व्याख्यानमाला-१९८०-५५

प्रामाणिकपणे चांगला व्यवसाय करून परिस्थितीवर मात करण्याऐवजी या व्यवसायात चांगले यश मिळण्याऐवजी, चुकीच्या पद्धतीने मात करण्याचे प्रयोग अशाप्रकारे याही क्षेत्रात चालू आहेत त्यामुळे काही ठिकाणी डेअरी-सोसायटी नुकसानीत आली. डेअरीच्या संस्था अडचणीमध्ये आल्या. त्या लिक्वीडेशनमध्ये निघाल्या. आता सरकारने दूध घ्यावे. अशी जर तुमची अपेक्षा आहे, तर जो पिणारा माणूस आहे, जो ग्राहक आहे, जो पैसे देतो तोही माणूस आहे. त्याच्या आरोग्याला बाधा येईल किंवा त्याचे काही नुकसान होईल अशी भूमिका कोणतेही सरकार कसे स्वीकारील? कोणतेही सराकार असले तरी, ते भेसळीचे केंद्रावर गेलेले दूध परत पाठविते. परिणामी सोसायटीमध्ये तोटा येतो. अशा सोसायट्यांचा वर्षाचा किंवा महिन्याचा हिशोब पाहिल्यानंतर कळते की, एका महिन्यामध्ये सोसायटीस पन्नास टक्के तूट! दूध फॅट परसेंटेजला आणि त्याच्या निकशाला उतरत नाही म्हणून नुकसान होते; असे आपणाला वाचावयास आणि पहावयास मिळते. मग त्या गावामध्ये काम करणारे, ज्यांनी घाम गाळून, श्रम करून, कष्ट करून हा व्यवसाय उभा केलेला असतो. कोणी तरी आपल्या आईचे, बहिणीचे किंवा बायकोचे चार दागीने गहाण ठेवून एखादी गाय किंवा म्हैस खरेदी केलेली असते. कोणी बँकेत जाऊन कर्ज काढलेले असते. त्या माणसांची अवस्था काय होत असेल? याचा विचार करवत नाही. म्हणून लहान गाव असो, मोठा गाव असो सर्वच ठिकाणी या व्यवसायाच्या संदर्भात प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने काही प्रयत्न होणे ही आजची काळाची गरज आहे.

मला असे वाटते की, महाराष्ट्रातल्या सामान्य शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने, दुग्ध व्यवसायाच्या प्रश्नाकडे तुम्ही  आम्ही पाहिले पाहिजे. हा व्यवसाय लोकांनी कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, दुभत्या जनावरांच्या (गायी) कोणत्या नवनवीन जाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुधासाठी कोणते मार्केट शोधले पाहिजे, त्याच्यातला बायप्रॉडक्टस् कोणता निर्माण केला पाहिजे, ते बायप्रॉडक्टस् करणे परवडते का, या गोष्टींचा मी एक सारखा विचार करीत असतो. या देशामध्ये जेथे दुधाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात निघते, तेथे निरनिराळे प्लॅन्टस् पहावयास मिळतात. तेथे दुधापासून ‘कंपलीट टी’ आणि ‘कंप्लीट कॉफी’ तयार करण्याचे उद्योग चालतात. आपण पहाता ती, ‘कॅडबरी’ चॉकलेट, या व्यवसायात बरीच शहरी व सुशिक्षीत मंडळी आहेत, कॅडबरी चॉकलेटसंबंधी मी त्यांना भेटलो. या व्यावसायिकांचा एक फार्म तळेगाव जवळच्या इंदोरी खेड्यात आहे. तेथे चार-पाचशे गायी आहेत. पण त्यांना तेवढ्यांचे दूध काही पुरत नाही. मध्यंतरी ते परदेशातून दुधाची पावडर आणत होते. आणि मग त्याचे चॉकलेट बनवित होते. चॉकलेटला गायीचे दूध जास्त चांगले. मी मुद्दाम त्यांच्याकडे गेलो आणि पाहिले की, अशा प्रकारचे काही आपल्याला आपल्या येथे करता येईल का? याचा विचार केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल दूध बाहेरून आणावयाचे, त्यासाठी ट्रान्स्पोर्ट चार्ज भरावयाचा, चार-चार-पाच-पाच हजार रुपये पगाराची ऑफिसर मंडळी नेमावयाची, बनविलेल्या चॉकलेटसाठी खूप पॅकींग खर्च करावयाचा आणि ती विकावयाची, एवढा खर्च करूनसुद्धा त्यांना खूप डिव्हीडंड मिळतो. कल्पना करा की ते शहरी लोक जर हा किफायतशीर व्यवसाय करतात. आपण ग्रामीण भागामध्ये असे काही करणार आहोत की नाही? अशा प्रकारचे दुधाचे उत्पादन तुमचा कराड तालुका करीत आहे आणि त्याला जर दुसरा एखादा पूरक धंदा आपण उभा करीत असू तर आपणालाही तो करता येण्यासारखा आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे कॅडबरी चॉकलेट करणा-या कंपनीला जर एवढा फायदा होतो. तो आपण का मिळवू नये? दुसरे असे की, दुग्ध व्यवसायावर अवलंबून असणारे, ‘जम्बो आइस्क्री’ किंवा ‘क्वॉलिटी आइस्क्रीम’ हीसुद्धा दुधापासूनच बनतात. ग्रामीण भागात निर्माण होणारे दूध शहरात जाते व तिथे त्याचे आइस्क्रिम बनते. तेच खेड्यात आणून पुन्हा विकावयाचे. हे सगळे होऊन सुद्धा या व्यवसायात खूप मोठा नफा उरतो. मग आम्ही का नही या व्यवसायात उतरायचे? असा विचार आम्ही करणार आहोत की नाही? मी आपणाला सुरुवातीला सांगितले की, या व्यवसायांचे ‘रॉ मटेरियल’ निर्माण करण्यासाठी आम्हाला काही मोठा फौजफाटा शोधावा लागणार नाही. त्यासाठी तज्ञ माणसे शोधावी लागणार नाहीत. पगारी माणसे नेमावी लागणार नाहीत. आमच्या घरामधलाच साधा भोळा माणूस हा व्यवसाय करू शकतो. आमची एखादी भगिनी, आईसुद्धा हा व्यवसाय करू शकते. असे असूनही आम्ही तिकडे दुर्लक्ष करतो. सामान्य माणसाला आधारभूत होणारा, त्याच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करणारा माणूस म्हणून जगण्याचे सामर्थ्य देणारा असा हा व्यवसाय आहे. अशा या व्यवसायाची वाढ करण्याचा जर आम्ही प्रयत्न करणार नसलो तर, आम्ही जी सामाजिक कामे करतो आहोत, आयुष्यभर जी राजकीय कामे केली. त्यासाठी काही किंमतही मोजली, पण त्याला काहीच अर्थ उरत नाही.