भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-३७

त्यानंतर कामगार आणि मालक यांच्यासंबंधी. त्रिपक्ष परिषद का भरविली नाही असे विचारले गेले. मी सांगितले आहे की, इंडस्ट्रियल पीसचा दृष्टीकोन ठेवूनच आम्ही काम करीत आहोत. तेव्हा ते करण्यासाठी चर्चा केलीच पाहिजे. योग्य परिस्थिती निर्माण झाली आणि यश येण्याची शक्यता दिसली तर त्रिपक्ष परिषद जरूर भरेल.

सरकारी नोकरांच्या पगारासंबंधी उल्लेख करण्यात आला. त्यासंबंधी उपसूचना दिली आहे. सरकारी नोकरांच्या पगारासंबंधी विचार करून आमच्या अर्थखात्याने एक रिपोर्ट तयार केला आहे. तो रिपोर्ट निवडणुकीच्या काळात मंत्रीमंडळ पाहू शकले नाही. त्यामुळे त्या रिपोर्टावर मंत्रीमंडळाने विचार केलेला नाही. तो रिपोर्ट मी स्वतः पाहिलेला नाही. अशा परिस्थितीत मी त्याबद्दल काय मत देणार? परंतु हा प्रश्न कोणत्या परिस्थितीत आहे याचा मी फक्त उल्लेख केला. यापेक्षा तूर्त मला जास्त सांगावयाचे नाही.

नामदार राज्यपालांच्या भाषणाचे सामान्यपणे सर्वांकडून स्वागतच झाले आहे अशी माझी भावना आहे. राज्यपालांच्या बाबतीत ज्या सदिच्छा माननीय सभासद श्री. देशपांडे यांनी व्यक्त केल्या आणि त्यांनी ज्या भावना बोलून दाखविल्या आहेत त्यांच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे. आमच्याबरोबर पाच सहा वर्षे राहून अत्यंत कठीण अशा काळात जे सहकार्य त्यांनी दिले आणि मार्गदर्शन केले त्याबद्दल
श्री. देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी मी सहमत आहे. एक सुसंस्कृत, थोर आणि देशभक्त असे राज्यपाल आपल्याला लाभलं ही एक प्रकारे या राज्याच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट समजली पाहिजे. इतके सांगून मी आपले भाषण पुरे करतो.
------------------------------------------------------------------------
On 20th March, 1962, Shri Y. B. Chavan, Chief Minister, defended the Government’s policy outlined in the Governor’s address and added that in accordance with this policy emphasis would be on rural development and establishing socialist pattern of society.