व्याख्यानमाला-१९८०-५२

सातारा तालुक्यामध्ये आरफळ म्हणून एक गाव आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आज त्या गावामध्ये क्रॉस केलेल्या ३०० च्या आसपास गायी आहेत. त्यातल्या पन्नास-साठ गायी त्यांनी प्रथम बाहेरून आणल्या आहेत. परंतु अडीचशे गायी या तिथल्याच गायीवर संकर करून तयार केलेल्या आहेत. आणि त्यातीलच एक गाय जिला गेल्या दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च बहुमान मिळाला. सरासरीने दिवसामध्ये ती सत्तावीस लिटर दूध देत होती. हे या जिल्ह्यामध्ये घडू शकते. आपल्या तालुक्यामध्ये एक अटके म्हणून गाव आहे. अटक्या कडे जाताना डाव्या बाजूला, शंकरबुवा यांचा श्री. बाळासाहेब म्हणून तुतण्या आहे. बी. एस्सी. अंग्री. असून त्याच्याकडे २०-२५ गायी आहेत. माझा छंद असल्यामुळे या महाराष्ट्रात कोण ‘गोपाल’ आहे, तो आमचा मित्र होतो. मी तेथे जाऊन पहातो, तो तेथे काय करतो आहे. मी अटक्यामध्ये पाहिले की, एक तरुण मुलगा आपल्या श्रमाने नवनवीन गायी पैदा करू शकला. त्यांची गुणात्मक वाढ करू शकला. व नोकरी पासून मिळणा-या उत्पन्नापेक्षा तिप्पटचौपट उत्पन्न स्वतःच्या अकलेने, मेहनतीने, आपल्या गावामध्ये निर्माण करू शकला आहे. ही काही कमी महत्वाची गोष्ट मानण्याचे कारण नाही!

मी महाराष्ट्रात व बाहेर अनेक ‘गोपालांची’ भेट घेतली आहे. तेथे गायीच्या दुधाचे प्रमाण व त्यातील प्रोटीन्स वाढविण्यासाठीही अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. यासाठी हिरवा चारा म्हणून ‘लसूण घास’, ‘हत्ती घास’, ‘कोसबाड येथे आढळणारी ‘कू-गाभूळ’, ‘स्टॅलो गवत’ अशा अनेक त-हेच्या हिरव्या गवताचे फार्म यासाठी मुद्दाम तयार करण्यात आलेले आहेत. त्याचा उपयोग करून घेवून गायीच्या दुधाची उत्पादन क्षमता जशी वाढविण्यात येते, त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायातील रॉ-मटेरियल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. उदा. धुळे येथे अंजनीचा पाला गायींसाठी वापरतात व त्याच्य लाकडापासून इतर वस्तूही बनविण्यासाठी त्याचा वापर करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा रीतीने गायीच्या दुधाची उत्पादनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. आपणही ते केले पाहिजेत. आपण पांढरपेशे बनून या व्यवसायाकडे अधिक पहातो असे मला वाटते.

मात्र या क्षेत्रात काम करणाराला थोडं झकपक रहाता येत नाही. त्याला कधी चिखल मातीत उतरावे लागते, कधी कपड्यावर शेणाचा डाग पडतो, कधी एखाद्या गायीच्य शेपटीचा फटकाही मिळतो, तर कधी लाथही मिळते! परंतु हा व्यवसाय करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कष्टाने हिंमतीने उभे राहू शकतो, हे आमच्या अनेक तरूण मित्रांनी सिद्ध करून दाकविलेले आहे. त्या आरफळसारख्या गावामध्ये पाच वर्षांपूर्वी एक-दोन गायीसुद्धा आणलेल्या नव्हत्या. आज तेथे ३०० च्यावर गायी आहेत. तेथे चढाओढ लागलेली असते, ती गायीविषयक ज्ञानाची. गाव त्या चर्चेमध्ये मशगूल असते. ते शास्त्रीयदृष्ट्या चर्चा करतात, प्रश्न निर्माण करतात, उत्तरे शोधतात. आमचा तेथील एखादा पागोटेवालासुद्धा, ही ए-वन आहे, ती इतक्या टक्क्याची आहे, हीची आई त्या गुणाची होती, तिचा बाप तसा होता आणि म्हणून तिचे हे गुण तिच्यामध्ये उतरले आहेत आणि ती मागच्या वेताला साधारणपणे ३,००० लिटर दूध देऊन गेली तर या वेतामध्ये तिने ४,२०० लिटर दूध दिले, हे आमचे रामराव-शामराव कुणीही सांगत असतो. याचे कारण काय? तर व्यासंग. या व्यवसायाकडे पाहिले पाहिजे. ते एक काळाची गरज म्हणून, आपणाला आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मिळालेला एक मार्ग म्हणून, या व्यवसायाकडे पाहिले पाहिजे; असे मला वाटते. म्हणून त्यादृष्टीने यासर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. गावागावात शिबीरे घेऊन विशेषतः तरूण मित्रांनी या प्रश्नाकडे जास्त जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. मी माझा अनुभव आपल्याला माहितीसाठी सांगतो. आजची शेती आणि हा दुग्ध व्यवसाय, शिकलेला माणूस न शिकलेल्या माणसापेक्षा जरा बरा करूशकतो. त्याला त्याची आकलन शक्ती उपयोगी पडते. त्याच्याजवळ दुस-याचे ऐकण्याची प्रवृत्ती असते. दुसरीकडे गेला तर तो समर्थपणे चर्चा करू शकतो व त्या दुस-या माणसाकडून काही तरी मिळवू शकतो. असा माझा अनुभव आहे.