व्याख्यानमाला-१९८०-४५

अध्यक्ष, मा. पी. डी. पाटीलसाहेब, आपल्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष, आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने येथे उपस्थित असलेले क-हाडकर सूज्ञ नागरीक बंधू आणि भगिनींनो! पहिल्यांदा पी. डी. पाटीलसाहेबांनी सुचविल्याप्रमाणे, गेल्यावर्षी व्याख्यानमालेमध्ये झालेल्या भाषणांचा संग्रह करून जे पुस्तक छापण्यात आलेले आहे, त्याचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो.

ज्या पुस्ताकाचे प्रकाशन झाले, ज्या थोर महनीय वक्त्यांनी येथे व्याख्याने दिली, त्यांच्या पुस्तकाचा लाभ समाजातल्या जाणत्या आणि सुशिक्षीत अशा वर्गासाठी व्हावा, त्यांनी ते अवघड विषय मांडण्याचे, जे परिश्रम केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद! आणि या पुस्तकामार्फत त्यांनी दिलेले विचार आपल्या विभागातल्या सर्व कानाकोप-यात पोहोचावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.

मित्रहो, मा. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने, आपण सुरू केलेल्या व्याख्यानमालेचे, मला वाटते, हे सातवे वर्ष. आजची ही व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेमध्ये, माझ्यापूर्वी दोन दिवस दोन वक्त्यांनी भाषणे दिली. आज माझ्याकडे विषय सोपविला आहे, ‘शेतीचे अर्थशास्त्र व त्यातील दुग्ध व्यवसायाचे स्थान.’ अर्थात हा विषय माझ्या थोडासा सोयीचा मला वाटला आणि म्हणूनच मी त्यास होय म्हटले. कारण मी काही वक्ता नाही. कोणी चिंतन करणारा नाही. आणि आज तर त्या क्षेत्रातलाही नाही, अशी माझी खरी अवस्था असल्यामुळे, मी व्याख्यान देण्याचे स्वीकारले. व्याख्यान देणारी जी मंडळी असतात, त्या संज्ञेतच मी बसत नसल्यामुळे व्याख्यानाला मी यायचे की नाही हाच खरा प्रश्न होता. परंतु विषय सोयीचा वाटला, म्हणूनच मी धाडस केले आहे. आणि येथे आलो आहे.

महाराष्ट्रामध्ये साधारणतः ६७ ते ६८ टक्के लोक हे शेतीवर आपली उपजीविका करतात. काही शेतीचे मालक म्हणून, काही मजूर म्हणून, काही अल्प-भूधारक म्हणून तर काही गैरहजन राहून शेती करणारे असे लोक यामध्ये मोडतात. पूर्वीच्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण होती. परंतु या बदलत्या परिस्थितीमध्ये उत्तम आणि मध्यम कोणाला म्हणावयाचे हे समाज ठरवील. पण कनिष्ठ शेती असी मात्र आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याची कारणे अनेक आहेत. त्याची चर्चा करण्याचे येथे कारण नाही. या देशामध्ये शास्त्रज्ञ या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. या देशामध्ये शेतीच्या बाबतीत जरूर काही क्रांतीही घडली आहे. ज्या देशाला धान्यासाठी अनेक देशांच्य दारी जाऊन, भिक्षेची झोळी घेऊन, ‘आमच्या देशाच्य माणसांना जगविण्यासाठी तुमच्याकडे जे शिल्लक असले, जे उपलब्ध असेल व जसे असेल ते धान्य द्या,’ म्हणून सांगण्याची पाळी येत होती. मात्र गेल्या दोन वर्षामध्ये या देशात काही धान्य दुस-या देशात पाठविण्याइतके निर्माण झाले आहे. व काही धान्य दुस-या देशात निर्यातही झाले आहे? ही काय या देशाच्या दृष्टीने कमी महत्वाची गोष्ट आहे. ही कृषीक्रांती झाली. हे झाले देशाच्या दृष्टीने, परंतु व्यक्तिगत शेतक-याच्या दृष्टीने विचार केला, किंवा जर पाचपंन्नास शेतकरी आपण आपल्या समोर घेतले आणि त्यांच्या सर्व परिस्थितीचा विचार केला, तर त्यांची परिस्थिती काही चांगली दिसत नाही. त्यातल्या बहुसंख्य लोकांना विचारले, ‘जर तुमचा जमा-खर्च अशा पद्धतीने तुटीचा आहे तर तुम्ही शेती कां करता’ तर ते म्हणतात की, ‘दुसरं काही करता येत नाही म्हणून शेती करतो.’ अशा पद्धतीने नाईलाजास्तव शेती करण्यामुळे महाराष्ट्रातल्या ब-याच विभागामध्ये शेतीने शेतक-यांना धोका दिला आहे. आणि म्हणूनच शेतीचे अर्थशास्त्र तसे काही फारसे चांगले राहिलेले नाही. याची कारणे अनेक आहेत. वाढती महागाई हे एक कारण. श्रमाची प्रतिष्ठा जेवढी समाजामध्ये असली पाहिजे तेवढी नाही. ती कमी व्हायला लागली आहे. हेही एक कारण आहे. उत्पादनासाठी येणारा जो खर्च आहे, आणि उत्पादन होणारा जो माल आहे, त्याच्यातून मिळणा-या किंमतीचा जो प्रश्न आहे, हीही कारणे शेतीच्य तुटीच्या अर्थव्यवस्थेची आहेत.

जर या देशातल्या सुमारे ७० टक्के लोकांना शेतीशिवाय दुसरा व्यवसायच करणे शक्य नाही, तर नजिकच्या काळामध्ये त्यातून काहीतरी मार्ग शोधण्याची आवश्यकता, तुमच्या आमच्या समोर निर्माण होते. सरकारी पातळीवरून त्यासंबंधी काही प्रयत्न होत आहेत. काही नवनवीन संशोधने होत आहेत. पाटबंधा-यांचे प्रकल्प होत आहेत, पाण्याखाली शेती आणण्याचा प्रयत्न जारीने होत आहेत. पण त्यालाही काही मर्यादा आहेत. पाण्याखाली आलेली जी शेती आहे, तिच्या संदर्भात आज उत्पादनाचा खर्च आणि उत्पादन होणा-या मालाची किंमत, यांचा विचार केला असता आज कुठेही त्यांचा मेळ बसत नाही; अशी ही परिस्थिती आहे. आणि यामुळे आजच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतक-यांची जी आर्थिक अवस्था आहे, ती मोठी चिंतनीय आहे.