व्याख्यानमाला-१९८०-५४

दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आज नवनवीन माणसे, काही संशोधन घेऊन त्याक्षेत्रात उतरत आहेत. मात्र ग्रामीण भागामध्ये असूनही या व्यवसायाकडे पहाण्याचा दृष्टीकोन जुनाच आहे. कारण या व्यवसायातला एक अभ्यासक आणि शेतकरी, स्वतः धार काढून दूध विकलेला माणूस म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एखाद्या गावातील, जर आपण १०० म्हैसी घेतल्या, त्यांना जे नॉर्मल कोर्समध्ये आपण खायला घालतो, जी वैरण घालतो तीच घातली, पेंड दिली नाही, भुसा दिला नाही. तरीही ती म्हैस महिन्यापूर्वी व्याली असेल तर, ७ परसेंट फॅटचे दूध देते. म्हैसीच्या दुधाचे फॅट परसेंटेड सातच्या आत कधीही येत नाही. परंतु आपण खेड्यातील कोणत्याही डेरीमध्ये जा तिचे कागद पत्र पहा तेथे नापास झालेल्या दुधाची काय परवड चाललेली असते, महाराष्ट्रामधील या धंद्याला हा एक मोठा धोका आहे. मी मघाशी आपणास मुद्दाम सांगितले की, तुम्ही कोणत्याही गावामध्ये जा, समोर म्हैशी पिळून पहा, त्या दुधाला फॅट मशीन लावा, त्याला सात परसेंट फॅट पेक्षा कमी फॅट कधी येत नाही. हजारो म्हैसी असलेल्या ठिकाणी सुद्धा एखादी म्हैस सात परसेंट फॅट पेक्षा दुधाचा फॅट कमी असलेली मिळत नाही. मात्र डेअरीवर दूध गेले की ते सात परसेंट फॅटचे भरायलाच तयार नाही! आमच्या काही जुन्या खुळचट कल्पना आहेत, जुन्या माणसांनी सांगून ठेवलेले आहे की, ‘दूधात पाणी टाकले नाही तर म्हैसीची कास जळते’ काय ह्या खोट्या कल्पना! त्या महादेवाच्या गाभा-याची जशी ती गोष्ट सांगतात-महादेवाला दूधाचा अभिषेक करायचा असे एका गावामध्ये ठरले. त्यासाठी प्रत्येकाने तांब्याभर दूध आणावे असे जाहीर ठरले. धूर्तमाणापैकी प्रत्येकालाच वाटले की, आपण तांब्याभर पाणी नेवून घातले तर ते काय कोणाच्या लक्षात येणार आहे! सगळ्याच गावाचे दूध येणार, आपण तांब्याभर पाणी घेऊन जावू या. आणि तशीच अवस्था आज या दुग्ध व्यवसायाच्या धंद्यामध्ये निर्माण झालेली दिसते. कोणत्याही गावामधल्या डेअरीवर दुधाला फॅट मशीन लावल्याबरोबर कळते की, हे दूध निकशाला उतरत नाही. विचारा आमच्या शेतकरी मित्रांना किंवा भगिनींना उत्तरे मिळतात, ‘नुकतीच व्याली’ नाहीतर ‘ओला चारा आहे’ म्हणून सांगतात. अहो उन्हाळ्यातही थापा मारतात. म्हणतात ‘पाण्यात जास्त वेळ बसली’ व ‘पाणी जास्त प्याली’ अशा ही थापा मारतात. ही लक्षणे चांगली नाहीत. धंदे मारखाण्याची ही लक्षणे आहेत. धंदे बिघडविण्याचे एक सामाजिक कारण किंवा हा सामाजिक रोग आहे. सर्वच क्षेत्रामध्ये हा भेसळीचा रोग पसरलेला आहे. तो काही तुमच्या आमच्या पुरता मर्यादित नाही. शिकलेली, शहाणी सुरती माणसेही धेदंवायीकपणा करतात. तेलात भेसळ करतात, अन्न पदार्थात भेसळ करतात हे आपण अनेक वर्तमानपत्रांतून वाचतो. मग त्या तेलापासून माणसाच्या शरीरावर काय परिणाम होतील, रोग होतील किंवा आणखी काय नुकसान होईल हे कोणीही पहायला तयार नाही. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षापूर्वी ठरविले की, गायीच्या दुधाला उत्तेजन दिले पाहिजे. गायीचे दूध जर या महाराष्ट्रामध्ये वाढवावयाचे असेल तर, ते वाढू शकते. म्हैसीचे दूध वाढवायाला मात्र अडचणी आहेत. काही मर्यादा आहेत. आपल्या इकडची माणसे फार हुशार. सरकारने गाय व म्हैसीच्या दुधाला सारखाच भाव जाहीर केला. तर मग म्हैसीचे दूध दुप्पट करून बघूया म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला. त्यांना बिचा-यांना माहिती नाही की, गायीचे आणि म्हैसीचे दूध ‘हंसा टेस्ट’ मधून ताबडतोब कळते. हे कळते हे कळायलाच त्या भेसळ करणा-यांना बराच काळ लागल्यामुळे, त्यांचे हे उद्योग चालूच राहिले. म्हणजे प्रामाणिकपणाने या व्यवसायात उतरणारे कोठेतरी लबाडी करून चार जास्त पैसे मिळतात का, या आशेने प्रयत्न करू लागले. समाजामध्ये हा रोग आज फैलावलेला आहे. या व्यवसायाचा विचार करताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आमि हे ज्ञानही लोकांच्यापर्यंत पोहोचविले पाहिजे. ‘फॅट परसेंटेज’ आणि ‘एस. एन. एफ.’ वाढविण्यासाठी काही मंडळी दुधात साखर घालतात. या धंद्यातला जो तज्ञ आहे त्याला त्याचीही टेस्ट कळते.