व्याख्यानमाला-१९८०-५१

आपल्या देशात ब-याच ठिकाणी आज आपण सरकारच्या मदतीने केन्द्रे चालवितो. एड् सेंटर चालवितो. आर्टिफिसीयल ‘इन्सिमिनेशन’ सेंटर चालवितो किंवा फ्रेजन्स सिमेन-गोठविलेले विर्य काही ठिकाणी मिळते, उरूळीकांचनची श्री. मनीभाई देसाई यांची जी संस्था आहे, तिच्या मार्फतही काही ठिकाणी त्यांची केंद्र चालविली जातात. मात्र अनुभव असा येतो की, कोणत्या गायीला कोणत्या वळूचा क्रॉस करावा याचे ज्ञान नसल्यामुळे, त्यामध्ये अनेक चुका होतात. शेतक-यांमध्ये अजूनही एक प्रवृत्ती आहे की, ते अगोदर गाय बैलाकडूनच कव्हर झाली पाहिजे असा प्रयत्न करतात. ती चार-दोन वेळा उलटली की, पुन्हा प्रयत्न होतो तो म्हणजे. ‘आता डॉक्टरांची परीक्षा बघू’ म्हणून. आणि मग तेथेही फारसे चांगले अनुभव येतात असे नाही. मी एका केंद्राचा अभ्यासक म्हणून मुद्दाम त्या केंद्रावर जात होतो. तेथे मी पाहिले की, रिपिटेशनचे परसेंटेज फार मोठे होते. किती असावे असे तुम्हाला वाटते? त्या केंद्रावर रिपिटेशनचे परसेंटेज सुमारे सत्तेचाळीस टक्के होते! एवढे मोठे जर परसेंटेज असेल तर कोणाचा विश्वास बसेल की, ही केंद्रे योग्य चालली आहेत म्हणून! हे विर्य योग्य आहे असे कोणीच म्हणणार नाही, आणि तसे म्हणतही नाही. म्हणून याची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आले की, माणसे सगळीकडची परीक्षा फसल्यावर, मग डॉक्टरची परीक्षा घ्यायची, मग त्या जनावराची आणि शेवटी त्या गायीच्या कसोटीला आपले नशीब घासत बसावयाचे असा प्रयत्न करतात. याबाबतीत जाणीव पूर्वक ही गाय माझी आहे, या गायीवर योग्य पद्धतीचा क्रॉस केला पाहिजे, तिच्यापासून जी नवी पिढी निर्माण होईल, ती कोणत्या कॅरेक्टरची निर्माण झाली पाहिजे, असाही प्रयत्न या निमित्ताने झाला पाहिजे. गायीच्या दुधाचे प्रमाण वाढले पाहिजे, त्यातील प्रोटीन्सही वाढली पाहिजेत याबाबतीत तसेच जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे. पण तसे होत नाही.

दुदैवाची गोष्ट अशी की, ज्याची ‘जिनेटिक टेस्ट’ झालेली आहे, असा एखादासुद्धा वळू आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकलो नाही! याबाबती अजूनही टेस्ट चालू आहेत म्हणे! आपण ज्याला सिद्ध वळू म्हणतो, किंवा ज्याची कॅरेक्टर्स शास्त्रीयदृष्ट्या तपासून, ‘हा या आमच्या महाराष्ट्रातला सर्वोच्च किताब देण्यास योग्य असा वळू आहे’, असे अजूनही धाडसाने म्हणता येत नाही. म्हणून आम्ही परदेशातून मिळेल तो, तोही डोनेशनमधून किंवा कोणी मदत केली म्हणून, एखाद्या सेस्थेने मनावर घेतले म्हणून, किंवा एखाद्या संस्थेने त्यांना नको आहे म्हणून, तुम्हाला देऊ केला, अशा प्रकारच्य वळूची आपल्या इकडे आयात केली जाते. परदेशामध्ये याबाबतीत फार काळजी घेतली जाते,. विशेषतः वळू म्हणून ज्याचा वापर करावयाचा आहे, त्या वळूची आजी कशी होती, त्याची आई कशी होती, आई किती दूध देत होती, त्याच्यात तिची आई आणि ज्याचा क्रॉस केला त्या दोन्हीमधील कॅरेक्टर त्याच्यामध्ये किती आल्या, त्याचा प्रयोग पहाणयासाठी त्याची गुणात्मक खात्री करून घेतली का, हे पाहिले पाहिजे. ह्या सगळ्या बाबी चेक करून घेतल्यानंतर जो पात्र ठरणारा वळू असतो त्याला सिद्ध वळू असे म्हणताता व हीच ती जिनेटिक टेस्ट. ही इतकी अवघड आहे की, अजूनही आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो नाही. आम्ही प्राथमिक अवस्थेत आहोत. म्हणजे त्या क्षेत्रातले आमचे ‘किंडर गार्डन’ चालू आहे. काही देश या क्षेत्रात मात्र ‘पीएच्.’ डी. झालेले आहेत या व्यवसायामध्ये डेन्मार्कसारखे किंवा त्याच्य जवळची जी लहान लहान राष्ट्रे आहेत, तेथे त्यांनी दुधाची व लोण्याची ‘धवल क्रांती’ केली. ही क्रांती करताना त्यांनी खूप कष्ट केलेत, श्रम घेतलेत आणि ते करायला आपणाला फार काळ लागेल. आपण जगासाठी, देशासाठी नंतर पाहून. पण आपल्या संसाराला काही तरी उपयुक्त व्हावे. आपल्या नव्या पिढीला एक पूरक अन्न मिळावे. ही सुदृढ बनावी म्हणून या व्यवसायाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. असे माझे स्वतःचे मत आहे. या व्यवसायाकडे पहात असताना या क्षेत्रामध्ये आपल्य गावापुरते आपण काय करू शकतो, आपल्या तालुक्यापुरते आपण काय करू शकतो, याचा विचार करण्याची आवश्याकता आहे, आमि ही आवश्यकता पुरी करण्यास कोणीतरी सरकारी माणूस, एखादा डॉक्टर, किंवा त्याक्षेत्रामध्ये असणारा कोणीतरी हितचिंतक, कोणीतरी व्याख्याता येईल व आपली गरज भागविले, असे म्हणून चालणार नाही. हे तर शेंडीवरचे संकट आहे! हे दुहेरी संकट टाळावयाचे असेल, आर्थिक आपत्ती टाळावयाची असेल, त्याक्षेत्रात यशस्वी व्हावयाचे असेल, शेतीला पूरक धंदा शोधावयाचा असेल तर, या व्यवसायाची जाणीवपूर्वक निवड केली पाहिजे. आमि हे करण्यासाठी आपल्याला यापुढे शेड्यूल्ड ठरवावी लागतील. व त्या प्रमाणे कार्य करावे लागेल. आपल्या देशात याक्षेत्रातले अनेक नवीन तज्ञ लोक निर्माण झाले आहेत त्यांचा उपयोग करून घेऊन आपण हा व्यवसाय सुरू केला पाहिजे. आपण आपल्या गावात निरनिराळी व्याख्याने आयोजित करतो, यात्रा करवितो, उरूस करतो, देवधर्माचे करीत असतो, ग्रंथही लावतो. माझी अशी अपेक्षा आहे की, आपल्या भागामध्ये प्रत्येक गाव आपला वर्षातला एक दिवस दुग्धविकास व्यवसायामधील तज्ञ लोकांना बोलवायचे ठरविल तो सुदिन होय! त्याचे मार्गदर्शने घ्यावयाचे आणि त्या गावामध्ये दहा-वीस लोकांनी मनावर घेऊन, आपणाला हा धंदा करावयाचा आहे, अशा इराद्याने प्रयत्न करण्याची आज आवश्यकता आहे.