यशवंतरावांचा आत्मसंवाद
(निवडक मुलाखती)
यशवंतराव चव्हाण ही व्यक्ती नसून तो एक विचार आहे. ती आधुनिक संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व इतर अनेक क्षेत्राच्या जडणघडणीला आकार देणारी एक चालतीबोलती संस्थाच होती. या संस्थेचे आज प्रत्यक्ष अस्तित्व आपणात नाही. पण अनेक जितीजागती स्मारके आज अस्तित्वात आहेत. यशवंतराव चव्हाण ही एक व्यक्ती नसून एक विचार आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो अलंकाराचा भाग नसतो. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने म. फुले, राजर्षि शाहू महाराज, महर्षी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला विकसित करण्याचे, सत्तास्थानी राहून याबाबत त्यांनी कठोर टीकाकाराची भूमिका न घेता नेहमीच समन्वयकाची व आत्मशोधकाची भूमिका घेतलेली दिसते.
वैचारिकदृष्ट्या यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व अगदी तरुण वयातही कसे संपन्न आणि समतोल होते याविषयीची माहिती त्यांच्या आत्मचरित्रात (कृष्णाकाठमध्ये) त्यांचे बंधू गणपतराव यांच्याबरोबर त्यांनी केलेल्या चर्चेत आली आहे. गणपतरावांशी नंतर माझी जी चर्चा झाली त्यावेळी मी त्यांना सांगितले. महात्मा फुले यांचे चरित्र वाचल्यानंतर मला काहीतरी नवीन वाचल्यासारखे वाटले. त्यांनी उभे केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण त्यासाठी कोणत्यातरी एका जातीचा द्वेष केला पाहिजे ही गोष्ट काही मला पटत नाही. जे समाज मागे पडले आहेत त्यांना जागृत करणे, त्यांच्यात नवीन सुधारणा करणे हाच एक मार्ग उत्तम आहे अशी माझी बाजू होती. या सर्व चर्चेचा माझ्या मनावर एक परिणाम असा झाला. पुष्कळसे असे महत्त्वाचे प्रश्न आहेत, की जे आपल्याला आकलन होत नाहीत व ते आपण समजावून घेतले पाहिजे हे तीव्रतेने जाणवले. यासाठी मोठया आणि शहाण्या मंडळींशी बोलले पाहिजे, इतरांशी संभाषण आणि संवाद केला पाहिजे अशीही जाणीव झाली. तेच करण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या या वयात मी एका स्थित्यंतरातून चाललो होतो त्याची ही साक्ष आहे. (कृष्णाकाठ पृष्ठ ३४-३५) हे चित्र वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षी यशवंतरावांच्या मनात निर्माण झालेल्या वैचारिक आंदोलनाचे आहे. त्यांच्यापुढील प्रगल्भ समतोल प्रागतिक मनोरचनेचा पाया असा त्यांच्या लहानपणीच भक्कमपणे रोवला गेलेला दिसतो.
अशीच उदार पार्श्वभूमी त्यांच्या अध्यात्मिक आणि आस्तिक्यवादी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्याही मुळाशी आहे असे जाणवते. 'मी कुठल्या एका दगडाच्या मूर्तीत ईश्वर आहे आणि सर्व चालवतो आहे असे माझे मत नाही., परंतु आपल्याला न समजणारी अशी एक जबरदस्त शक्ती आहे व तिचे अस्तित्व मानणे आवश्यक आहे. त्याशिवाय अनेक गोष्टींचा उलगडाच होत नाही' (कृष्णाकाठ- पृष्ठ ५३)
या व्यापक मनोभूमिकेमुळेच यशवंतरावांना महाराष्ट्राच्या जीवनाच्या सर्वांगाला परीसस्पर्श करता आला. सांस्कृतिक, शैक्षणिक, वाङ्मयीन, सामाजिक, क्रीडा व मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांच्या जडणघडणीला जो एक सजग आकार त्यांना देता आला तो यामुळेच.
यशवंतराव आज आपल्यात नाहीत(नसले) तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा आधुनिक व नवतरुण महाराष्ट्राच्या गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या वाटचालीत जागोजागी उमटलेल्या दिसतात. विशेषत: गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातही जातीविद्वेषाचे आणि विघटनवादाचे जे बीज रोवले जात आहे त्या संदर्भात यशवंतरावांची आज आठवण होणे अपरिहार्य आहे.