व्याख्यानमाला-१९८०-५०

मात्र शेतीसाठी आपणाला सजातीय जनावरांची गरज असते. कारण सजातीय वळूपासून निर्माण झालेले बैल जसे परवडतात, तसे विजातीयपासून निर्माण झालेले बैल वा जनावरांच्य जाती परवडत नाहीत. विशेषतः गायीच्या बाबातीमध्ये यादृष्टीने आणखी एक अडचण आहे, तीही लक्षात ठेवली पाहिजे. क्रॉस केलेली गाय फार ‘सेन्सेटिव्ह’ असते. ती रोगाला बळी पडण्याची लवकर शक्यता असते. एवढी गोष्ट याबबातीत अडचणीची आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या जवळची कु-हाड ओसरीला किंवा दरवाज्याच्या बाजूला कोठेही ठेवतो, पण आपल्याकडे तलवार असेल तर ती म्यान करून ठेवावी लागते. याचे कारण तिची धार तेज असते.  एका घावात दोन तुकडे करू शकेल. पण ती सांभाळण्यासाठी तिला कव्हर ठेवावे लागते, म्यान करावी लागते. कारण नाजूकता आणि इफिशिएन्सी यांचा फार जवळचा संबंध आहे.  इफिसिएन्सी ज्याच्या जवळ असते, त्याच्या जवळ नाजूकता असते, म्हणून तिला सांभाळण्याची जबाबदारीही वाढते. एखादी चांगली कु-हाड जी क्रिया करेल, तीच क्रिया तलवार करेल, परंतु कु-हाड आणि तलवार ठेवताना, तुम्ही त्यांना सारख्याच पद्धतीने ठेवू शकत नाही. याचपद्धतीने ह्या दोन गायी आहेत असे आपण समजलो तरी चालेल. सजातीय जातीपासून निर्माण झालेली एखादी गाय, तिला सांभाळण्यासाठी पडणारे कष्ट, त्यासाठी वापरलेली पद्धती, तिला द्यावा लागणारा खुराक आणि याविजातीय जातीपासून किंवा क्रॉस केलेली एखादी गाय असेल तर, तिला सांभाळण्याची पद्धती, तिला द्यवा लागणारा खुराक व औषधोपचार यामध्ये खूप तफावत आहे. हा मुद्दा याबाबतीत अत्यंत महत्वाचा आहे. दुसरे असे की विजातीय जातीपासून मिळणारा बैल आपणास शेतीसाठी परवडत नाही. कारण क्रॉस केलेली जनावरे जशी जास्त खातात तशीच त्यांची क्रय शक्ती ही मर्यादित असते, कुंटीत होते आपण आपली साधी ज्वारी व हायब्रीड ज्वारीची जर तुलना केली तर, असे दिसते की हायब्रीड ज्वारीच्या व्हरायटीला खत जास्त लागते, खायला जास्त लागते. अनेक रोग पडतात शिवाय दुस-या पिकाच्या वेळेला जमीन थोडी निकस बनण्याचीही शक्यता असते. तिच अवस्था या क्रॉस केलेल्या जनावरांच्या बाबतीमध्ये आढळते. ती जरूर फायद्याची आहे. परंतु काही धोकेही आहेत, तोटेही आहेत. म्हणून मी आपणाला मघाशी सांगितले की, ही जात थोडीसी सेंसेटिव्हा असते. ती तशी असल्यामुळे आम्हाला तिच्या पासूनचा बैल शेतीली परवडत नाही. एखादा त्यातला बैल चांगला चालत असेल, परंतु सर्रास शेतीसाठी क्रॉस केलेली जनावरे वापरणे परवडणारे नाही.

बरेच ठिकाणी कोणीतरी व्याख्याने देतात. आमच्यासारखे लोक येऊन सांगतात आणि काही तरुण मित्र त्यांच्या नादी लागून या व्यवसायाकडे वळतात. कोणी बंगलोरला जातात. आणखी कोठेतरी जातात आणि १०० टक्के परदेशी वळूचे रक्त असलेली गाय घेऊन येतात. त्यांचे अनुभव तेवढे बरोबर नाहीत. त्या गायी ट्रकमधून इकडे आणतात. आणल्याबरोबर येथे तिला निमोनिया होते, दुसरा कुठला तरी रोग होतो, हवामानाचाही तिच्यावर परिणाम होतो. या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणा-यांनी व करणा-यांनी याचाही विचार केलाच पाहिजे. ही बाब अतिशय महत्वाची आहे. जसे तुमच्या गावामध्ये जन्माला आलेला माणूस, मुलगा वा मुलगी किंवा जनावरे, त्या वातावरणामध्ये अँडजस्ट होतात; तसे बाहेरून आलेल्या माणसाला वा जनावराला नवीन परिस्थिती हवामान पचेलच किंवा सूड होईलच असे नाही. म्हणून या क्षेत्रामध्ये काम करणा-या लोकांना हेही सांगितले पाहिजे की आपण गायी आपल्या येथल्याच घेतल्या पाहिजेत. आपल्या येथेच क्रॉस गायी कशा निर्माण होतील याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः पन्नास ते पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत वळूचे रक्त त्यांच्यामध्ये कसे येईल असा प्रयत्न करावा लागतो. कदाचित आपण शंभर टक्के रक्ताच्य गायी येथे आणण्याचा प्रयत्न केला किंवा वाढविण्याचा प्रयत्न केला तर त्या रोगाला लवकर बळी पडतात. त्या जास्त सेंसेटिव्ह असतात म्हणून त्यांची देखभालही जास्त काळजीने करावी लागते व त्यामध्येच आपली खूप शक्ती खर्च होते. म्हणून आपल्या या नैसर्गिक परिस्थितीमध्ये निभाऊन निघतील, हवामानाशी अनुरूप ठरतील, अशाच जाती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याबाबतीत इतरही काही महत्वाच्या अडचणी आहेत. त्याही मी मुद्दाम आपणास सांगणार आहे.