४०
मुंबईतील बेल्जियन वाणिज्य दूतावासासमोर निदर्शने करणा-यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला* (२२ फेब्रुवारी १९६१)
----------------------------------------------------------------------
वरील लाठीहल्ल्याच्या चौकशीच्या मागणीबाबतच्या चर्चेस उत्तर देताना मा. यशवंतराव चव्हाण म्हणाले की, निदर्शकानी दगडफेक केल्यामुळे पोलिसांकडून जो लाठीहल्ला झाला तो समर्थनीय होता.
--------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates, Vol. III, Part II, 22nd Feb. 1961, pp. 251 to 254
अध्यक्ष महाराज, या सभागृहाने या प्रश्नाची चर्चा केली याबद्दल मला समाधान वाटते. कारण या निमित्ताने सरकारचा दृष्टीकोन सभागृहासमोर ठेवण्याची संधी सरकारला मिळते. या विषयावर आणखी काही सभासदांची भाषणे होऊ शकली असती तर जास्त चांगले झाले असते. परंतु वेळेच्या मर्यादेमुळे ते होऊ शकले नाही.
यासंबंधीची संपूर्ण हकीकत खालच्या सभागृहापुढे मी ठेवली आहे, आणि तिला प्रसिध्दीही मिळाली आहे. त्यातील काही गोष्टींचा उल्लेख मी पुन्हा करतो. या बाबतीत माननीय सभासद, श्री. देशपांडे, यांच्या मताशी मीही सहमत आहे. कोणत्याही राजकीय निदर्शनाच्या वेळी पोलिसांचा लाठीमार व्हावा ही गोष्ट अभिमानास्पद नाही या मताचाच मी आहे. उलट त्यामुळे माझी शोभा कमी झाली असे मी समजतो. हे झाले नसते तर चांगले झाले असते अशीच माझी मनातली भावना आहे. बेल्जियम आणि कांगोमधील जो झगडा आहे त्यामध्ये आमच्या सहानुभूती निश्चितपणे कांगोच्या जनतेच्या बाजूच्या आहेत. पॅट्रिस लुमुम्बा हे अतिशय दृढनिश्चयी नेते होते. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना हौतात्म्य प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याविषयी असलेला आमचा आदर दुणावला आहे. कोटयावधी जनतेचे नेतृत्व त्यांनी केले आहे आणि त्यांच्यासंबंधी आमच्या मनात आदराची भावना कायम आहे. अशा नेत्याला सहानुभूती दाखविण्यासाठी जी निदर्शने झाली त्यावेळी लाठीमार झाला नसता तर चांगले झाले असते. लाठीमार झाला ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा गोष्टी घडू नयेत म्हणून मी या पूर्वी राजकीय चळवळीसंबंधी एक कोड ऑफ् कॉन्डक्ट सर्व पक्षांनी बसून तयार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. माझी अजूनही तशी इच्छा आहे. मी असे मानतो की, गेल्या चार पाच महिन्यांच्या अनुभवावरून या सभागृहात तशा प्रकारचे एक अंडरस्टँडिंग निर्माण झाले आहे. गेल्या चार पाच महिन्यात विरोधी पक्षाचे लोकही समजुतीने वर्तन करीत होते.
अशा परिस्थितीत असे काही घडेल अशी शंकासुध्दा मनात येत नव्हती. परंतु एकाएकी घडली ही दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा प्रसंगाच्या वेळी कोड ऑफ् कॉन्डक्ट नसेल तर आपल्या अनुयायांना आवरण्याच्या बाबतीत मोठा प्रश्न निर्माण होतो. हा मोर्चा निघण्यापूर्वी तीन मोर्चे बेल्जियन वकिलातीवर गेले होते. त्यावेळी अत्यंत शांतपणे कार्यक्रम पार पडला. आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या मोर्च्याच्या वेळी थोडीशी बोलाचाली झाली आणि काही विद्यार्थी रागाच्या भरात पोलीस अधिकार्याना बोलले एवढाच संघर्षाचा भाग त्यामध्ये होता. परंतु त्याही बाबतीत मी असे म्हणेन की, आमच्या पोलीस अधिकार्यानी आफ्रिकन विद्यार्थ्यांचा राग समजावयास पाहिजे होता. नको ते शब्द जरी ते बोलले तरी ते सहन करावयास पाहिजे होते. पोलीस कमिशनरनी यासंबंधी चौकशी केली आणि संबंधित अधिकार्याने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. सन्माननीय सभासद, श्री. गोगटे, यांनी असा मुद्दा उपस्थित केला की अधिकार्याला पुन्हा तेथे ठेवण्यात का आले ? मला असे म्हणावयाचे आहे की, एखाद्या ऑफिसरचा एखाद्या वेळी तोल गेला याचा अर्थ नेहमीच तोल जातो असा करता येत नाही. जे लोक असा अर्थ काढतात त्यांनी मनुष्य स्वभाव ओळखला नाही असे म्हणावे लागेल. मुख्य गोष्ट अशी आहे की, हा ऑफिसर त्या एरियाला अटॅच केलेला अधिकारी आहे. त्यामुळे तेथे राहणे हे त्याचे कर्तव्य होते. दुसरी गोष्ट अशी की, या अधिकार्याकडून जरी चूक झाली असली तरी ती कबूल करून क्षमा मागण्याइतकी मनाची तयारी त्याच्याजवळ आहे हीसुध्दा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जो माणूस मुद्दामहून चूक करीत नाही अशा माणसाकडून आम्हाला काम करून घेतले पाहिजे.
अध्यक्ष महाराज, माझे सन्माननीय मित्र, श्री. रसिक भट, यांचे भाषण मला थोडेसे राजकीय भाषण वाटले. अशा भाषणांचा माझ्या मनावर परिणाम होत नाही. प्रचाराच्या सभेत बोलल्यासारखे ते बोलले. कोणत्याही परराष्ट्रीय वकिलातीचे संरक्षण करणे हे आमचे काम आहे. बेल्जियमप्रमाणे चीनची वकिलातही येथे आहे. वस्तुतः या देशाने आमच्या देशावर आक्रमण केले असल्यामुळे त्या देशाबद्दल आमच्या मनात आदराची भावना नाही. परंतु म्हणून चीनच्या वकिलातीच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही टाळू शकत नाही. ते जोपर्यंत आमचे मित्र राष्ट्र म्हणून आपला प्रतिनिधी मुंबईच्या भूमीवर ठेवत आहे तोपर्यंत त्या राष्ट्राशी आम्ही माणुसकीचे व्यवहार केले पाहिजेत. बेल्जियमचा वकील जसा येथे आहे तसा या देशाचा वकील बेल्जियममध्ये आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थितीत आमच्याही काही जबाबदार्या आहेत की नाहीत? निदर्शने करावयाची, दगडफेक करावयाची आणि मग पोलिसांना लाठीमार करावा लागला तर चौकशी करा म्हणून मागणी करावयाची अशा मंडळींच्या चर्चेला उत्तर देण्याचीही इच्छा होणार नाही.