अस्पृश्योद्धारासाठी म. गांधीनी जी चळवळ केली ती यशवंतरावांना मान्य होती पण आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या मागण्या घटनात्मक मार्गांनी मिळविण्याचा जो प्रयत्न केला तो यशवंतरावांना मूलगामी स्वरूपाचा वाटला. शतकानुशतके दडपल्या गेलेल्या अस्पृश्यांना आपल्या उद्धारासाठी जास्तीत जास्त हक्क व सवलती मिळाल्या पाहिजेत आणि तो त्यांचा हक्कच आहे ही आंबेडकरांची भूमिका यशवंतरावांना मान्य होती आणि त्या बाबातीत ते बाबासाहेबांना हिरीरीने पाठिंबा देत असत. यशवंरावांनी अस्पृश्यांच्या बाबातीत समाजाला जी शिकवण दिली तो त्यांचा वारसाचा आहे असे समजावयास हरकत नाही.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या चिरंतन हितासाठी जेव्हा बौद्धधर्म स्वीकारला तेव्हा नवबौद्धांना अस्पृश्यांना दिल्या जाणार्या सवलती व हक्क दिले जावेत किंवा नाही हा वादाचा विषय झाला. यशवंतरावांनी या वादाच्या बाबतीत निश्चित भूमिका घेतली ती ही, की नवबौद्धांना हे हक्क व सवलती देणे हाच न्यायाचा मार्ग आहे. सबंध देशात यशवंतराव चव्हाण हे एकच मुख्यमंत्री निघाले, की ज्यांनी नवबौद्धांना हे हक्क दिले जातील ही घोषणा केली आणि ती अमलातही आणली. समाज सुधारणेच्या त्याचप्रमाणे समाज परिवर्तनाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले ते त्यांचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते.
यशवंतराव चव्हाण सर्वांगीण परिवर्तनाचे भोक्ते होते. विविध विषयांमध्ये त्यांना रस असे. नवनाट्य, नवकाव्य आणि विशेषत: दलित साहित्य आणि सांस्कृतिक पुनरूज्जीवनाच्या आंदोलनाला त्यांनी अग्रक्रमाने स्थान दिले ही वस्तुस्थिती आहे. त्यांना समाजाची काळजी होती, आस्था होती आणि हा समाज उन्नत झाला पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता.
यशवंतरावांसारख्या एक समर्थ माणूस महाराष्ट्रामध्ये जन्माला आला ही सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यांनी आयुष्यामध्ये जे जे काही कार्य केले त्या कार्याला एक दिशा होती, त्याला एक अधिष्ठान होते. पण त्या अधिष्ठानाच्या मागे जी भूमिका होती ती समाजाचे हित साधावे ही होती. कोणत्याही अडचणी आल्या तरी यशवंतराव कधी विचलित झाले नाहीत. यशवंतरावांच्याविषयी एक निर्वाळा मात्र दिला जाईल, की महाराष्ट्रात समाजपरिवर्तनाची जी दिंडी अव्याहत चालू राहिली आहे तिच्यामधील अग्रस्थानीचे मानकरी म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे नांव अभिमानाने घेतले जाईल.
यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्रात झालेल्या या सर्व सामाजिक क्रांतीच्या चळवळीचे चांगलेच भान होते. या सर्व सामाजिक चळवळीचा भाग म्हणून यशवंतरावांनी १९५९ मध्ये आर्थिकदृष्ट्या मागसलेल्या विद्यार्थ्यांच्या फीमध्ये सवलत देण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. या निर्णयाने शेतकरी, दलित, आदिवासी आदी सगळ्या सामान्य कुटुंबातील लाखो मुले महाविद्यालयाच्या दालनात आली. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही म. जोतीराव फुले, राजर्षि शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे मोल ते जाणत होते. राजकारणाशी तडजोड करीत असतानाच गरीब समाजाची मोडतोड होणार नाही याची ते काळजी घेत होते. यशवंतरावांनी आपल्या सबंध ह्यतीत गरीब माणूस आपल्या धोरणातून सोडलेला नाही. अगदी गरीब कुटुंबातून प्रेमाच्या श्रीमंतीवर मोठा झालेला हा नेता होता. माणसांविषयीचे अतूट नाते त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेल्या संस्कारातून निर्माण झालेले होते. ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांची आईच त्यांची शाळा होती. प्रेमाचा संस्कार हाच त्यांचा विचार होता. आंधळे असू नये, आंधळा दुनियेत हिंडू शकेल पण आंधळ्याच्या मागे दुनिया जाऊ शकणार नाही, हे त्यांचे सांगणे होते.