व्याख्यानमाला-१९८०-४९

तज्ञ मंडळी या विषयावर सहमत होवोत अथावा न होवोत, पण आपणाला मात्र असा विचार करावा लागेल की, या बाबीमध्ये प्रयोगासाठी सूट होणारी गाय आणि तिच्यापासून होणारी “प्रोजनि” तिच्यामध्ये काही चांगले गुण, काही चांगले कॅरेक्टर्स आले पाहिजेत. आणि ते येण्यासाठी आपणला असे प्रयोग करावे लागतील की याच विभागामध्ये मिळणा-या चांगल्या गायी शोधून, त्या एकत्र आणून कोणत्यातरी तज्ञ जाणत्याकडून, कोणत्या गायीवर कोणता क्रॉस केला तर, त्याच्या पासून आम्हाला अधिक फायदा होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागामध्ये जेथे शेतीप्रधान वसती आहे, जेथे शेतकरी लोक राहातत, शेतीशी ज्यांचे नाते आहे, अशा मंडळीनी या क्षेत्रातमध्ये उतरायला काहीच हरकत नाही. मग ते क-हाडमध्ये राहोत, नाहीतर आणखी लहानशा शेजारच्या खेड्यामध्ये राहोत कोणत्याही ठिकाणी हा धंदा होऊ शकतो, जेथे जवळच शेती आहे, चा-याचा प्रश्न सोपा आहे, पाणीही उपलब्ध आहे आणि कष्ट करण्याची मानसिक तयारी आहे, अशा दोन-चार गोष्टी असल्यानंतर, आपणाला या व्यवसायाकडे वळावयाला काहीच हरकत नाही.

याठिकाणी मी मुद्दाम माझा अनुभव सांगतो की, मी हा विचार करून दुग्ध व्यवसाय करावयाचा ठरवून, १२-१४ वर्षापूर्वी तिकडे वळलो आणि ठरवून टाकले की, आपण म्हैसी पाळावयाच्या. तेव्हा मी या देशातल्या सगळ्या चांगल्या बाजारपेठा पहाण्याचा प्रयत्न केला. कोठे चांगली म्हैस मिळते, तेथे गेले. मिरज-सांगलीकडचा सगळा भाग पाहिला. हरियाना मधील ‘रोहटक’ येथील, जागातील म्हैसीचे एक उत्तम मार्केट समजल्या जाणा-या ठिकाणी गेलो. आणि तीस-पस्तीस म्हैसी आणल्या. मी आणलेल्या म्हैसी चांगल्या प्रतीच्या होत्या. त्या दूधही चांगल्या देत, शिवाय व्यवसाय म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो होतो. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, म्हैसीचा धंदा (दुग्धव्यवसाय) हा आजच्या काळामध्ये किफायतशीर ठरत नाही. म्हैसीला जेवढा खर्च येते तेवढाच खर्च, जर आम्ही गायीसाठी केला तर, ती अधिक किफाययतशीर ठरते. गायीवर क्रॉस होऊ शकतो, गाय आणि म्हैस यांच्यातील ड्राय पिरियड (भाकड काळ) मध्ये फरक आहे. तर मगा आम्ही शेतक-यांनी, म्हैसी ऐवजी गायी पाळण्याचा व्यवसाय कां करू नये? गायींवर क्रॉस करायला नव्या नव्या जातीच्या गायी निर्माण करण्याच प्रयत्न आपण केला पाहिजे अशा विचाराप्रत मी आलो.

मी हे पाहाताना अनेक शेतक-यांकडे गेलो. अनेक रिसर्च सेंटरमध्ये गेलो, सरकारी फार्म्समध्ये गेलो आणि तेथे बारकाईने सर्व गोष्टींचे निरिक्षण केले. तेथे असे दिसले की, म्हैसीला जर तुम्ही पाच रुपयांचे खाद्या घातले तर, ती काही काळ पाच रुपयाऐवजी सात रुपयांचे दूध देते. पण ती सतत-सर्वकाळ दूध देत नाही. ते तिला शक्य नसते, त्यामुळे खायला घातलेले अन्न हे तिला जगविण्यासाठी उपयोगी ठरते. त्याचा दूध वाढविण्यासाठी उपयोग होत नाही. परंतु क्रॉस केलेली गाय दूध देत असेल तर ते या म्हैसीपेक्षा कमी असले तरी, ती सदासर्वकाळ दूध देऊ शकते.

आपण एखाद्या चक्कीवर गेलो. जर पायलीभर दळण दळले तर, पायलीचेच पीठ खाली पडते. तसे त्या दुभत्या गायीला तुम्ही ज्या प्रमाणात चारा द्याल त्या प्रमाणात तिच्या दुधामध्ये वाढ होऊ शकते. हे म्हैसीच्या बाबतीत होत नाही. तसेच क्रॉस न केलेल्या गायीच्या बाबतीतही ते आढळत नाही. यातली दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, क्रॉस केलेली जनावरे व्याल्यानंतर तीस ते शंभर दिवसतात पुन्हा हिटवर येतात. ती जर पुन्हा कव्हर झाली तर, ती पुन्हा आटण्यापूर्वी वितात. त्यामुळे विण्यापूर्वीचा जो अगदी शेवटचा महिना-दीड महिना असतो; तेवढ्याच काळापुरते, तिचे दूध सोडून द्यावे लागते. एवढा काळ सोडला तर, क्रॉस केलेली गायीची आयुष्यभर दूध देण्याची क्रीया चालू असते. शिवाय क्रॉस केलेली गाय व क्रॉस न केलेली गाय, यांची तुलना करता सारख्याच आयुर्मानमध्ये क्रॉस केलेली गाय, क्रॉस न केलेल्या गायीपेक्षा अल्पकाळ भाकड राहते. उलट क्रॉस न केलेली गाय दीर्घकाल भाकड राहते. याचे प्रमाण तिपटीपेक्षा जास्त असते. दोन्ही गायींना खावयाला मात्र तेवढेच लागते. त्यांच्यासाठी दिलेली किंमत, त्याच्यावरचे बँकेचे व्याज द्यावेच लागते. ते काही कोणाला सोडत नाहीत. म्हणजे जास्त दूध देणा-या गायीसाठी जर आम्ही कर्ज काढले तर, तिच्यासाठी बारा टक्के व्याज आणि दूध न देणा-या गायीसाठी, भाकडकाळ जास्त असलेल्या गायीसाठी, काही कमी व्याज अशी मात्र परिस्थिती नाही. दोन्हीसाठी सारखेच कर्ज व सारखेच व्याज भरावे लागते. त्यांच्यासाठी गोठाही सारखाच बांधावा लागतो. दोन वेळेला पाणीही पाजावे लागते. श्रम सारखेच पडतात, फक्त दावणीला नगाला नग असतो. दुधाचा मात्र पत्ता नसतो. म्हणून क्रॉस न केलेली गाय ही आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून दुधाचा व्यवसाय करताना आपणाला कोणती गाय परवडेल हाही विचार करावा लागतो.