शाळेत असताना व तरुणपणी खांडेकरांच्या भावनाप्रधान कादंबर्या, फडके यांच्या प्रणयप्रधान कथा, संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयातील काव्याचा गोडवा चाखला, मॅक्झिम गॉर्की यांची 'आई' कादंबरी असे काही अक्षर वाङ्मय वाचले. त्यामुळे त्यांचा समाजमुख पिंड घडविण्यात मोठी मदत झाली. कर्हाड गावात हरिजन मुलांसाठी शाळा उघडण्याचा आणि तिचे उदघाटन करण्यासाठी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलावण्याचा जोड उपक्रम त्यांनी वयाच्या विशीत केला होता. त्यामागे हेच संस्कार होते.
ललित लेखक होण्याचे आपले स्वप्न त्यांना आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाच्या धावपळीत बाजूला ठेवून द्यावे लागले असले, तरी मनात खोलवर रुजलेला वाङ्मयीन संस्कार मात्र कधीच मिटला नाही. उभ्या हयातीत ते जे जे बोलले वा त्यांनी जे काही पांढर्यावर काळे केले, त्यातून हा संस्कार प्रकट होत राहिला. मुख्य म्हणजे कोणताही अनुभव तादात्म्य पाहून घेण्याची जी क्षमता या संस्कारातून त्यांच्या अंगी आली ती तर त्यांच्या शब्दा-शब्दांतून आविष्कृत झाली आहे. कला, साहित्य, संगीत, नाटय, खेळ या सर्व क्षेत्रांत त्यांनी रस घेतला. जीवनाच्या सर्व दालनांच्या सतत संपर्क-साहचर्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची चैतन्यभूक ते भागवीत राहिले.
साहित्य क्षेत्रातील प्राथमिक भूमिका ही वाचकांची. ती यशवंतरावांनी अत्यंत निष्ठेने व चोखपणे पार पाडलेली आढळते. त्यांच्या वाचनासंबंधीचे व त्यांच्या लेखन-भाषणांतून आलेले संदर्भ नुसते जरी एकत्र केले तर त्यांच्या जिज्ञासेच्या कक्षा किती विशाल होत्या याचा प्रत्यय येतो. उल्लेख न झालेल्या पुस्तकांची संख्या तर कित्येक पटींनी मोठी असावी. मनाची केव्हाही विश्रब्ध अवस्था झाली की पुस्तक काढून वाचीत बसणे, प्रवासात नवनवीन पुस्तके नजरेखालून घालणे हा यशवंतरावांच्या आपल्याकडच्या राजकारण्यांमध्ये अतिदुर्लभ असलेला छंद होता. वैचारिक लेखनाबरोबरच कथा, कांदबरी, कविता वगैरे साहित्यप्रकारही ते आस्थेने वाचीत असत. ''आपल्याला आवडलेले पहिले पुस्तक पहिल्यांदा कसे आणि केव्हा वाचले याची आठवण मनात ताजी असते. हे पुस्तक आपल्या हातात घेऊन कसे कुरवाळले....नव्याकोर्या पुस्तकाला येणारा सुरेखसा वास कसा येत होता'' _ 'कृष्णाकाठ' मधील आठवण. ही अस्सल ग्रंथप्रेमी माणसालाच पटणारी खूणगाठ सांगून आपण खांडेकरांची 'दोन ध्रुव' कोल्हापुरातल्या भुसारी वाड्यातील खोलीत एका पावसाळी दुपारी वाचली. ही आठवण यशवंतराव कित्येक वर्षांनंतर आळवून सांगतात.
खांडेकरांच्या लेखनवैशिष्ट्यांचा परिचय देताना त्यांच्या कादंबर्यातील पात्रे, प्रसंग व संवादांचा हवाला आपल्या उत्स्फूर्त भाषणांतून देतात, तेव्हा त्यांच्या सूक्ष्म आस्वादक वाचकत्वाचीच साक्ष मिळते. त्यांच्या भाषणात मराठी संत, अव्वल दर्जाचे आंग्ल नाटककार-कवी, महानुभाव, आधुनिक मराठी नाटककार-कवी, अन्य क्षेत्रातील कलावंत, एवढेच नव्हे, तर लोकजीवनाशी समरूप झालेले वासुदेव - गोंधळी इत्यादी लोककलावंतांचे नाना प्रकारचे संदर्भ आलेले आढळतात. यावरून त्यांच्या चौफेर व चतुरस्त्र आकलनशक्तीची साक्ष पटते. साहित्याच्या सामाजिक बांधिलकीचे ते स्वत: पुरस्कर्ते असल्यामुळे तसे साहित्य त्यांना विशेष आवडत असले तरी प्रेमविषयक भावनाप्रधान साहित्याचे ही त्यांना वावडे नव्हते. ना. धों. महानोर आणि नारायण सुर्वे या दोघांचीही कविता ते सारख्याच गोडीने वाचीत.
आयुष्यभर केलेल्या चौफेर वाचनामुळेच वाचलेल्या ग्रंथाची आस्वादक समीक्षा करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभलेले होते. विविध साहित्यकृतींबद्दल सहज म्हणून त्यांनी जी विधाने केली आहेत ती त्यांच्या चिकित्सक बुध्दीचा प्रत्यय देतात. एक रसिक या नात्याने ते सहज विधाने करीत असले तरी 'प्रत्येक साहित्यप्रेमी हा आजच्या लोकशाही युगात नम्र समीक्षक असतोच' याची यशवंतरावांना निश्चित जाणीव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच यशवंतरावांचा साहित्यिक म्हणून विचार करताना त्यांनी केलेल्या समीक्षेचा आवर्जून उल्लेख करणे अगत्याचे ठरते. डॉ. प्रभाकर माचवे यांना यशवंतराव रसिक - साहित्यिक - सज्जन वाटतात. ना. सी. फडक्यांना यशवंतराव अधिक प्रिय वाटत ते साहित्यिक व वक्ता म्हणून. यशवंतरावांचे पडलेले भाषण जसे कोणी कधी ऐकलेले नाही त्याचप्रमाणे त्यांचा फसलेला लेखही कधी आढळत नाही. टीकाकार श्री. के. क्षीरसागरांना यशवंतराव हे साहित्यिक राजकारणी वाटतात. यशवंतरावांबद्दल ते म्हणतात की, ''अंगात रग आहे तो पर्यंत राजकारणाच्या रिंगणातून ते बाहेर पडतील अशी कल्पना करवत नाही, पण जर कधी काळी बाहेर पडले तर त्यांनी खरे-खुरे नि:संकोच आत्मचरित्र लिहावे'' अशा प्रकारे यशवंतराव राजकारणाप्रमाणे साहित्यातही श्रेष्ठ नेते ठरतात.