• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विविधांगी व्यक्तिमत्व-३९

अशा परिस्थितीत कर्‍हाडच्या नगराध्यक्षांनी मुंबई इलाख्याचे गव्हर्नर फेलेडरिक साइक्स यांना कर्‍हाडला निमंत्रण करून त्यांना मोठ्या सन्मानाने मानपत्र देण्याचे ठरविले. या समारंभाविद्ध लोकमत जागृत करण्याचा निर्णय चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला. कराड शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या काही भागात ही मानपत्राचा निषेध करणारी चळवळ उभी राहिली. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्यावेळी जवळजवळ पंचवीस हजारांचा जमाव हातात काळे झेंडे घेऊन निदर्शन करीत होता. यशवंतराव आणि त्यांचे मित्र, कार्यकर्ते यात प्रथमपासून शेवटपर्यंत सहभागी होते.

यानंतर एक दोन दिवसातच कर्‍हाडमधील महत्त्वाच्या २०-२५ कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. या निदर्शनाचे विराट स्वरूप बघून जे या आंदोलनाच्या बाबतीत उदासीन होते त्यांच्याही मनात या चळवळी संबंधी आपुलकी निर्माण झाली. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने यशवंतरावांच्या अनेक नवीन ओळखी होत होत्या, त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारित होते. स्वराज्याची चळवळ १९३० च्या आंदोलनातून शहराकडून खेड्याकडे गेली आणि त्यामुळे एक महत्त्वाचा बदल झाला. हिंदुस्थानच्या सर्व भागातला शेतकरी समाज विचारपूर्वक स्वातंत्र्य संग्रामाच्या पाठीशी येऊ लागला. यशवंतराव म्हणतात “हिंदुस्थानच्या जीवनात जसा या वर्षाने फरक केला, तसाच माझ्याही जीवनात केला. मी आता अनुभवी, विचाराने समजूतदार, असा एक कार्यकर्ता बनलो.”

सातार्‍यात मधून मधून जिल्हा राजकीय परिषद भरत असे. कराड तालुक्यातील मसूरच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ही जिल्हा परिषद मसूरला भरवावी असे निमंत्रण दिले.

या परिषदेसाठी जिल्ह्यातील सर्व नेते, तसेच पुण्या-मुंबईनही बरेच महत्त्वाचे नेते आले होते. कोल्हापूरचे प्रजा परिषदेचे प्रसिद्ध नेते भाई माधवराव बागल यांनाही विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते.

या अधिवेशनात माधवराव बागलांनी एक उपसूचना मांडून आर्थिक स्वरूपाच्याही कांही मागण्या सुचविल्या. या अधिवेशनात बहुसंख्येने शेतकरी समाजच उपस्थित होता. माधवराव बागलांनी “मी शेतकर्‍यांचा आवाज या परिषदेत उठविणार आहे” असे सांगून आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यांच्या सूचनांना लोकांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. यशवंतराव म्हणाले “पिळल्या जाणार्‍या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात आम्ही यशस्वी झालो यांचा आम्हाला आनंद वाटला.” याच वेळी यशवंतरावांनी ठरविले की यापुढे चळवळीत भाग तर जरूर घ्यायचा, पण तो डोळसपणाने घ्यायचा ते म्हणतात, “मसूरच्या राजकीय परिषदेने मला खूप शहाणे केले, गरिबांचे कैवारी कोण आणि विरोधी कोण हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याची चळवळ चालविली पाहिजे, असा विचार माझ्या मनाशी येऊन गेला” या निमित्ताने यशवंतरावांच्या, अनेक नवीन कार्यकर्त्यांशी ओळखी झाल्या. यातील काही प्रमुख व्यक्ती म्हणजे वाईचे किसनवीर, वाळव्याचे आत्माराम पाटील व पांडुरंग मास्तर, कातरखटावचे गौरीहर सिंहासने इत्यादि.

गांधी-आयर्विन कराराने कॉंग्रेसची व गांधीजींची शक्ती जनमानसात वाढली होती. जनतेच्या अंत:करणातले त्यांचे हे स्थान दडपशाहीच्या मार्गाने कमी करण्याचा व्यूह लॉर्ड विलिंग्डनने रचला होता. पं. नेहरूंना अटक झाली होती. वर्किंग कमिटीच्या मागण्या फेटाळून चार जानेवारीला महात्माजींना अटक करण्यांत आली. सरकारच्या या आक्रमक धोरणाविरूद्ध सर्व देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली. कॉंग्रेस विरूद्ध ब्रिटीश सत्तेने अघोषित युद्धच पुकारले.

अशा या बदललेल्या वातावरणात यशवंतराव आणि त्यांचे सहकारी स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होऊन यशवंतरावांवर २६ जानेवारीचा दिवस सर्व ठिकाणी संस्मरणीय ठरेल, अशा रीतीने साजरा होईल हे ठरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.