दुसरा प्रश्न सोशालिझमबद्दल उपस्थित करण्यात आला. आम्ही एक शब्द वापरला. अगदी हेतुपुरस्सर वापरला, कारण आमच्या राज्याचे अधिकृत धोरण सोशालिस्ट आहे. परंतु आम्ही सोशालिझमबद्दल बोलावयाला लागल्यानंतर काही माणसांना थोडे अवघडल्यासारखे वाटू लागले. त्यांना वाटू लागले की हे लोक सोशालिझमबद्दल बोलावयाला लागले तर आमचे सगळे संपलेच की. हे लोक सोशालिझमबद्दल बोलू लागले तर आम्ही काय बोलावयाचे ? परंतु अध्यक्ष महाराज, मी सांगू इच्छितो की त्यांचा सोशालिझम वेगळा आहे आणि आमचा सोशालिझम वेगळा आहे. आम्ही जो सोशालिझम मानतो तो त्यांच्या सोशालिझमसारखा नाही. ते म्हणतात त्यांचा सोशालिझम खरा आहे. ठीक आहे, त्यांचा सोशालिझम त्यांना लखलाभ होवो. आमची जी सोशालिझमची कल्पना आहे ती मी मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ग्रंथनिष्ठ लोक नाही. मार्क्सने काय सांगितले हे पाहून आणि त्यावर बोट ठेवून चालणारे ग्रंथनिष्ठ लोक आम्ही नाही. मार्क्सने सांगितलेले सगळेच खरे असे मानणारे आम्ही नाही. ग्रंथांत सांगितलेले सगळेच खरे नव्हें असे मार्क्सनेच सांगितले आहे. मी मार्क्स थोडाफार वाचला आहे. मी त्यातील तज्ज्ञ आहे असे मी म्हणणार नाही. असे एक वय असते की ज्यावेळी मनुष्य असे ग्रंथ वाचतोच. त्याप्रमाणे मी देखील वाचण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याचे काही दृष्टिकोन बरोबर आहेत. त्यांच्याकडे आजकालचा कोण आधुनिक माणूस दुर्लक्ष करू शकेल ? पण डॉक्ट्रिन या दृष्टीने त्याने सांगितलेली समाजवादाची कल्पना सगळीच खरी आहे असे म्हणून चालणार नाही. तशा तर्हेची मार्क्सिझमची कल्पना आमची नाही. ज्यांनी हा वाद उपस्थित केला ते सन्माननीय सदस्य सध्या येथे हजर नाहीत. परंतु इतर सन्माननीय सदस्यांच्या माहितीकरिता मला सांगितले पाहिजे की माझी समाजवादाची कल्पना मार्क्सने सांगितलेल्या तराजूवर जोखून घेणारा मी नाही. हिंदुस्थानातील समाजवादाची कल्पना हिंदुस्थानातील जनतेच्या विशिष्ट अनुभवावरच आधारावी लागेल. येथे जेव्हा आर्थिक विकास आणि परिवर्तन होण्याची अत्यंत वेगवान प्रक्रिया सुरू झाली तेव्हा दुनियेच्या इतिहासामध्ये इतर ठिकाणी तेथील लोकांना जे धडे शिकावे लागले त्यांची पुनरावृत्ती आम्ही येथे करू इच्छित नाही. आम्ही हे करीत असताना, आमच्या देशातील अर्थरचनेची, आर्थिक शक्तीची, आर्थिक सामर्थ्याची जी नवीन वेगवान गती सुरू झाली आहे तिला योग्य ते वळण देत असताना इतिहासामध्ये इतर देशांना शिकावा लागलेला अनुभव लक्षात ठेवून आमच्या देशाच्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशा पद्धतीने आम्ही ते करणार आहोत आणि आमच्या या सगळया प्रयत्नांच्या पाठीमागचा खरा उद्देश प्रायव्हेट प्रॉफिट्सच्या जागी सोशल प्रॉफिटस् स्ट्रेंग्दन करण्याचा आहे. हे करीत असताना दोन गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीमध्ये असणारी मोठी दरी, डिस्प्यारिटीज आणि इनईक्वॉलिटीज जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो कसा करावयाचा हा दुसरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समाजातील सर्व वर्गांना एक प्रकारची, एकसारखी आणि समान तर्हेची संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. समाजवादी जीवनाकडे घेऊन जाणारे हे दोन मार्ग आहेत. मी जे समाजवादाचे चित्र पाहतो त्यामध्ये कोठलीही एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह अथवा गट अगर वर्ग दुसर्याची पिळवणूक करीत नाही. घोडेस्वारासारखा एक दुसर्याच्या पाठीवर बसला आहे अशी परिस्थिती असू नये अशा तर्हेचे आर्थिक समतेवर आधारलेले समाजवादाचे चित्र माझ्यासमोर आहे. ते चित्र केव्हा येईल, कोणत्या परिस्थितीत येईल, कोणत्या मार्गाने येईल हा दैनंदिन अनुभवाचा प्रश्न आहे. अमुकच मार्गाने ते येईल किंवा त्याने आले पाहिजे असा आग्रह धरणारा मी नाही. कारण इतिहास ठराविक मार्गाने जात नाही. इतिहास आंधळा पीर नाही. कोणीतरी सांगितलेल्या ठराविक मार्गाने तो जात नाही. घाण्याचा बैल जसा ठराविक मार्गानेच घाण्याभोवती धावतो तसा इतिहास जात नाही. इतिहासाची स्वतंत्र अशी प्रक्रिया असते आणि त्यानुसार त्याचा प्रवास चाललेला असतो. मार्क्सने सांगितलेला तोच समाजवाद आहे. अशी माझी कल्पना नाही असे मला त्यासंबंधी म्हणावे लागेल आणि ते म्हणत असताना मला यत्किंचितही शरम वाटत नाही. आमचा समाजवाद हिंदुस्थानच्या विशिष्ट अनुभूतीतून निर्माण झालेला, ऐतिहासिक परिस्थितीतून घेतलेला आणि लोकशाही मूल्यांवर आधारलेला असा आहे. माझे मित्र श्री. व्यास यांनी अशी अमेंडमेंट मूव्ह केली की, यामध्ये समाजवाद घातला आहे, पण डेमॉक्रसी घातली नाही. नामदार राज्यपालांच्या भाषणात उल्लेख करताना नवीन कल्पनेचा उल्लेख करावयाचा असतो. डेमॉक्रसी आता स्वीकारावयाची राहिली नाही. त्यासंबंधी आता काही संदेह राहिला नाही. डेमॉक्रसीचे मूलभूत तत्त्व संविधानामध्ये स्वीकारले आहे आणि त्या मूलभूत तत्त्वावर आमचे पाऊल पक्के आहे. सन्माननीय सभासद श्री. व्यास यांनी त्याची आठवण करून दिली हे त्यांनी फार बरे केले. त्यामुळे त्यांना निदान त्याची आठवण राहील. तेव्हा ही समाजवादासंबंधीची आमची कल्पना आहे. हे सरकार जे काही करते त्याची पारख करण्याच्या कसोटया मी विधानसभेत भाषण केले तेव्हा मुद्दाम त्या भाषणात स्पष्ट केल्या. आम्ही जेव्हा आमचे धोरण जाहीर करतो, शासन जेव्हा आपले धोरण जाहीर करते तेव्हा त्याने जाहीरपणे स्वतःच्या परीक्षेच्या कसोटया जनतेच्या ताब्यात दिल्या आहेत. आम्ही जनतेला सांगितले की आम्हाला या दिशेने जावयाचे आहे, आमची पावले त्या दिशेने व्यवस्थितपणे पडतात की नाही हे पाहण्याच्या अमुक अमुक कसोटया आहेत आणि त्या आम्ही तुमच्या हातात दिल्या आहेत.