यशवंतराव चव्हाण
विविधांगी व्यक्तिमत्व
वि. वि. पाटील
--------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
मनोगत
यशवंतरावजींच्या सहवासामध्ये सुमारे पंचवीस-तीस वर्षे त्यांना जवळून निरखण्याची संधी मला अनायासे प्राप्त झाली. मी कर्हाडचा रहिवासी असल्यामुळे यशवंतरावांचे कर्हाडला सातत्याने येणे-जाणे होत असल्यामुळे त्यांना अनेकविध पैलूंतून अगदी जवळून पाहण्याचा योग मला आला. यशवंतराव हे व्यक्तिमत्त्वच असे प्रभावी होते, की राजकारणातील, समाजकारणातील तसेच शिक्षण-कला-अर्थ इत्यादी विविध क्षेत्रातील जाणत्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. जशी असामान्यांना प्रेरणा मिळाली तशी सामान्यांनाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. माझ्या बाबतीत नेमके तेच घडले. ग्रंथालयाच्या सहवासात असलेला मी एक ग्रंथप्रेमी माणूस. यशवंतरावांच्या ग्रंथप्रेमामुळे त्यांच्या सहवासाशी बांधला गेलो. त्यांच्या जिव्हाळयाचे अनेक कटाक्ष मला अनुभवता आले. त्यांच्या राजकीय जीवनातील चढ-उतारातील सगळे बारकावे मला जवळून पाहता आले. यशाने हारखून न जाणारा व अपयशाने न खचणारा त्यांचा समतोल मला नेहमीच मोहक वाटला. आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक जबरदस्त प्रभाव माझ्या मनावर पडला. आणि यशवंतरावांच्या कर्तृत्वाचे प्रेम माझ्या मनात आपसूक निर्माण झाले. त्या प्रेमातून मी त्यांचे विचार, त्यांच्यावरील ग्रंथ व यशवंतरावांचे वरील सर्व प्रकारचे साहित्य प्रसंगी पदरमोड करून संग्रहित करण्याचे व्यसनच मला लागले. त्यातून या ग्रंथाची प्रेरणा माझ्याकडे उदीत झाली आणि यशवंतरावांचे सर्वांगीण दर्शन विविधांगी रूपात आपण साकार करावे ही भावना माझ्या मनात मूळ धरू लागली. त्याचे साक्षात रूप म्हणजे सिद्ध होत असलेला हा ग्रंथ होय.
यशवंतरावांच्या साहित्यिक गुणवत्तेविषयी माझे विनम्र अनुभव नोंदविताना मला एक विलक्षण योगायोगाची आठवण होते. कारण सातारा येथे फेब्रुवारी १९९३ मध्ये भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसंगी प्रकाशित झालेल्या दैनिक 'ऐक्य' विशेषांकासाठी मी 'यशवंतराव: एक साहित्यिक' हा लेख पाठविला होता, तो प्रकाशितही झाला. त्या 'ऐक्य' साप्ताहिकाचे दैनिकांत रूपांतर झाल्याचे प्रकाशन यशवंतरावांच्या हस्तेच दि. १९.१.१९६७ साली झाले होते. आणि यापूर्वी सातारा येथे नोंव्हेंबर १९६२ साली भरलेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटकही यशवंतरावच होते. आज ते हयात असते तर साहित्याविषयीचे आपले काही परखड आत्मचिंतन आजच्या विशिष्ट परिस्थितीत त्यांनी जरूर सुचवले असते, कारण साहित्याविषयीचे प्रेम हा त्यांच्या लहानपणापासून त्यांना लाभलेला एक छंद होता.