व्याख्यानमाला-१९८०-५३

मी नेहमी सांगतो की, मी बारा वर्षे शेती केली. परंतु माझ्यापेक्षा अधिक शिकलेला माझा मुलगा माझ्यापेक्षाही चांगली शेती करतो. हे मी माझा मुलगा म्हणून सांगतो असे नाही. मागच्याच वर्षी त्याने शेतात कारली केली होती. दोन फुटाची कारली. मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिली नाही. हजारो कारली दोन फुटापर्यंत आल्याचे पाहिल्यावर, मी मुंबईहून मुद्दाम शेतावर जाण्यासाठी आलो. चौकशी केली, पाहिले, कळले की, १२-१४ लोकांनी एकच बियाणे आणले होते. ते एकाच कंपनीचे होते, एकाच पिशवीतून आणले होते. आणि एकाच जातीचे होते. १०-१२ शेतकरी एकत्र येऊन त्यांनी कारली लावली. एकाच्या शेतात दोन फुटाची कारली आणि दुस-याच्या शेतात १६ इंचाची तर तिस-याच्या शेतात ७।। इंचाची अशी त्यांची सरासरी होती. आमच्या मुलाच्या शेतामध्ये सर्वात जास्त उत्पन्न निघाले. दुस-याच्या शेतामध्ये त्यापेक्षा कमी तर तिस-याच्या शेतात सर्वात कमी. हे जर शेतीमध्ये घडू शकते ते आपण लक्षात घेतले पाहिजे. मी मुद्दाम यासाठी उदाहरण दिले की, नवीन शिकलेला माणूस जर या धंद्याकडे प्रवृत्त झाला, त्यात त्याला गोडी निर्माण झाली तर, या दुग्धविकासामध्ये किंवा शेती व्यवसायामध्ये चांगल्याप्रकारे व समर्थपणाने तो काम करू शकतो, हे मी अनुभवले आहे. म्हणून आजची जी राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे ती फार कठीण आहे. गावोगाव दिवसाला साधारणपणे शे-पन्नास नवीन पदवीधर झालेली मुळे भेटतात ‘नोकरीसाठी चिठ्ठी द्या, चपाटी द्या, याला सांगा, त्याला सांगा’ म्हणून आग्रह धरतात. महाराष्ट्रामध्य आपण कितीही प्रगती साधली तरी माझ्या समजूतीप्रमाणे आपण प्रतीवर्षी सर्वच क्षेत्रामध्ये, आपण ८० ते ९० हजार नोक-या निर्माण करू शकू. मात्र ग्रॅज्युएट आणि एस. एस. सी. झालेल्यांची, सुशिक्षीत झालेल्यांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असते. तो आकडा सरासरी ४।। लाखाच्या आसपास आहे हेही आपण जाणता.

या व्यवसायाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी फार मोठ्या तत्ववेत्या मार्गदर्शकाची फारशी गरज पडत नाही. दोन पुस्तके वाचून कोणाकडे तरी चार शेतक-यांकडे जाऊन, तो व्यवसाय करणा-याकडे जावून मार्गदर्शन घेण्यापुरता हा व्यवसाय सोपा आहे. मी या व्यवसायाच्या संदर्भात मुद्दामच जरा स्पष्टपणे बोलतो आहे. या व्यवसायासंबंधीची आजची परिस्थिती विचारात घेतली तर, निर्माण होणारे दूध आमि महाराष्ट्रामध्ये खपणारे दूध, त्याला मिळणारे भाव, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये दुधाला लिटर मागे सरासरी ९२ पैसे मिळत होते. पण आजची परिस्थिती काय आहे? सरकारने जाहीर करून टाकले की, दूध म्हैसीचे असो किंवा गायीचे असो मग ते क्रॉस केलेल्या गायीचे असे अगर बिगर क्रॉस केलेल्या गायीचे असो त्याचा दर दोन रूपये दहा पैसे लिटर असून, आम्ही त्या दराने तुमचे दूध घेतो. त्या क्षेत्रात आज थोडीशी भावाची हमी या सरकारच्या धोरणामुळे मिळाली आहे. परवा बरखास्त झालेल्या असेंब्लिच्यापूर्वी शरद पवारांचे जे सरकार होते, त्याने हे दर बांधून दिले आहेत. शरदराव पवरांया सरकारने या व्यवसायाच् संदर्भात एक अतिशय क्रांतीकारी निर्णय घेतला होता. व्यवसाय नुसता वाढावयाचा, उत्पन्न वाढावयाचे, पण ते दूध कोठेतरी स्वस्त भावाने विकावे लागले तर, तो धंदा पुन्ही मार खाईल, म्हणून एक महत्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या खेडेगावामध्ये डेअरी सोसायट्या आहेत, ज्या गावामध्ये अडीचसे लिटरपेक्षा दूध निर्माण होऊ शकते. तेथील दूध तिथल्या शाळेतल्या सहा ते अकरा वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांना दर विद्यार्थ्यामागे एक वेळेला २०० मिली या प्रमाणात सरकारच्या खर्चाने पुरवावयाचे असा तो निर्णय होता. मला वाटते त्याची सुरुवातही झाली होती. त्यावेळी त्याची दोन लाखाच्या आसपास बेनिफिशअरी म्हणजे लाभार्थी विद्यार्थी संख्या होती. तो निर्णय आज ना उद्या लोकांच्या दडपणाने म्हणा किंवा एक सामाजिक गरज म्हणून म्हणा कार्यान्वीत आणावाच लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये दुग्धव्यवसायाच्या धंद्याला उत्तेजन म्हणून गरिबांच्या मुलांना दूध मिळाले पाहिजे. पूरक अन्न मिळाले पाहिजे. त्याद्वारा त्यांचे आरोग्य आणि मनोधैर्य वाढविले पाहिजे. बुद्धीमत्ता सतेज बनविली पाहिजे हा त्याच्या पाठीमागील एक उद्देश होता. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या धंद्याला पूरक धंदा म्हणून दुग्धव्यवसायाला यामुळे हमी मिळणार होती. आमच्या त्यावेळच्या उद्दिष्टाप्रमाणे नजिकच्या काळात विद्यार्थ्यांचे पाच ते दहा लाखांचे कायमचे गि-हाईक उपलब्ध होणार होते. त्याचा पैसा सरकार देणार होते. ती जबाबदारीही आपल्यावर नव्हती. अशा रीतीने या व्यवसायाला कायमचे गि-हाईक मिळण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय मुंबई-पुण्यासारखे मार्केटही आपल्याला जवळच आहे. गेल्या दोन वर्षापर्यंत आपण गुजरातकडून दूध आयात करीत होतो. त्याशिवाय आपल्याला तरणोपाय नव्हता. नाहीतर पावडरचे कारखाने काढून आपणाला पुण्या-मुंबईच्या गि-हाईकांना पावडरचे दूध द्यावे लागत होते. व ते आपण देतही होतो. तेही अपुरे पडत होते. आमच्या सरकारने घेतलेला वरील स्वरूपाचा निर्णय दुग्धव्यवसायाच्या क्षेत्रामध्ये चांगली परिस्थिती निर्माण करणारा होता. आम्ही दुधाल चांगले भाव देण्याचा प्रयत्न केला. त्या धंद्याला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला.