्‍याची केन्द्र सरकारने वेळीच दखल घेतली असती तर या काळ्या पैशाचा जो प्रचंड राक्षस बनला आहे, तो धोका टळला असता तर भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत बनली असती, भ्रष्टाचाराची पाळेमुळे देशात खोलवर रुजली नसती आणि या काळ्या पैशाच्या वापराने पंजाबमधील हिंसाचारासाठी शस्त्रास्त्रे पुरविण्याचे, गर्द आणि अमली पदार्थ आणण्याचे प्रमाण हाताबाहेर गेले नसते.

राजकीय मतभेद असून देखील ना. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचा आदर शब्दांकित करताना दै. ‘मराठाचे’ संपादक आचार्य अत्रे म्हणतात, यशवंतरावांच्या बुध्दिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही, ते एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी व नाट्यरसिक आहेत. त्यांना समाजजीवनाच्या सर्व अंगांविषयी रस आहे. ते उत्कृष्ट वक्ते आहेत, संभाषणचतुर आहेत, शिष्टाचारात निपुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न आहे. म्हणूनच आम्हाला त्यांच्याविषयी आपुलकी वाटते.

ना. यशवंतराव चव्हाण ही व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे, याचा निर्वाळा देताना मुंबईच्या दै. शिवनेरचे संपादक विश्वनाथराव वाबळे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, जवाहरलाल नेहरू ही ना. यशवंतराव चव्हाणांची दैवते आहेत. त्यांना साक्ष ठेवून त्यांनी खेड्यापाड्यातील सामान्य जनतेपर्यंत समतेचा झेंडा फडकवला, लोकशाहीतील लोकराज्याची सत्ता खेड्यापाड्यात पोहचवली. ना. यशवंतराव चव्हाणांचा सामाजिक व राजकीय पिंड म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत चाललेल्या चळवळीची पूर्तता आहे. यामुळे ना. यशवंतराव ही एक व्यक्ती राहिली नसून सामान्यजनांची ती एक शक्ती झाली आहे. या शक्तीची नवी नीती केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर अखिल भारतालाही पोषक ठरत असल्याचा साक्षात्कार होत असल्यास नवल ते काय!

श्री. अनंतराव पाटील, दैनिक ‘विशाल सह्याद्रि’चे संपादक यशवंतरावांच्या कर्तृत्व-नेतृत्व, शहाणपण आणि राजकारण यासंबंधी म्हणतात, यशवंतरावजी राजकारणी होते आणि त्यांनी आयुष्यभर राजकारण केले, तथापि राजकारणापेक्षा यशवंतराव हे माणूस म्हणून फार मोठे होते, त्यात त्यांचे वेगळेपण आणि आगळेपण साठविले होते, साहित्य संगीत, खेळ, सहकार, उद्योग, शेती कुठलेही असे क्षेत्र नाही, की ज्यात यशवंतरावांना रस नव्हता. त्यांच्या जाणिवांचा आवाका मोठा होता. कधी कधी साहेबांचा उल्लेख करताना काही मंडळी बेरजेचे राजकारण, कृपणनीती आदी शब्दप्रयोग मुत्सद्दीपणे वापरतात, तथापि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा आणि चैतन्य देण्याचे काम चव्हाण साहेबांनीच केले, महाराष्ट्राचे राजकारण सर्वस्पर्शी बनविण्यात यशवंतरावांनी फार मोठा वाटा उचलला. काही माणसांच्या स्मृती त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, बुध्दिमत्ता, कर्तृत्व हे प्रेरणा आणि चेतना देणारे ठरत असते. शिवछत्रपती गेल्यानंतर रामदासांनी म्हटले - 'शिवरायांचा आठवावा प्रताप' तसेच म्हणता येईल की, यशवंतरावांचे आठवावे कर्तृत्व नेतृत्व, शहाणपण आणि राजकारण!