यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख रेखाटताना दिसते की ते थोर देशभक्त, रसिक व्यक्तिमत्व, धुरंधर मुत्सद्दी, विचारवंत, गुणग्राही, सौजन्यमूर्ति व्यवहारी राजकारणी, दिलदार मित्र व लोकांच्या प्रेमात गुरफटलेला नेता असे या चित्राची एक पाकळी उमलून येते, तर समर्थ समाजवादी, लोकशाही निष्ठा, लोकशाहीचे पुरस्कर्ते, थोर-चारित्र्य संपन्न समाजसेवक, अभिरूची संपन्न सुसंस्कृत कला रसिक, गुणग्रही राजकारणी अशी या व्यक्तिमत्त्वाची ही एक दुसरी पाकळी आणि साक्षेपी वाचक, ओजस्वी वक्ते, विचारवंत, समृद्ध महाराष्ट्राचे शिल्पकार, सह्याद्रिचा प्रतिभा संपन्न भूमिपुत्र, मराठी मनाचा तुरा ही या व्यक्तिमत्त्वाची तिसरी पाकळी, अशा या पाकळ्याचे बनलेले हे पुष्प पंडितजींच्या नंतर त्यांच्या तुमानीवरील गुलाबी पुष्पांचा सुगंध भारतीय जनतेला देईल अशी आशा अनेक देशी-विदेशी मुत्सद्यांनी बाळगली होती. त्या सर्वांचे श्रेय यशवंतरावांनी आपल्यावर झालेल्या अनेक व्यक्तिंच्या श्रद्धा स्थानामुळे, राजकीय व्यक्तिंच्या जीवनातील चढउतारामुळे विचारवंत व्यक्तिंच्या वैचारिकतेचा धांडोळा घेतल्यामुळे यशवंतरावांची एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जडण-घडण झाली. अशा सर्व व्यक्तिंचे संस्कारही यशवंतरावांनी प्रमाण मानले. “मी यशवंतराव होणार” हे सिद्ध करून आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या वाटचालीला अनेक हितचिंतक आणि मित्रांचे पाठबळ कसे लाभले यालाही यशवंतरावांनी मानाचे स्थान दिले आहे.
एकूणच सामान्य ग्रामवासी व्यक्ती जीवनाच्या सर्वांगिण उन्नतीचा ध्यास घेतलेल्या यशवंतरावांचे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक पडलेले दिसते. त्यांनी शेतीच्या बांधबंदिस्तीपासून सुरवात करून कष्टकर्यांना शेतीचे मालक बनविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. महाराष्ट्राच्या शेतीचा विकास हाच महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा विकासाचा कणा ठरतो. हा विचार प्रमाण मानला. असा महाराष्ट्र मोठा झाला तर देश मोठा होईल. देशाच्या सेवेसाठी महाराष्ट्र मागे-पुढे पाहणार नाही. याची ग्वाही देशाला दिली. या त्यांच्या विचारामुळे सागरकाठचा हा नेता यमुनातटाकीचा रक्षक बनला. नव्या क्षेत्राच्या नव्या जाणिवा आणि उद्याच्या भारताचे स्वप्न उराशी बाळगून यशवंतरावांनी लोकशाही, समाजवाद आणि राष्ट्रीय ऐक्य यांचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विचाराला लाभलेली ही भारतीय पातळी म्हणजे खर्या अर्थाने अखिल मानव जातीच्या कल्याणकारी राजकारणाची वैचारिक बैठकच होती आणि ती त्यांच्या मानवतावादी जीवननिष्ठेशी सुसंगतच होती. यशवंतरावांच्या ह्या वैचारिक राजकारणाचे विसाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात विस्मरण झाल्याने आजचे भयावह चित्र निर्माण झाले आहे.
यशवंतरावांच्या संस्कारातून साकारलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची वैचारिक बैठक यशवंतरावांनी संधी मिळेल तेव्हा लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग हिंदीच्या प्रगती विषयी बोलायचे असो किंवा समाजातील भेदाभेदाच्या बाबींसंबंधी बोलावयाचे असो, लोकशाही राबविणार्या प्रशासकांना मार्गदर्शक करावयाचे असो, विकसित अविकसित राष्ट्रांचे आर्थिक संबंध तपासावयाचे असो की एकूणच देशाच्या अर्थनीतिची उकल करावयाची असो यशवंतरावांनी आपल्या विचाराचे सूत्र स्पष्टपणे मांडले आहे.
यशवंतरावांनी समाजजीवनाच्या आनंददायी दालनाचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक लहान-मोठ्या साधनांचा वापर करता येतो हे सांगताना ललित साहित्याची सामाजिकता जशी विषद केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी ही साहित्याची महत्त्वाची कसोटी मानली आहे. लोकभाषा ही ज्ञानभाषा होणार नसेल तर लोक ज्ञानापासून वंचित राहतील याची जाणीव करून दिली. अशा साहित्यिकांचा यशवंतरावांनी अनेकदा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचे वास्तव यथार्थ मूल्यमापन करून अशा साहित्यिक मित्रांचा सन्मान ही केला आहे. यशवंतराव हे जसे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते तसाच एक व्यक्तिमत्व होते तसाच एक व्यक्तिमत्वाचा अविष्कार ज्या शैलीतून झाला ती सुद्धा एक स्वतंत्र अशी वाङ्मयीन शैली आहे. अखिल महाराष्ट्राला यशवंतरावांचा पहिला प्रत्यय आला तो रानडे वक्तृत्व स्पर्धेच्या यशानंतर. त्या वक्तृत्व स्पर्धेतील विषय आणि त्यासाठी त्यांनी वापलेली शैली अडाणी माणसापासून ते विद्यावाचस्पती पर्यंतच्या सर्वांवर प्रभाव टाकणारी ठरली.
यशवंतरावांची ही स्वतंत्र वक्तृत्वपूर्ण शैली अनेक थोर मराठी साहित्यिकांनी गौरवलेली आहे. किंबहुना यशवंतरावांच्या मराठी जनमानसाचा ठाव घेणार्या या वक्तृत्व शैलीमुळेच अनेक नामवंत मराठी साहित्यिक त्यांच्या प्रेमात पडले. यशवंतरावांनी आपल्या आयुष्यात कधीही आडपडदा ठेवला नाही. जीवनातील आशा निराशेचे क्षण त्यांनी मित्र आणि जनतेसमोरही वेळोवेळी मांडलेले आहेत. योग्य वेळी निराशेची कारणे दूर सारून आपल्या जीवनांतील आशावादाची कास धरली आहे, आणि अखिल मानवजातीच्या सेवेचे जीवनरूप पंचामृत सतत सर्वत्र शिंपडलेले आहे. असे हे एक चिंतनशील, प्रभावी वक्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आज तरी दिसत नाही इतकेच नव्हे तर भारताच्या सद्यस्थितीत यशवंतरावांचे विचार आणि कार्यपद्धती हाच एक पर्याय आहे असे होते यशवंतरावांचे संस्कार संपन्न सदाचारी व्यक्तिमत्व.